संत नामदेव महाराज यांची 26 ऑक्टोबर 2021 या जयंती निमित्त या लेखाच्या माध्यमातून शुभेच्छापर त्यांचे कार्य आणि कर्तृत्व यांचा आढावा घेणारा हा लेख..

        संत नामदेव महाराजांनी वारकरी धर्म आणि कीर्तन परंपरा सुरू केलेली आहे.

“बोलू ऐसे बोले।जेणे बोले विठ्ठल डोले ।। प्रेम सर्वागाचे ठायी ।वाचे विठ्ठल रखुमाई।।
परेहुनी परते घर।तेथे राहू निरंतर। सर्वांचे जे अधिष्ठान।तेचि माझे रूप पूर्ण ।।
 नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी ।सर्व सत्ता आली हाता।नामयाचा खेचर दाता।।

*१)*जन्म-बालपण*:

संत नामदेव महाराजांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० मध्ये दामाशेटो व गोनाई यांच्यापोटी पंढरपूर येथे झाला. त्यांच्या जन्माबाबत एक अभंग खालीलप्रमाणे आहे.

अधिक ब्यान्नव गणित अकराशते। उगवता आदित्य तेजोराशी । शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार । प्रभव संवत्सर शालिवाहन शके ।

प्रसवली माता मज मळसूत्री । तेव्हा जिब्हेवरी लिहिले देवे।

 संत नामदेवांचे मूळ गाव नरसी जि. हिंगोली, जे औंढा नागनाथ जवळ आहे. त्यांचे वडील शिंपी व्यवसायाच्या निमित्ताने आणि विठ्ठलाच्या भक्तीच्या ओढिने पंढरपूरला स्थायिक झाले होते. संत नामदेव महाराज ११ वर्षाचे असताना त्यांचे लग्न गोविंदसेठ सदावर्ते यांच्या राजाई सोबत झाला होता. संत नामदेव

महाराजांना नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल आणि लिंबाई ही पाच अपत्ये होती. 

*२.जागृतीसाठी कीर्तन* :

संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाच्या भक्तीसोबत लोकजागृती करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कीर्तन या माध्यमाची सुरुवात केली. म्हणजे कीर्तनाची सुरुवात करणारे संत नामदेव महाराज आहेत, अगदी सहज सोप्या शब्दांत ते लोकांच्या समस्या, अडचणी यावर योग्य तो पर्याय सांगत. तसेच जातीभेद, विषमता, कर्मकांड, अज्ञान, भेदभाव अशा बाबींवर त्यांनी प्रहार केला. समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सर्व बहुजन समाजातील लोकांना सोबत घेतले. संत नामदेव महाराजांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तन करीत असताना ते रोखून त्यांना मंदिराबाहेर हाकलून दिले. याचा उल्लेख अभंगामध्ये खालीलप्रमाणे आहे.

*हीन दीन जात मोरी पंढरी के राया। ऐसा तुमने नामा दर्जी कायकू बनाया*।।१॥

*टाळ बीना लेकर नामा राऊळ मे गया। पूजा करते ब्राह्मण ने बाहर ढकाया*।| २।।

हे घडत असतांना ही संत नामदेव महाराज मात्र थांबले नाहीत. त्यांनी पंढपूरला मंदिरात विरोध आहे म्हणून भिवरेच्या वाळवंटात कीर्तन सुरु केले. तेथे परिसरातून अनेक लोक एकत्रित येऊ लागले. संत नामदेवांनी कीर्तनातून विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला. वाणीत सत्यता, समता आणि मानवी प्रगतीचा संदेश असल्याने त्यांच्या कृतीविचारांचे अनुयायी वाढत होते. त्यांच्या कार्यास प्रेरित होवून संत सावता, संत ज्ञानेश्वर,संत नरहरी, संत सेना, संत गोरोबा काका,संत चोखोबा,संत बंका, संत जनाबाई, काशीबा गुरव या सर्वाना संत नामदेव महाराजांनी मार्गदर्शन करून सोबत घेतले.त्यांनी संत नामदेव महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपले कार्य करू लागले.

 *३.एक विठ्ठल प्रचंड* :-

पुराणात सांगितलेल्या तेहतीस कोटी देवी देवता हे थोतांड असून, कोणत्याही प्रकारचे कर्मकांड आवश्यक नसणारे विठ्ठल हे सर्व बहुजनांचे दैवत आहे.संत नामदेव गाथेत पुढीलप्रमाणे अभंग..

*आमचा एक विठ्ठल प्रचंड। 

इतर देवाचे न पाहू तोंड ।। १ ।। एका विठ्ठलावाचून । न करु आणिक भजन ।। २ ।।

आम्हा एकविध भाव । कडा न म्हणू इतर देव ।। ३।।

 नित्य करु अभ्यास । म्हणे नामा विठ्ठदास ।। ४।।.

       

     अज्ञानाच्या रूढी परंपरात, अंधश्रद्धा विषमतेच्या अंधकारात चाचपडणा-या बहुजन समाजाता ज्ञानाच्या माध्यमातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न संत नामदेवाने केला आहे.

संत नामदेव म्हणतात पूजा, अभिषेक, दक्षिणा, मंत्र – तंत्र, मध्यस्थ यांची विठ्ठलाच्या भक्तीसाठी गरज नाही. फक्त मुखाने नामाचा उच्चार करावा आणि चर्तन योग्य असावे. प्रसिद्ध अभंगात ते म्हणतात,

पाषाणाचा देव बोलेचिं ना कधी। हरी भव व्याधी केवी पड़े। दगडाची मूर्ती मानिला ईश्वर । परी तो साचार देव भित्न । दगडाचा देव इच्छा पुरवीत। 

तरी का भंगत आघातान । पाषाण देवाची करिती जे भक्ती। सर्वस्वा मूकती मूढपणे । प्रस्तराचा देव बोलत भक्ताते। सांगते ऐकते मूर्ख दोघे ।। 

*४.संपूर्ण भारतात ओळख-कार्य* :-

    संत नामदेव यांची ज्ञानेश्वर महाराजांनी १२९१ साली भेट घेतली. संत नामदेव यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावरही पडला.  संत ज्ञानेश्वरांचा जन्म

 इ. स. १२७५ सालचा, तर ज्ञानेश्वरी १२९० साली लिहिली आहे. त्याबाबत संत नामदेव गाथेत प्रमाणपर अभंग आहे.

*नामयाचे भेटी ज्ञानदेव आले। लोटांगण घातले नामदेवे।

 देऊनी अलिंगन प्रीती पडिभरे । पुजिले आदरे यथाविधी। 

    दोघांनी एकत्र मिळून एक दक्षिण यात्रा केली ज्यात त्यांचे अनेक बाबीवर मंथन झाले. तसेच संत नामदेवांनी संत ज्ञानेशर आणि भावंडे यांना सहकार्य केले. याचबरोबर संत नामदेवांनी संपूर्ण भारतभर यात्रा करून समाज प्रबोधन केले. लोकांच्या समस्या समजावून घेत त्यावर योग्य त्याप्रकारे उपाय सुचविले. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका होता की, दक्षिण भारतात अनेक जातीतील लोकांनी आपल्या जातीच्या मागे नामदेव हे नाव लावले आहे. काहींनी आपली जात ही नामदेव म्हणून घोषित केले. गुजराती संत नरसी मेहता, राजस्थान येथील संत मीराबाई यांच्या साहित्यात संत नामदेव महाराज यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंजाब राज्यात सर्वात जास्त २० वर्षे प्रभावी आणि उपयोजित कार्य त्यांच्याकडून झाले आहे.

          गुरू  ग्रंथसाहिब या ग्रंथात नामदेव महाराजांचे ६१ अभंग आहेत. संपूर्ण भारतात भ्रमंतीसह त्यांनी वारकरी धर्माचे असंख्य प्रचारक व संत निर्माण केले. सर्व जनतेसाठी संत नामदेव महाराज विठ्ठलाकडे मागणे मागतात ज्यास नामदेवाचे पसायदान म्हणतात…

*आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझियां सकळा हरिच्या दासा* ||१|| *कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो*।।२।। *अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विठ्ठदासा भाविकांसी* ।।३।। *नामा म्हणे तयां असावे कल्याण। ज्या मुखी निधान पांडुरंग*।४।

 *५.पंढरपूर हीच क्रांतीभूमी* : 

   पंजाबमधून परत आल्यावर संत नामदेव महाराजांना संत चोखोबा यांच्या मृत्यूची माहिती झाली. त्यांचा मृतदेह हा मंगळवेढा येथील वेशीत तसाच गाडला गेला होता. त्यातील अस्थी एकत्र करून त्या पंढपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर एकत्र

करून समाधी बांधली. तसेच शुद्र जातीत जन्मलेली जनाई हिला शिष्यत्व देवून

तिला कुटुंबातील सदस्य बनवले.

संत नामदेव महाराजांचे हे मानवमुक्ततेचे क्रांतिकारक कार्य चालू असताना त्यांना धर्माचे ठेकेदार, भट मंडळींनी खूप त्रास दिला. कुटुंबाला अनेक संकटांना सामोरे जाये लागले. संत नामदेव महाराजांचे वयाच्या 80व्य वर्षी  १३५० निधन झाले. त्यांची समाधी त्यांच्या सूचनेनुसार पंढपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर संत चोखोबा यांच्या शेजारीच बांधण्यात आली.

 *६.अनुयायी म्हणून काय करावे* :-

    संत नामदेव महाराज यांच्या कृतीविचारांना आपण सर्वांनी अंगिकारावे. आपले अनेक हभप संत नामदेव यांच्या विचारधारेला विसरले आहेत. ज्या नामदेवांमुळे हभप यांचा प्रपंच चोहोबाजूंनी मठ संस्थानासह वाढत आहे, तेच त्यांच्याविषयी कृतघ्न होत आहेत. संत नामदेवांनी कीर्तन परंपरा सुरू केली, तिला ते नारद गादी म्हणत आहेत. तसेच ते कीर्तनात गजर करतांना संत नामदेवांचे साधे नावही घेत नाहीत तसेच वारकरी धर्म हा पाखंड खंडन यासाठी आहे, याचाही विसर पड़त आहे. कीर्तन हे प्रबोधनाचे साधन आहे, त्यातून चांगले बदल व्यक्ती आणि समाजात होणे गरजेचे आहे, हे देखील विसरत आहेत. म्हणून उद्दिष्ट ठेवूनन कीर्तन होणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळी ते एक प्रक्रियेचा भाग होऊन जाते. त्यातून चिकित्सा,प्रबोधन घडत नाही. त्याच त्या गावात १०० ते १२५ वर्षांपासून सप्ताह होत आहेत, परंतु त्या गावात सुधारणा झाल्या काय? माणसे, समाज यांनी त्यातून काही घेतले काय ?  याचा मागमूस सापडत नाही! 

    आता नवीन देवांची, साधूंची, बापूची, अम्मा यांची मार्केटिंग होत आहे. वारकरी धर्म सोडून इतर पंथात, आश्रमात अंध भक्त बनत आहेत, अनेकांनी देवाच्या नावावर उद्योग सुरू केले आहेत. विद्रोही संत तुकाराम महाराज हे संत नामदेव यांच्या मोठेपणा व मार्गदर्शक भूमिकेविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणतात,
नामदेवे केले स्वप्नामायी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ।। सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ।। 

        तेव्हा सर्व बहिणी – बंधूना विनंती की, संत नामदेव यांच्या नामदेवगाथेसह कृतीविचारांना अंगीकृत करून आपण प्रचार प्रसार करूया.

✒️लेखक:-रामेश्वर तिरमुखे(राज्यप्रभारी,सत्यशोधक वारकरी महासंघ,महाराष्ट्र)संपर्क:-9420705753..

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED