अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त उभारला गोशाळेतील गाईसाठी निवारा

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12नोव्हेंबर):-वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकीकडे पाश्चिमात्य संस्कृती फोफावत असताना गंगाखेड येथील वेदभूषण गजानन जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगळा पायंडा पाडला. अतिरिक्त खर्चाला फाटा देत संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव येथील गाईसाठी निवारा उभारणीचा भूमिपूजन शुभारंभ शुक्रवारी पार पडला.

गंगाखेड येथे पौरोहित्य करणारे वेदभुषण गजानन जोशी यांनी वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव या शाळेशी संपर्क साधून आम्ही गोशाळेसाठी काय करू शकतो ही विचारणा केली. गोशाळा संचालकांनी सुचवल्यावरून जोशींनी तत्काळ गाईसाठी निवारा उभारून देण्याचे मान्य करत वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर या टीन शेड उभारणी भूमिपूजन समारंभ शुक्रवारी पार पडला. गंगाखेड चे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .

यावेळी नगरसेवक बाळासाहेब राखे, माजी सरपंच जयदेव मिसे, ग्राहक पंचायतचे सोपान टोले ,प्रशांत फड , श्यामसुंदर निरस, सखाराम दनदने मामा ,जोशी समाज संघटनेचे रामेश्वर भोळे, हटकरवाडी येथील विश्वनाथ नाईक ,संकेत जाधव,वेदमूर्ती नारायण जोशी ,वे.शा.स. जयदेव जोशी आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त गजानन जोशी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . ग्यानबा बोबडे,संत मोतीराम महाराज गोशाला गोपीचंदगड पडेगाव चे संचालक सखाराम बोबडे पडेगावकर ,संभाजी बोबडे ,डिगंबर बोबडे ,दत्ता बोबडे, अशीष बोबडे ,रामेश्वर बोबडे, वेदांत बोबडे आदींनी मान्यवरांचा सत्कार केला. सध्याच्या काळात प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त होणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत गोशाळेतील मुक्या जनावरांसाठी काही तरी करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी बोलताना केले.