विद्यार्थी दिन

32

७ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण राज्यात विद्यार्थी दिन साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर १९०० साली विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जिल्हा सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील जनरल रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे. या शाळेत ते १९०४ सालापर्यंत म्हणजे चौथी पर्यंत शिकले. ई स २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करीत होते. २०१७ मध्ये बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशाचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या परिश्रमाची जाण व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या दिवशी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व, काव्य वाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी कोरोना आणि दिवाळी यामुळे शाळा, महाविद्यालये बंद असली तरी या स्पर्धा ऑनलाइन आयोजित केल्या जाणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगाची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वतः सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे आणि वंचितांचे उध्दारकर्तेही झाले. विशेष म्हणजे ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून देशभर गौरव होत असतो त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.

परिणामतः भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कूस बदलायला लावणारी घटना आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते त्यांनी आपला विद्याव्यासंग शेवटपर्यंत जपला. आजचा विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. जर देशात आदर्श विद्यार्थी निर्माण झाले तर आपल्या देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. या ऐतिहासिक दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! तसेच सर्व विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५