🔹शेतकरी संघटनेचे जिल्ह्यात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.5ऑक्टोबर):-चंद्रपूर जिल्हयासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पंचवीस हजार रुपये सरसकट मदत द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि राजुरा, कोरपणा, गोंडपिंपरी, भद्रावती, जिवती या तालुकास्थळी तहसिलदार यांना शेतकरी संघटनेद्वारे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

चंद्रपूर येथे मा. जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप, जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, माजी जि.प.सभापती नीलकंठ कोरांगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.ज्योत्स्ना मोहितकर,रमाकांत मालेकर,मधुकर चिंचोलकर,प्रविण एकरे, राजुरा येथे रमेश नळे,प्रभाकर ढवस,बंडू माणुसमारे,दिलीप देठे,बळीराम खुणे,निखिल बोंडे यांनी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांना मागण्यांचे निवेदन दिले. कोरपणा येथे युवा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲड.श्रीनीवास मुसळे, बंडू राजूरकर,अविनाश मुसळे,रमाकांत मालेवर,सुभाष तुरानकर,प्रवीण एकरे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. गोंडपिंपरी येथे तुकेश वानोडे, ॲड.प्रफुल्ल आस्वले, व्यंकटेश मल्लेलवार,डॉ.संजय लोहे,नीळकंठ गौरकार,भारत खामनकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. जिवती येथे सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाप्रमुख,देवीदास वारे,ईस्माईल भाई तालुकाध्यक्ष, उध्दवराव गोतावळे दलित आघाडी तालुकाध्यक्ष, नरसिंग हामणे आणि भद्रावती येथे सुधीर सातपुते, प्रकाश आस्वले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्हयासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात जून ते सप्टेंबर या कालावधीत 95 टक्के पाऊस झाला आहे. काही भागात अतीवृष्टी, ढगफुटी व मुसळधार पावसामुळे राज्यातील सोयाबीन, कापूस, मूग, तूर व उडीद या उभ्या पिकाचे पावसाच्या, नाल्याच्या पुरामुळे व महापुरामुळे अतोनात नुकसान झाले असून महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटामुळे हवालदिल झालेला आहे. आधीच महाराष्ट्रात थकीत कर्जापायी शेतक-यांच्या आत्महत्या सुरू असून चालू खरीप हंगामात उभे पिक बुडाल्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे.

त्यामुळे शेतक-यांच्या मागण्यांची तातडीने परिपूर्ती करून शेतक-यांना यशाशिघ्र न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे चंद्रपुर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, सर्व शेतक-यांना राज्य आपत्ती निवारण निधीचे निर्देश बदलून एकरी २५००० रुपये मदत तातडीने देण्यात यावी, वन्यजीव सुरक्षा कायद्यात साप हा ” वन्य जीव ” असल्यामुळे साप चावून मरणा-या व्यक्तीच्या कुटुंबास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे ४,००,००० (चार लाख रु.) आर्थिक मदत तात्काळ देण्यात येऊन न्याय द्यावा, अशा मागण्या ना.मुख्यमंत्री, ना.महसूलमंत्री व ना.कृषिमंत्री यांचेकडे केल्या आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED