धरणगाव तहसिल येथे माहिती अधिकार दिन साजरा

28

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.28सप्टेंबर):- येथील तहसिल कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ बाबत माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार माहिती अधिकार कायद्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या हेतूने धरणगाव तहसिल कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी माहिती अधिकार कायद्याची प्राथमिक माहिती दिली. ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात यावा परंतु त्याआधी सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा, अशा सूचना प्रास्ताविकातून व्यक्त केल्यात.

या कार्यक्रमात ई – पीक पाहणीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ४ तलाठ्यांना जिल्हाधिकारी साहेबांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये तलाठी विरेंद्र सोनकांबळे, सचिन कलोरे, प्रज्ञा खंडेराव, बसवेश्वर मजगे यांचा सन्मान झाला. प्रमुख वक्ते लक्ष्मण पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ ची पार्श्वभूमी व कायद्याच्या तरतुदी साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला.

प्रशासन व जनता यांच्यात समन्वय असला तर कामे सुलभ होतात. सामान्य माणसाचे काम झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हिच आपल्या कामाची पावती असते असे मत लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार नितीनकुमार देवरे, Sto योगेश कुंजीर, तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक बंधू – भगिनी उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य रविंद्र कंखरे यांनी केले.