शीख बांधवांना ‘सिंग’ उपनाम लागू!

32

(गुरू गोबिंदसिंग पुण्यतिथी सप्ताह विशेष)

शीख धर्माच्या १० गुरूंपैकी जे शेवटचे मानव गुरू होते. कुशल योद्धा आणि आध्यात्मिक संत असा अलौकिक संगम ज्यांच्या ठायी होता. आपल्या कारकीर्दीत ज्यांनी शीख धर्माची ध्वजा नव्या उंचीवर नेली. त्यामुळेच शीखांमध्ये ज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या शीखांच्या दहाव्या गुरुंचा म्हणजेच गुरु गोबिंदसिंग यांचा आजपासून पावन स्मृती दिन सप्ताह आहे. त्यानिमित्त बापू उर्फ श्रीकृष्णदास निरंकारी यांच्या लेखणीतून त्यांना त्रिवार वंदन! – संपादक.

गुरू गोबिंदसिंग यांचा जन्म दि.२ डिसेंबर १६६६ रोजी बिहार राज्यातील पाटण्यात झाला. त्यांचं बालपणीचं नाव गोबिंद राय होतं. त्यांनी पहिली चार वर्षे पाटणा येथेच घालवली. गुरू गोबिंदसिंग यांचं कुटुंब सन १६६०ला पंजाबला गेलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी ते हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये असलेल्या ‘चक्क नानकी’ या ठिकाणी गेलं. हल्ली त्यास ‘आनंदपूर साहिब’ म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झालं. त्यांनी संस्कृत आणि पर्शियन भाषेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतलं. राजा भीमचंद यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी आनंदपूर साहिब सोडून ते टोका शहरात गेले. त्यानंतर त्यांना मतप्रकाश यांनी त्यांच्या राज्यात आमंत्रित केलं. त्यांना पाओन्टा येथे किल्ला बांधून दिला. या किल्ल्यात त्यांचं सुमारे तीन वर्षे वास्तव्य होतं. या वास्तव्यात त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली.

गुरू गोबिंदसिंग हे संतकवी तथा अनेक भाषांचे जाणकार आणि अनेक ग्रंथांचे रचनाकारही होते. ‘गुरू ग्रंथ साहिब’ या त्यांच्या पवित्र ग्रंथाचं लेखन त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या दरबारात नेहमी ५२ कवी आणि लेखक उपस्थित असत, म्हणूनच त्यांना ‘संत सिपाही’ असंही म्हणतात. या शिवाय त्यांना दशमेश, बजनवाले, कलगीधर अशा अनेक उपाध्यांनी जनतेने गौरवलं होतं. आपल्या आधीच्या गुरूंचं कार्य यशस्वीपणे पुढे नेत असतानाच त्यांनी शीख धर्माला शौर्याचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं. त्यामुळे शीख धर्मात त्यांचं स्थान अत्यंत महत्वाचं ठरलं आहे. आपल्या पश्चात आपला गुरूपदाचा वारसदार म्हणून कोणाची निवड न करता गुरूंनी लिहिलेल्या आणि स्वतः त्यांनी पूर्ण केलेल्या ग्रंथ साहिबालाच पुढे कायमस्वरूपी गुरू मानण्याचा आदेश शीख धर्मीयांना दिला. तेव्हापासून शीख समुदाय गुरूद्वारांमध्ये निरंतर गुरू ग्रंथ साहिबापुढे नतमस्तक होतो.

गुरु गोबिंदसिंगांना तीन पत्नी होत्या. त्यांचा पहिला विवाह दहा वर्षाचे असताना माता जीतोशी यांच्याशी झाला. त्यांना जुझारसिंग, जोरावरसिंग, फतेहसिंग अशी तीन मुले होती. त्यांचा दुसरा विवाह वयाच्या सतराव्या वर्षी माता सुंदरी यांच्याशी झाला. त्यांच्यापासून अजितसिंग नावाचा एक मुलगा झाला. दि.१५ एप्रिल १७०० रोजी वयाच्या तेहतीसव्या वर्षी त्यांनी माता साहिब देवानशी लग्न केलं. त्यांच्यापासून त्यांना कोणतंही मुल झालं नाही. धर्मोद्धारासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला. त्यामुळे त्यांना सर्बानसंदानी देखील म्हटलं जातं.
दि.११ नोव्हेंबर १६७५ रोजी औरंगजेबाने गुरू गोबिंदसिंग यांच्या वडिलांचा म्हणजेच शिख बांधवांचे नववे गुरू तेग बहादूरसिंग यांचा दिल्लीच्या चांदनी चौकात शिरच्छेद केला. त्यानंतर गोबिंदसिंग यांना दि.२९ मार्च१६७६ रोजी बैसाखीच्या दिवशी दहावा गुरु म्हणून घोषित करण्यात आलं. या नवनियुक्त गुरूंनी शीख धर्मावर होणाऱ्या आक्रमणाविरोधात शीख फौज निर्माण करण्याच्या उद्देशाने खालसा पंथाची स्थापना केली. सन १६९९ साली बैसाखी सणाच्या दिवशी त्यांनी ‘खालसा’ पंथ स्थापन केला. बलिदानाची तयारी असणाऱ्या पहिल्या पाच अनुयायांपासून त्यांनी या पंथाची सुरूवात केली. तेव्हापासून शीख पुरूष आपल्या नावामागे सिंग म्हणजेच सिंह हे उपनाम लावू लागले. केश, कंगा, कडा, कृपाण, कच्चेरा या पाच ‘क’कारांचं महत्त्व पटवून शिखांना नियम समजावून सांगितले. आपल्या झंझावाती कारकीर्दीत त्यांनी मोंगल तसंच शिवालिक टेकड्यांवरच्या आक्रमकांसोबत चौदा युद्धं लढली. सन १६८७ला नादौनच्या लढाईत ते, भीमचंद, इतर सहकारी आणि पहाडी राजांच्या सैन्यांनी मिळून अलीफ खानसह त्याच्या सैन्याचा पराभव केला.

सन १६९५मध्ये लाहोरच्या दिलावर खानाने आपला मुलगा हुसेन खान याला आनंदपूर साहिबवर हल्ला करायला पाठवलं. या युद्धात त्यावेळी मुघल सैन्याचा पराभव झाला. हुसेनच्या म़त्यूनंतर दिलावर खानाने जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिकला पाठवलं. मात्र त्यांचादेखील गुरूंनी पराभव केला. पहाडी प्रदेशात सातत्याने असा पराभव होत असल्यानं मुघल बादशाह औरंगजेब चिडला. मुघलांना धूळ चारत गुरू गोबिंदसिंग जेव्हा चमकौर येथे पोहोचत होते, तेव्हा सरसा नदी पार करताना माता गुजरी आणि आपले दोन्ही लहानगे पुत्र साहबज़ादे झोरावरसिंग आणि फतेहसिंग यांच्याशी ताटातूट झाली. त्यांची ती कोवळी बालकंही वडिलांप्रमाणेच शूरवीर होती. गद्दारीचा फटका बसल्याने छोटे साहबजादे जोरावरसिंग आणि फतेहसिंग मुघलांच्या हाती लागले. या दोन्ही बालकांना सरहिंदच्या नवाबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला. मात्र दोन्ही चिमुकल्यांनी मोठ्या निर्भीडपणे आपला धर्म सोडण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या नवाबाने नऊ वर्षांच्या झोरावरसिंग आणि सहा वर्षांच्या फतेहसिंग यांना भिंतीत जिवंत लिंपून ठार करण्याची शिक्षा दिली. दि.२७ डिसेंबर १७०४ रोजी दोन्ही साहबज़ाद्यांना भिंतीत गाडून टाकलं गेलं. धर्मासाठी बलिदान देत या गुरूपुत्रांनी शौर्याचं प्रमाण दिलं.

गुरू गोबिंदसिंग यांना जेव्हा आपल्या मुलांच्या बलिदानाबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा म्हणजेच विजयाचं पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी औरंगजेबाला खालसा पंथ मुघल साम्राज्य नष्ट करण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. हे त्यांच्या मुत्सद्देगिरीची साक्ष देतं. या पत्रात शौर्यपूर्ण लिखाण, आध्यात्मिक ज्ञान, कूटनीती यांची काव्यात्मक सांगड अत्यंत प्रभावीपणे घातली होती. त्यातून उत्तर भारतातील परिस्थिती, शीखांची ताकद याचं मर्मभेदी वर्णन केलं होतं. हे पत्र आपला बंधू दयासिंग यांच्याकरवी औरंगजेबाला पाठवण्यात आलं. ज्यावेळी अहमदनगर येथे आजारग्रस्त औरंगजेबाने हे पत्र वाचलं, त्यावेळी त्याला आपल्या चुकूची जाणीव झाली. त्याने गुरू गोबिंदसिंग यांची माफी मागण्याच्या उद्देशाने सन्मानपूर्वक आमंत्रित केलं.मात्र त्यांच्याशी भेट होण्यापूर्वीच नैराश्यग्रस्त औरंगजेबाचा मृत्यू झाला. दरम्यान दि.८ मे १७०५ रोजी मुक्तसर येथे झालेल्या भयंकर युद्धातही त्यांनी विजय मिळवला. औरंगजेबाच्या भेटीसाठी दक्षिणेकडे निघाले असतानाच त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बहादुरशाह याने त्यांच्यासह शीख धर्मीयांशी चांगले सौहार्द्राचे संबंध ठेवले.

याच संबंधांमुळे घाबरलेल्या नवाब वाजीत खान याने गुरू गोबिंदसिंग यांच्यावर हल्ला करविला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुरूंनी वयाच्या ४२व्या वर्षी दि.७ ऑक्टोबर १७०८ रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे पावन पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने त्यांना व त्यांच्या लोककल्याणकारी कार्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संतचरणधूळ -‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी(संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, गडचिरोली.जि. गडचिरोली, भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com