ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान

27

🔸कुटुंबातील सर्वांना मोबाईल साक्षर करा – संदीप खर्डेकर यांचे आवाहन

🔹माझ्या कन्येच्या सतर्कतेने तिची फसवणूक टळली

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

पुणे(दि.6ऑक्टोबर):- भारतातच नव्हे तर जगभर ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारात वाढ झाली असून आता घरातील मोबाईल वापरणाऱ्या सर्वांनाच मोबाईल साक्षर करण्याची वेळ आली असल्याचे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.रोजच वृत्तपत्रात सायबर गुन्हेगारांच्या कारवायांबद्दल वाचनात येते. तेव्हा फसविले गेलेले नागरिक कधी प्रलोभनाला बळी पडतात, तर कधी नको त्या मेसेज ला किंवा येणाऱ्या कॉल ला बळी पडतात असे निदर्शनास आले आहे.

काल माझ्या कन्येला चि. प्रणेती खर्डेकर हिला व्हाट्सअँप वर 25 लाखाची लॉटरी लागल्याचा मेसेज आला, सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, उद्योगपती मुकेश अंबानी व महानायक अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र असलेले पत्रक व एक व्हॉइस मेसेज देखील होता. प्रणेती ने लगेचच तो मेसेज मला फॉरवर्ड केला व त्या व्यक्ती च्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न दिल्याने तिची फसवणूक टळली.अनेक वेळा असे गुन्हेगार पकडले ही जात नाहीत किंवा त्यांची पाळेमुळे परदेशात आढळतात.

अश्या वेळी सामान्य नागरिक हतबल होतोच पण पोलिसांना ही या गुन्हेगारांचा माग काढणे अवघड होते. अश्या परिस्थितीत नागरिकांनी सजग राहणे व कुटुंबातील मोबाईल वापरणाऱ्या सर्वांचे प्रबोधन करणे व त्यांना संभाव्य धोक्यापासून सावध करणे गरजेचे असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन लवकरच एक मोहीम हाती घेईल असे ही श्री. खर्डेकर यांनी जाहीर केले.