तंत्रज्ञानाचा बादशहा स्टीव्ह जॉब्स

24

आजच्या टेक्नोसॅव्ही युगात मोबाईल, आयफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप ही उपकरणे वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्टीव्ह जॉब्स हे नाव माहीत नसेल हे अशक्यच आहे. स्टीव्ह जॉब्स ज्याने ऍपल ही कंपनी सुरू केली आणि ती आज जगातील सर्वात यशस्वी कंपनी बनवली, त्याच ऍपल कंपनीचा संस्थापक, तंत्रज्ञानाचा बादशहा स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन.स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ रोजी अमेरिकेतील ग्रीन बे या गावी झाला. सिरियाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह व जोहान शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल एका अनाथालयाला दिले. तेथून पॉल – क्लारा जॉब्स या आर्मेनियन कुटुंबाने त्याला दत्तक घेतले. दत्तक घेताना या कुटुंबाने या मुलाला पदवी पर्यंतचे शिक्षण देईल आणि सुखात ठेवेल असे वचन दिले; पण जॉब्स दांपत्य गरीब असून ते मजुरी करत आहेत, हे समजल्यावर स्टीव्हच्या मातापित्यांनी त्यावर आक्षेप घेतला.

सहा महिन्यांच्या चर्चेनंतर ते स्टीव्हला जॉब्स दांपत्याला दत्तक द्यायला तयार झाले. स्वतः गरीब असून, मोलमजुरी करूनही जॉब्स दांपत्याने दिलेले वचन पूर्ण केले. लहानपणी स्टीव्ह एकलकोंडा होता. आपण कोणालाच नको आहोत, अशी त्याची भावना बनली होती. हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्युलेट पॅकर्ड या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. जिथे त्याची स्टीव्ह व्होजनियाकसोबत ओळख झाली. तेंव्हा स्टीव्ह जॉब्स १६ वर्षाचा तर स्टीव्ह व्होजनियाक २१ वर्षाचा होता. दोंघांची मैत्री होण्याचे कारण म्हणजे दोघांना तंत्रज्ञानाची आवड होती. व्होजनियाकने व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व मायक्रोप्रोसेसर बनवला होता. स्टीव्ह जॉब्सला त्याच्यावर खूप विश्वास होता. १९७० नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे बदल व प्रयोग होत होते. नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांनी ही संधी साधून १९७६ मध्ये व्होजनियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदारी सोपवली आणि स्वतः मार्केटमध्ये लक्ष घातले. कॉम्प्युटर तयार झाला.

कंपनी देखील बनली. कंपनी रजिस्टर करायची पण कोणत्या नावाने हा प्रश्न होता. अनेक नावे समोर आली पण ती स्टीव्हला पसंत पडली नाही. त्याच्या घरासमोर सफरचंदाचे झाड होते. एका सकाळी त्याने झाडाचे सफरचंद तोडून खायला सुरवात केली आणि त्याला कंपनीचे नाव सुचले ऍपल. पुढे याच नावाने कंपनी रजिस्टर झाली. त्यांना लगेच ५० कॉम्प्युटरची ऑर्डरही मिळाली. अशा प्रकारे वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटर क्षेत्रात शिरला आणि एका कंपनीचा मालक बनला. त्याच्याकडे तंत्रज्ञानाची पदवी नव्हती ; पण कल्पना होत्या. मॅनेजमेंटचे कौशल्य होते. त्याने तंत्रज्ञानात तरबेज असणारी माणसे निवडली. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत त्याने एकापेक्षा एक अत्याधुनिक आणि सरस उत्पादने धुमधडाक्यात उतरवली. त्याने बाजारपेठेत आणलेल्या ऍपल 1 पीसी या पर्सनल कॉम्प्युटरला खूप मागणी होती. कंपनी चालवताना स्टीव्ह ने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले; पण हे करताना त्याने अनेकांची मने दुखावली. त्यामुळे सहकाऱ्यांशी त्याचे मतभेद वाढले. शेवटी त्याने आपणच स्थापन केलेली ऍपल कंपनी सोडली.

१९८६ मध्ये त्याने चित्रपट दिग्दर्शक जॉर्ज लुकास सोबत भागीदारी करून एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचे नाव पिक्सार असे होते. या कंपनीने ऍनिमेशन सिनेमे बनवले. ते खूप गाजले. या कंपनीने वॉल्ट डिस्ने सोबत करार केल्याने या कंपनीने खूप पैसे कमावले. इकडे स्टीव्ह जॉब्स सोडून गेल्यापासून ऍपल कंपनी मात्र तोट्यात आली. आयबीएम, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांपुढे ऍपलचा निभाव लागत नव्हता. अखेर १९९७ ला स्टीव्ह जॉब्स पुन्हा ऍपलमध्ये परतले. आपल्या कल्पक बुद्धीने त्यांनी ऍपलला पुन्हा अव्वल स्थानी पोहचवले. आयबीएम, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी कॉम्प्युटरमध्ये मक्तेदारी सिद्ध केल्याने काही तरी नवे करण्याची उर्मी स्टीव्हला आली त्यातूनच त्याने आयफोन, आयपॉड, आयपॅड बाजारात सादर केले. त्यांच्या या दुरदर्शीपणाला जगाने सलाम केला. २००१ मध्ये ऍपलने ५ गिगाबाईट क्षमतेचा आयपॉड तयार केला. हा सर्वात लहान म्युजिक प्लेयर होता. त्यात एक हजार गाणी स्टोअर करता येत. हा आयपॉड अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या आयपॉडने वॉकमनला कायमचे घरी बसवले. २००७ मध्ये ऍपलने टचस्क्रीन मोबाईल मार्केटमध्ये आणला. टचस्क्रीन आणि अतिशय सोप्या इंटरफेसमुळे तो खूप लोकप्रिय झाला.

थ्री जी मोबाईल देखील ऍपलनेच सर्वप्रथम सर्वात आधी मार्केटमध्ये आणला. २०१० मध्ये आलेल्या पहिल्या टॅबलेट पीसीने जगभरातील गॅजेट प्रेमींना वेड लावले. सतत नवीन काहीतरी करून तंत्रज्ञानात आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांना भारताविषयी खूप प्रेम होते. ते अनेकदा भारतात येऊन गेले. भारतातील अध्यात्म आणि बौद्ध धर्माविषयी त्यांना खूप कुतूहल होते. नवनिर्मितीचा ध्यास, तंत्रज्ञानाची आवड, मार्केटिंगमधील कौशल्य, सतत शिखरावर राहण्याची जिद्द या गुणांमुळे स्टीव्ह जॉब्स हा जागतिक कीर्तीचा तंत्रज्ञ ठरला. त्याचा प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक बिल गेटदेखील त्याच्या या गुणांची कदर करायचा. बिल गेटने तर त्याला आधुनिक युगाचा एडिसन अशी पदवी दिली. ५ ऑक्टोबर २०११ रोजी वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी तंत्रज्ञानाच्या या बादशहाने जगाचा निरोप घेतला. तंत्रज्ञानाच्या या बादशहाला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५