जैतपिर विद्यालयात २२ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

31

🔹’सायकल बँक’- युवकमित्र परिवार संस्थेचा उपक्रम

✒️प्रतिनिधी धरणगाव(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.20ऑक्टोबर):-जैतपिर ता. अमळनेर येथील के.पी.सोनार माध्यमिक विद्यालयात धानोरा येथून दररोज पायी येणाऱ्या २२ आदिवासी विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार,पुणे या संस्थेकडून मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कळमसरे येथील पत्रकार हिरालाल पाटील,शाळेचे संचालक पवन माळी, दीपक भागवत,सागर लहानगे,धानोरा येथील सरपंच दिलीप ठाकरे,जैतपिरचे सरपंच पंकज देशमुख,योगप्रचारक कमलेश कुलकर्णी हे उपस्थित होते.

युवकमित्र परिवार ही संस्था पुणे,मुंबई शहरामध्ये जुन्या सायकलींचे संकलन करते व सायकली दुरुस्त करून ग्रामीण भागातील शाळांमध्ये लांब पायी जाणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ‘सायकल बँक उपक्रमांतर्गत’ मोफत वाटप करते.या वर्षी या उपक्रमातर्गत एक हजार सायकली वाटपाचा मानस असल्याचे यावेळी युवकमित्रचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी सांगितले.

मारवड पो.स्टे. चे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांनी विद्यार्थ्यांना गरिबीचा बाऊ न करता प्रचंड अभ्यास करत यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला तसेच सायकलींचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल बाविस्कर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यध्यापक मुकेश अहिरे,शिक्षक जयेश जगताप,किरण हटकर,जयेश सोनवणे,आकाश पावरा,श्री रावसाहेब मासुळे शिक्षिका छाया जाधव,सोनाली मोरे,पल्लवी पाटील यांचे सहकार्य लाभले.तर उदयसिंग पाटील,प्रतीक चौधरी यांनी परिश्रम घेतले.