कोण होते भगतसिंग ?

29

नुकतीच शहीद-ए-आझम भगतसिंगांची जयंती होऊन गेली. सोशल मीडियावर त्यांना केले गेलेल्या अभिवादनाचा पूर आला होता. आजच्या तरुणाईला भगतसिंग तर पाहिजेत, परंतु भगतसिंगांचे विचार काय होते? याच्याशी काही सोयरसुतक नाही आणि ते जाणून घेण्याची उत्सुकताही नाही. मग भगतसिंग हवेत कशाला? फक्त मिरवायला, की फायद्याच्या राजकीय-सामाजिक भूमिकेसाठी वापरून घ्यायला, की कुणालातरी बदनाम करण्यासाठी? आधी तरुणांनी भगतसिंग पूर्णपणे वाचून समजून घेतले पाहिजेत आणि त्यानंतरच आपण त्यांचे अनुयायी बनण्याच्या पात्रतेचे आहोत की नाही हे ठरवलं पाहिजे. कारण देशातील आजची राजकीय-सामाजिक परिस्थिती बघता त्यांच्या विचारांची खूप गरज आहे.

अनेक तरुण-ज्येष्ठांना आजही भगतसिंग म्हणजे स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले सशस्त्र क्रांतिकारी यापलीकडे भगतसिंगांचा परिचय नाही. भगतसिंगांच्या विविध सामाजिक व राजकीय विचारांबद्दल माहिती नाही. त्यामुळे ह्या अगदी कमी वयाच्या परंतु प्रचंड ताकदीच्या महापुरुषाला एकाच चौकटीत बंदिस्त केलं गेलं. अतिशय दूरदृष्टी असलेले राजकीय आणि सामाजिक विचारवंत होते भगतसिंग. फक्त देश स्वतंत्र करणेच त्यांचा उद्देश नव्हता तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात कोणत्या प्रकारची शासनव्यवस्था असेल? त्यात शेतकरी, मजूर, कामगार, सामान्य नागरिक यांचे काय स्थान असेल? त्यांना कसे वर उचलता येईल? ह्या सर्व योजना त्यांच्याकडे तयार होत्या. स्वातंत्र्याचा अर्थ सांगतांना भगतसिंग म्हणतात, “आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ इंग्रजांपासून सुटका करून घेणे एव्हढाच नाममात्र नाही, तर ते संपूर्ण स्वातंत्र्याचे नाव आहे. ज्यात सर्व लोक परस्परांशी मिळून मिसळून राहतील आणि बौद्धिक गुलामगिरीतून सुद्धा मुक्त होतील.” कोर्टात खटल्यादरम्यान भगतसिंग म्हणतात, ” आम्ही असेम्ब्लीत याकरिता मोकळ्या जागेत बॉम्ब फेकला की इन्कलाब जिंदाबाद आणि साम्राज्यवाद मुर्दाबाद यांचा जो अर्थ सामान्यपणे समजला जातो तो आम्हाला अभिप्रेत नाही. पिस्तूल आणि बाँम्ब क्रांती घडवू शकत नाहीत, तर क्रांतीची तलवार विचारांच्या सहाणेवर धारदार होते आणि हेच आम्हाला जाहीरपणे सांगायचे होते.”

सर्वच धर्माबद्दल देखील भगतसिंगांनी अगदीच रोखठोक मते मंडळी आहेत. धर्म कोणताही असो तो माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही हे त्यांचे सूत्र होते. “देशाला संपूर्ण क्रांतीपर्यंत पोहोचण्यात धर्म आड येत नाही का? ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही केवळ मातीचा पुतळा आहे, असे मुलांना सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमजोर बनविणे आहे. त्यांच्या हृदयातील शक्ती नष्ट करणे आहे. मंदिर हे सर्वांवर प्रेम करणाऱ्या परमेश्वराची पूजा करण्यासाठी आहे पण तिथे अस्पृश्यने प्रवेश केल्याने ते अपवित्र होते देवाचा कोप होतो हे आश्चर्य आहे. सनातन धर्म हा भेदभाव करण्याच्या बाजूने आहे. स्पृश्य-अस्पृश्यतेला ज्यांनी नकार दिला त्या स्वामी दयानंदांनाही चातुर्वर्ण्य ओलांडून जाता आलं नाही. भेदभाव आहे तसाच राहिला. गुरुद्वारामध्ये जाऊन शीख ‘राज्य करेल खालसा’ असे गाणे गात असतील आणि बाहेर येऊन प्रातिनिधिक राज्याच्या गप्पा करीत असतील तर त्याला काय अर्थ आहे? मुस्लिम धर्म म्हणतो की इस्लामवर विश्वास नसलेल्या काफिरांना तलवारीने कापून काढले पाहिजे आणि मग दुसरीकडे एकतेचा पुकारा केला तरी त्याचा परिणाम काय होणार?

धर्म आणि राजकारण याबद्दल भगतसिंग लिहितात की “धर्माला जर राजकारणापासून वेगळे ठेवले तरच आपण सर्व एक होऊ शकतो. धार्मिक दृष्ट्या भले आपण वेगवेगळ्या धर्मात असू, परंतु त्यामुळे काही बिघडणार नाही.” १९२८ मध्ये भगतसिंगांनी ‘धार्मिक दंगली व त्यावरील उपाय’ या शीर्षकाच्या लेखात, “ह्या धर्मांध दंगली भारताची कधी पाठ सोडणार? थंड डोक्याने विचार करणारा हिंदू-मुस्लिम किंवा शिख तरुण आज अपवादानेच दिसतो. धर्मांध दंगलींमागे धर्मांध नेते व वृत्तपत्रे (प्रसार माध्यमे) यांचा हात आहे.” हे त्यांचे ९० वर्षांपूर्वीचे विचार आजही तंतोतंत लागू पडतात.
अस्पृश्यता निवारणाबद्दल भगतसिंग म्हणतात, “आपला देश खूप अध्यात्मवादी आहे. परंतु आम्ही मनुष्याला मनुष्याचा दर्जा देण्यासाठीही कचरतो. आपण आरोप करतो की परदेशात आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही आणि ब्रिटिश शासन आम्हाला ब्रिटिश नागरिकांप्रमाणे दर्जा देत नाही. परंतु काय आम्हाला अशी तक्रार करण्याचा अधिकार आहे? निश्चितच नाही.” पुढे ते म्हणतात, “कुत्रा आपल्या मांडीवर बसू शकतो, आपल्या स्वयंपाकघरात तो बिनदिक्कत फिरू शकतो; पण ,एका माणसाचा आपल्याला स्पर्श झाला की लगेच धर्म भ्रष्ट होतो. आज मालवीयजींसारखे मोठे समाजसुधारक जे स्वताला अस्पृशांचे प्रेमी आणि बरेच काही समजतात, ते आधी एका भंग्याच्या हस्ते गळ्यात हार घालून घेतात पण नंतर कपड्यांसहित स्नान केल्याशिवाय स्वतःला पवित्र समजत नाहीत पाहिलेत? अशी असतात बेरकी माणसे.”

अस्पृश्यतेवर भगतसिगांनी जे पुढील लिखाण केले आहे ते आज वाचून माणूस थक्क होऊन जातो. ते म्हणतात, “जर तुम्ही माणूस असूनही अस्पृशांना पशुहूनही हीन समजत असाल, तर ते नक्कीच दुसऱ्या धर्माचा आश्रय घेतील, जिथे त्यांना जास्त अधिकार मिळतील, जिथे त्यांच्याशी माणसासारखा व्यवहार केला जाईल. मग ख्रिश्चन आणि मुसलमान हे हिंदू धर्माला इजा करतात असे म्हणणे तर्कहीन आहे.” हे त्यांचे विचार तंतोतंत खरे ठरले आणि पुढे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला. आपल्याच धर्मातील लोकांना त्रास द्यायचा, हीन लेखायचे आणि त्यांनी ह्या जाचाला कंटाळून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला की मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांना तुम्ही आमच्या हिंदूंचे धर्मपरिवर्तन करता म्हणून त्यांना दोष द्यायचा हेच आजही सुरु आहे.भगतसिंग म्हणतात “आम्हाला वाटते की अस्पृश्यांचे स्वतः चे लोकप्रतिनिधी असावेत. त्यांनी स्वतः साठी ज्यादा अधिकार मागावेत. आमचे तर स्पष्ट मागणे आहे की अस्पृश्य मानलेल्या सर्व लोकसेवकांनी आणि लोकांनी जागे व्हावे व आपल्या इतिहासाचा अभ्यास करावा. गुरु गोविंदसिंगांच्या फौजेचे खरे सैनिक तुम्हीच होतात. शिवाजी महाराज तुमच्या मुळेच सर्वकाही करू शकले ल त्यामुळे आजही त्यांचे नाव घेतले जट्टे. तुमची बलिदान सोन्याच्या अक्षरात लिहिलेली आहेत.”

भगतसिंगांच्या असामान्यत्वाबद्दल आणि अत्युच्च देशभक्ती याबाबतीत एक प्रसंग फार बोलका आहे. क्रांतिकारकांचे कायदेविषयक सल्लागार श्री. प्राणनाथ मेहतांनी फाशीच्या दोन दिवस आधी त्यांना कळवळून विनंती केली की, या तिघांनीही सरकारकडे दयेचा अर्ज द्यावा, हे ऐकून राजगुरू, सुखदेव खवळले पण भगतसिंगांनी शांतपणे त्यांना मसुदा तयार करून आणायला सांगितला व मेहतांनी तो आणताच भगतसिंग त्यांना बोलले, “तुमचा मसुदा राहू दे, हा पहा” हे बोलून त्यांच्या हातावर एक पत्राची प्रत ठेवली. फासावर लटकावले जाण्यापूर्वी तीन दिवस आधी, म्हणजे २० मार्च १९३१ रोजी, सरदार भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू यांनी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या सुपरिन्टेंडंटच्या हस्ते पंजाबच्या गव्हर्नरला पत्र पाठवले होते. “आम्हाला युद्धबंदी मानले जावे आणि फासावर चढवण्यापेक्षा बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावे.” अशी मागणी या वीरांनी त्या पत्रात केली होती. ह्या असामान्य हिंमतीची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. ते फाशी गेले पण दयेचा अर्ज केला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची खरी तळमळ, स्वतः च्या विचारांवरील निश्चल श्रद्धा, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी टोकाची त्यागभावना यामुळे भागतसिंगांमध्ये एक असामान्य निर्भयता आलेली होती. शेवटच्या क्षणी भगतसिंगांनी प्राणनाथ मेहतांना सांगीतले होते की, “माझ्या खटल्यात जातीने लक्ष घालण्याकरिता जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्र बोस यांना माझ्याकडून धन्यवाद सांगा.”

भगतसिंगांच्या नावाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे महात्मा गांधींना बदनाम करण्यासाठी. भगतसिंगां फाशी थांबिविण्यासाठी गांधींनी काय केलं अस विचारणाऱ्या कट्टरवाद्यांना खरेतर भगतसिंगांबद्दल काहीच सोयरसुतक नसत. भगतसिंग हे कम्युनिस्ट विचारधारेचे म्हणजेच गांधी विरोधकांच्या विरुद्ध विचासरसारणीचे. या विरोधकांनी किंवा यांच्या नायकांनी -संघटनांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी कधीच काही केलेलं नसते. यांनी इंग्रज सरकारला एखाद पत्र लिहिलेलं नाही की व्हाइसरॉय ची एखादी भेट घेतलेली नाही, भगतसिंगांना वकील दिला नाही, एखाद आंदोलन केलं नाही किंवा साधा निषेध नोंदविल्याचा सुद्धा इतिहासात उल्लेख नाही. प्रयत्न सोडा उलट ब्रिटिशांच्या काळ्या यादीत येऊ नये म्हणून भगतसिंगांपासून कायम कोसो दूर राहिले. प्रयत्न केले असते आणि ते यशस्वी झाले नसते हे समजू शकतो. फाशी होण्याआधी सोडा पण फाशी झाल्यानंतर सुद्धा यांनी साधी प्रतिक्रियाही दिली नाही. परंतु जनतेमध्ये गांधींबद्दल द्वेष रुजवणे इतकाच त्यांचा उद्देश असतो. गांधींनी भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून वरील व्हॉईसरॉय आयर्विन यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी चर्चा तर केलीच सोबतच आयर्विन यांना गांधीजींनी 5 पत्रेसुद्धा लिहिलीत. ती गांधी वाङ्ममयात उपलब्ध आहेत. प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ सन्याल हे स्वतः भगतसिंगांचे सहकारी होते. त्यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्दल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे व गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदविली आहे. ‘१९२१ ते १९४२ हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ‘ऍन इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात लिहिल्या गेलाय त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग’ अजून कुठला पुरावा हवाय?
स्वतः भगतसिंगांची सुद्धा आपली फाशी रद्द व्हावी अशी इच्छा नव्हती.

ब्रिटिशांविषयी भारतीय जनतेत असलेला असंतोष आपण मृत्युदंड पत्करल्याने आणखी तीव्र होईल असा त्यांना विश्वास होता. यासाठीच आपल्या आईला व इतर नातेवाईकांना पत्रातून किंवा ते भेटीला आले असतांना “माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करून माझ्या देशभक्तीला कमीपणा आणू नका” असेच ते विनवत राहिले. ३० सप्टेंबर १९३० रोजी भगतसिंगांचे वडील किशनसिंह यांनी विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) अर्ज करून बचाव करण्याची संधी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी भगतसिंगांनी ४ ऑक्टोबर १९३० रोजी वडिलांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी कठोर शब्दात व्यक्त केली होती.

भगतसिंगांचे क्रांतिकारक सहकारी शिववर्मा यांनी २३ मार्च १९८५ रोजी पुण्यातील जाहीर सभेत सांगितले होते की, “लोकांसमोर भगतसिंगांची प्रतिमा हातात पिस्तूल घेतलेला अशी आहे, पण मी प्रत्यक्षात पाहिलेल्या भगतसिंगांच्या लांब, ढगळ कोटाच्या एका खिशात पिस्तूल असे, तर दुसऱ्या खिशात पुस्तक. तो नेहमी वाचनात गढलेला असे.” शिववर्माच्या ‘संस्मृतिया’ या पुस्तकात त्यांनी ही आठवण नोंदविलेली आहे. इयत्ता चौथीत असतांना भगतसिंगांनी त्यांचे काका सरदार अजितसिंग, लाला लजपतराय व अन्य नेते आणि राजकीय घडामोडी याविषयीच्या कात्रणाच्या फाईल्स वाचून काढल्या होत्या. तसेच सरदार अजितसिंह, सुफी अंबाप्रसाद आणि लाला हरदयाळ त्यांनी लिहिलेल्या सामाजिक-राजकीय विषयांवरील किमान पन्नास पुस्तकांचे वाचन भगतसिंगांनी केलेले होते.
लाहोरच्या द्वारकाप्रसाद लायब्ररीच्या ग्रंथपालापासून भगतसिगांच्या क्षणापर्यंत चे अनेक जण या गोष्टीला साक्षीदार आहेत की, भगतसिंग हे एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व होते. जतिन्द्रनाथ सन्याल यांनी त्यांच्या ‘अमर शहीद सरदार भगतसिंह’ या पुस्तकात म्हंटले आहे की, “देशातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या त्यावेळच्या अभ्यासू राजकीय व्यक्ती काढल्या, तर भगतसिंग त्यांपैकी एक होते.

भगतसिंगांनी लाहोरच्या तुरुंगाचे रूपांतर जणू एखाद्या विश्वविद्यालयात केले होते असे वर्णन केले गेले आहे. भगतसिह सतत एव्हडी पुस्तके मागवताना पाहून तुरुंग अधिकाऱ्याने त्यांना एकदा विचारले होते की, “एव्हढी पुस्तके तुम्ही वाचता, की नुसती पाहून परत पाठवता? त्यावेळी भगतसिंगांनी शांतपणे उत्तर दिले होते की, “मी वाचलेल्या पुस्तकांपैकी कोणतेही पुस्तक मागवा आणि त्यातल्या कोणत्याही प्रकरणाचे शीर्षक सांगा. त्यातील मुख्य आशय मी तुम्हाला सांगतो.” अगदी आयुष्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी आपले कायदेसल्लागार प्राणनाथ मेहतांकडून लेनिन यांचे चरित्र मागवून घेतले होते. त्यांना फाशीची घेऊन जायला आलेल्या अधिकाऱ्याला “थांबा , एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकांची भेट घेत आहे” असे उत्तर दिले होते आणि त्यावेळी ते लेनिनचे चरित्र वाचत होते.

भगतसिगांना जशी समाजातील अनेक रूढी-परंपरा अत्यंत चुकीच्या आणि अन्यायकारक आहेत याची जाणीव होऊ लागली तसा त्यांनी त्या अन्याकारक रूढी-परंपरांवर टीका करायला आणि विरोध करायला सुरुवात केली. लोकांना त्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावरच त्यांनी ‘मी नास्तिक का झालो?’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी नास्तिकत्त्वाची व्याख्या लिहिली आहे. “जो देवावर विश्वास नाही असे म्हणतो तो खरा नास्तिक नाही. कारण ज्या देवावर तो अविश्वास दाखवत असतो त्याच देवाचे अस्तित्व तो अप्रत्यक्षपणे मान्य करीत असतो. पण खरा नास्तिक तोच असतो जो देवाचे अस्तित्वच नाकारत असतो.” ते स्वतः जरी नास्तिक होते तरीही त्यांनी नेहमीच इतर धर्मांचा आदर केला. कोणत्याही दुसर्‍या धर्माचा द्वेष केला नाही. एखादी व्यक्ती आपल्या धर्माची नाही म्हणून तुम्ही जर त्याचा द्वेष करत असाल तर माझं तुमचं नातं जुळू शकत नाही असं ते म्हणत.
भगतसिंग कोणत्याही मताला घेऊन कट्टरवादी नव्हते. परिवर्तनवादी विचारसरणीचे होते. युवकांनी दैववादी (नशिबावर विश्वास ठेवणारे) न बनता प्रयत्नवादी-विज्ञानवादी बनले पाहिजे आणि त्यांनी भावनाप्रधान न होता, मनाने विचार न करता डोक्याने विचार केला पाहिजे याकरिता ते आग्रही होते. ‘विश्वबंधुता’ याचा अर्थ मी जगामध्ये समानता, साम्यवाद याशिवाय दुसरे काही मानत नाही,असे त्यांचे मत होते. देशासमोर धर्म-जात, पक्ष,संघटना, नेते सर्व गौण असल्याचे त्यांचे स्पष्ट मत होते. ही वरील जी काही भगतसिंगांची मते सांगीतलेली आहेत ती जर तुम्हाला पटत असतील, तुम्ही त्यानुसार वागत असाल कींवा स्वतःत बदल घडवून त्यानुसार वागण्याकरिता तयार असाल तर आणि तरच तुम्ही भगतसिंगांचे खरे वैचारिक वारसदार होऊ शकता.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६