जय भीम’ चित्रपटामागील खरी कथा; जाणून घ्या ‘त्या’ घटनेची माहिती

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.6नोव्हेंबर):-अभिनेता सूर्या शिवकुमार आणि प्रकाश राज यांची स्टारकास्ट असलेला “जय भीम” हा चित्रपट २ नोव्हेंबरला ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे.सध्या हा चित्रपट सोशल मीडियासह माध्यमांत चांगलाच चर्चेत आहे. IMDb ने याला 10 पैकी 9.7 इतके रेटींग्ज दिले आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून यात दाखवण्यात आलेला वकील तसेच इतर पात्रे हि सर्व सत्य घटनेवर आधारित आहेत. चला जाणून घेऊ काय होती ती घटना?आदिवासींच्या अत्याचाराची कहाणी आहे. हि गोष्ट 1993 सालातली आहे. तमिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील एका गावात सत्ताधारी पार्टीच्या अर्थात जयललितांच्या एआयएडीएमके पक्षाच्या एका बिनीच्या कार्यकर्त्याच्या घरात चोरी होते.

राजकीय पुढार्‍याच्या घरात चोरी झाल्याने संशयाची सुई इरुला या आदिवासी जमातीमधील एका युवकावर याच्यावर येते. काबाडकष्ट करुन जगणाऱ्या या आदिवासींवर ब्रिटीश काळामध्ये गुन्हेगारीचा शिक्का होता. त्यामुळे या जमातीकडे स्वातंत्र्योत्तर काळातही गुन्हेगार म्हणून बघितले जात होते. 80 च्या दशकात हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात येवून काबाडकष्ट करुन आपले जीवन कंठत होते. राजा कन्नु नावाच्या युवकाने ‘त्या’ कार्यकर्त्याच्या घरात चोरी केल्याच्या केवळ संशयावरुन पोलीस त्याला अटक करतात.
पोलीस कस्टडीत टाकून थर्ड डिग्रीचा वापर करुन त्याला मारहाण केली जाते. त्याच्याबरोबर त्याच्या नातेवाईकांनाही अटक करुन असह्य यातना दिल्या जातात.शेवटी पोलिसांच्या मारहाणीत राजा कन्नुचा मृत्यू होतो. पोलीस त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट शेजारील राज्यात म्हणजेच पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशात लावतात.

इकडे काही महिन्यांची गरोदर असणारी राजा कन्नुची पत्नी आपल्या नवर्‍याला न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यासह न्यायालयाचे उंबरे झिजवते.या वकिलाने मिळवून दिला होता न्याय. राजा कन्नुची पत्नी न्याय मिळावा यासाठी काही सामाजिक संघटनांच्या मदतीने के. चंद्रु या नवोदित वकिलाला भेटते.मार्क्स-पेरियार-आंबेडकरांच्या विचाराने झपाटलेला हा नवोदित वकील कन्नुची केस मद्रास हायकोर्टात चालवतो. व्यवस्थेशी लढत असताना प्रचंड त्रास होतो.परंतू गावकुसाबाहेर जगणारीही माणसेच असतात, त्यांनाही माणसासारखेच जगता आले पाहिजे, या विचाराने झपाटलेला के. चंद्रु बलाढ्य व्यवस्थेशी अखेरपर्यंत लढतो.कन्नु ला न्याय मिळेपर्यंत 1994 साल उजाडते. याचा तपास तत्कालीन पोलीस महानिरीक्षकांच्या माध्यमातून केल्यानंतर मद्रास हायकोर्टाचे दोन न्यायमूर्ती कन्नु च्या कस्टडीतील खून प्रकरणी पोलीस निरीक्षकासह चौघांना कठोर शिक्षा सुनावतात. के. चंद्रु सारखे नवोदित विधीज्ञ राज्याच्या महाअधिवक्त्याशी लढून ही केस जिंकतो. ही सुमारे 28 वर्षापूर्वी सोपी गोष्ट नव्हती. परंतू के. चंद्रु यांनी हे शक्य करुन दाखवले.

के. चंद्रु यांनी पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्यू पावलेल्या राज कन्नु ला न्याय मिळवून दिलाच. त्याचबरोबर न्यायाधीश झाल्यापासून उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत सुमारे 90 हजारांपेक्षा जास्त संवेदनशील केसेस हाताळून खर्‍याअर्थाने अनेकांना न्याय दिलेला आहे. 2013 साली ते मद्रास उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. परंतू त्यांनी आपले सामाजिक काम सुरुच ठेवले आहे. जय भीम चित्रपटाच्या माध्यमातून ते खर्‍या अर्थाने पटलावर आले आहेत.हैद्राबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.चंद्रु यांच्या पुस्तकावर आधारित असणारा “जय भीम” हा चित्रपट फक्त चित्रपटच नव्हे तर व्यवस्थेच्या नाकावर टिचून लाखो वंचित घटकांच्या कंठाला आवाज देणारे जळजळीत वास्तव आहे.प्रत्येकाने हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे व जातीयवाद, भाषावाद, या अमानवीय गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे