साधे विवाह समारंभ ही काळाची गरज

27

गेल्या दीड वर्षापासून देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना गर्दीमध्ये पसरतो सार्वजनिक कार्यक्रमात खूप गर्दी होते म्हणून सरकारने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. कोरोनामुळे गर्दी नको म्हणून सरकारने विवाह समारंभातील उपस्थितीवर देखील मर्यादा घातल्याने विवाह साधेपणाने होत आहे. कमी व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह होत असल्याने वधू- वरांच्या आई वडिलांचा विवाहात खर्च कमी होत आहे त्यामुळे त्यांना समाधान वाटत आहे. कोरोनामुळे विवाहाला होणारा खर्च कमी होत आहे. त्यामुळे विवाहासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च संपुष्टात आला आहे. ग्रामीण भागात बहुतांश लोक मोलमजुरी करून जीवन जगतात. लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च कसा आणि कोठून करायचा या विवंचनेतून त्यांना झोप येत नसे मग बँकांकडून किंवा सावकाराकडून कर्ज काढायचे.

मित्रपरिवारांकडून किंवा नातेवाईकांकडून उसनवारी करायची आणि कसाबसा विवाह पार पाडायचा त्यानंतर दोन चार वर्ष कर्ज फेडण्यात घालायची या चक्रातून अनेक मतापित्यांची सुटका झाली आहे. आता कमी लोकांच्या उपस्थितीत दोन तासात विवाह पार पडत असल्याने मानपान, रुसवे – फुगवे आदी गोष्टीही विवाहातून हद्दपार झाल्या आहेत. एकूणच कोरोनामुळे बदललेला विवाह सोहळा ही चांगली सुरवात म्हटली पाहिजे. समाजाने या विवाह सोहळ्याचे आता विवाह संस्कारात रूपांतर केले पाहिजे. विवाह समारंभात लाखो रुपयांची उधळपट्टी न करताही विवाह होऊ शकतात हे कोरोनाने दाखवून दिले आहे. विवाहात लाखो रुपयांची उधळपट्टी करुन आपण कर्जबाजारी होत आहोत. आतातरी आपण बदललो पाहिजे नाहीतर काळ आपणास माफ करणार नाही हे समाजाने ध्यानात घ्यावे. विवाहासाठी लाखो रुपये खर्च करण्याची परिस्थिती आता राहिली नाही. शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. शेतीमालाला भाव नाही. सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. खाजगी नोकऱ्यांची शाश्वती नाही. विवाह सोहळ्यात वधू प्रमाणेच वराकडच्या लोकांचाही खर्च होतो. विवाहासाठी कर्ज काढले असेल तर आयुष्य कर्ज फेडण्यातच निघून जाते.

विवाह हा सोहळा नाही तर तो संस्कार आहे. दोन जीवांचे मिलन म्हणजे विवाह. लोकांना दाखवण्यासाठी किंवा बडेजाव मिळवण्यासाठी विवाह कितीही धुमधडाक्यात साजरा केला तरी लोक विसरून जातात. काही महाभाग तर त्यातही उणिवा शोधतात. जेवणावळी, मानपान यावरील खर्च कमी करून तोच खर्च वधू – वरांना भावी आयुष्यासाठी द्यावा. आजची बचत उद्याची निर्मिती आहे. विवाहात केलेली बचत वधू – वरांना भावी आयुष्यात उपयोगी पडेल. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती एक संधी समजून समाजाने आतातरी शहाणे व्हावे. साधेपणाने विवाह ही काळाची गरज आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)