स्त्रियांच्या अभिमानाचे व गौरवाचे महापर्व!

(महाराणी ताराबाई भोसले जयंती विशेष)

ताराराणीसाहेब यांनी करवीर राज्याची- कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना केली. त्या मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार राजस्त्री होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी व धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्रियांपैकी एक होती. ते अभिमानाचे व गौरवाचे महापर्व आहे. त्यांचे गुणगौरव श्री.एन. के.कुमार जी.यांनी यथोचित शब्दांत केले आहे… संपादक.

महाराणी ताराबाई म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म दि.६ नोव्हेंबर १६७५ रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते मराठ्यांचे पानिपत या सर्व गोष्टी महाराणीसाहेब ताराबाईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखार खान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखार खानने सर्वांची मुक्तता केली. दि.३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, पिलाजी गोळे, गिरजोजी यादव आदी मातबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली.

“दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी|
ताराबाई रामराणी| भद्रकाली कोपली||”
(कविवर्य गोविंद.)

सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली. राज्याला, गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले. सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली. तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे, ते बढवून चढवून नाही तर त्यातील शब्द न शब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक स्त्री औरंगजेबासारख्या मुत्सद्दी, नृशंस व कपटी सम्राटाशी लढा देण्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते. त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही, एवढेच नव्हे तर त्या औरंगजेबाची कबरही याच स्वराज्याच्या मातीत खोदली जाते. त्याच्या शिवरायांचे स्वराज्य संपविण्याच्या काळ्या स्वप्नाची धूळधाण उडवते. ही घटनाच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सगळे काही सांगून जाते.

महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी सन १६८०च्या सुमारास झाले. दि.२५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या महाराजांसह रायगडावरून निसटून गेल्या. छ.राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगडावर थांबल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तेथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. दि.९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला. छ.राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी राज्य कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतली. समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली.

मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहिल्या, शत्रूला थोपवून धरले. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत, असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या केल्या. चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.

“ताराबाईच्या बखते| दिल्लीपतीची तखते|
खचो लागली तेवि मते| कुराणेही खंडली||”
(कविराज गोविंद.)

वास्तविक सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजीला गादीवर बसवले आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार व सेनानींना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. सन १७०७ साली खेड येथे झालेल्या या युद्धात बाळाजी विश्वनाथ या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली. ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले.

शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, पिलाजी गोळे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिल जमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. वयाच्या ८६व्या वर्षी दि.९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर महाराणी ताराबाईंचे निधन झाले.

मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम व आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामांनतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना त्यांनी मराठी राज्य टिकवून ठेवले.

“रामराणी भद्रकाली| रणरंगी कृद्ध झाली|
प्रलयाची वेळ आली| मुगलहो सांभाळा||”
(कविराय गोविंद.)

!! जयंती निमित्त ताराराणी साहेबांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन -श्री.एन. के.कुमार जी(महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रिचरित्रांचे गाढे अभ्यासक तथा सारस्वत.)मु.पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED