ग्रामीण भागांतील वीज जोडणी पूर्ववत करणे व पथदिप त्वरित सुरु करणे बाबत मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

24

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.5ऑक्टोबर):-महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांचा आदेशाने आज मनसे तर्फे ग्रामीण भागांतील वीज जोडणी पूर्ववत करणे व पथदिप त्वरित सुरु करणे बाबत मनसेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील टाळेबंदी काळात महावितरण कंपनी कडुन वीज वापरापेक्षा तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी वीजबिले पाठवली गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांमधील संतापाची दखल घेत याबाबत सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडले. राज्याचे उर्जामंत्री मा. ना. नितीन राऊत यांनी कृषी पंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत वीजबिल टप्प्या-टप्प्याने भरण्यास मुभा दिली असून थकबाकी वसुलीसाठी कृषी पंपांची वीज जोडणी तोडू नका अशा सूचना दिल्या आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात थकीत वीजबिलाच्या वसुलीकरिता कृषी पंपाना दिलेली वीज जोडणी खंडित करण्यात येत आहे जे पूर्णपणे अन्यायकारक आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कृषी वीज जोडणी खंडित करण्याची ही मोहीम तात्काळ थांबविण्यात यावी तसेच खंडित केलेल्या कृषी पंप जोडण्या त्वरित जोडून द्याव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांतील पथदिप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून या बाबत महापारेषण अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता जिल्हा परिषद तर्फे भरण्यात येत असलेले पथदिपांचे बिल देण्यात आले नसल्याने पथदिप बंद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. शासनाच्याच दोन विभागांत असलेल्या संवादा अभावी ग्रामीण भागातील जनतेला विनाकारण अंधारात रहावे लागत आहे.

सध्या अनेक गांवांतील वस्त्यांमध्ये बिबट्या व इतर हिंस्त्र श्वापदांचा वावर वाढला असून गांवातील नागरिक व विशेषतः महिला वर्ग भीतीच्या सावटाखाली जगत असून शेतीची कामेही खोळंबलेली आहेत. ग्रामीण भागातील वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबविण्यात यावी व तालुक्यातील गावांमधील पथदिप तात्काळ सुरु करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदन आज मनसेच्या वतीने मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, उपजिल्हाध्यक्ष सुरेश घुगे, संतोष सहाणे, रमेश खांडबहाले, पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे, नाशिक तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, कळवण तालुकाध्यक्ष शशिकांत (दादा) पाटील, इगतपुरी तालुकाध्यक्ष मूळचंद भगत, सिन्नर तालुकाध्यक्ष विलास सांगळे, निफाड तालुकाध्यक्ष शैलेश शेलार, भगूर शहराध्यक्ष कैलास भोर, देवळाली शहराध्यक्ष गोकुळ जाधव, सिन्नर विधानसभा अध्यक्ष अॅड. दिलीप केदार, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अभिजित गोसावी, भूषण भुतडा आदि पदाधिकारी उपस्थित होते.