डॉ. शिवनाथ कुंभारे हे झाडीपट्टी चे भूषण – रवीजी भूसारी

🔸अमृत महोत्सवानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ. कुंभारे यांचा भावपूर्ण सत्कार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.13नोव्हेंबर):-आजचे सत्कारमूर्ती कर्मयोगी डॉ. शिवनाथजी कुंभारे झाडीपट्टी चे भूषण आहे. त्यांनी या भागातील आदिवासी जनतेची गरज लक्षात घेऊन वैद्यकीय सेवेसोबतच जनप्रबोधनाचे अव्याहतपणे कार्य केले, असे प्रतिपादन वसा येथील ज्येष्ठ समाजसेवक रविजी भूसारी यांनी येथे केले.राज्याचे बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, या भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचार प्रसार करण्यासाठी डॉ. कुंभारे झटले. ख-या अर्थाने ते अंतरंगात देवपण जपणारे कर्मयोगी आहे.

स्थानिक कात्रटवार सभागृहात आयोजित डॉ.शिवनाथजी कुंभारे अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन केलेले होते. अध्यक्षपदी समाजसेवी डॉ. देवाजी तोफा होते. याप्रसंगी सौ. सुमनताई कुंभारे, वसा येथील समाजसेवक रविजी भूसारी , आ. डॉ. देवराव होळी, माजी खा. मारोतराव कोवासे , भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे सचिव अशोक शब्बन (राळेगण ), सुधाकर हेडावू , डॉ. अनंता कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. देवाजी तोफा म्हणाले, ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी डॉ. कुंभारे यांची तळमळ कौतुकास्पद आहे. माजी खा.कोवासे आणि आ. डॉ. होळी यांनीही डॉ. कुंभारे यांच्या सेवाभावी कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अमृत महोत्सव समितीच्या वतीने डॉ. कुंभारे यांचा मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक पंडित पुडके यांनी केले तर मानपत्राचे शब्दांकन आणि वाचन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. सूत्रसंचालन पंकज भोगेवार यांनी केले. मंचावर अरविंद वासेकर, दलितमित्र नानाजी वाढई, विजय खरवडे, भास्कर कोसुरकर,माधव तरोणे, विवेक आंबेकर आदी उपस्थित होते. आयोजनासाठी संदीप कटकुरवार , सुरेश मांडवगडे , सुखदेव वेठे, सौ.गीता पाटील, भाऊ पत्रे, श्रीगुरुदेव शाळेचे कर्मचारी, कुंभारे परिवार आदींनी सहकार्य केले. डॉ. कुंभारे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रक्तदान, फळवाटप, वृक्षारोपण करण्यात आले. नाशिकच्या पं. वैरागकर यांच्या गायनाने समारोप झाला.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED