नवमतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करून लोकशाहीविषयी जागरूकता आणावी : तहसीलदार तुळशीदास कोवे

31

🔹चिमूर तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न

🔸१६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेत होणार मतदार प्रारूप यादीचे चावळी वाचन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14नोव्हेंबर):–भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ७४- चिमूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक यांनी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात जनजागृती करून १ जानेवारी २०२२ रोजी वयाचे १८ वर्षावरील विद्यार्थांचे नमुना ६ चे फार्म भरून मतदार यादीमध्ये नवमतदारांचे नाव नोंदणी करून लोकशाहीविषयी जागरूकता आणावी असे प्रतिपादन चिमुरचे तहसीलदार तुळशीदास कोवे यांनी व्यक्त केले.

ते ७४-चिमूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या सुचनेनुसार चिमूर तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

तहसीलदार तुळशीदास कोवे पुढे म्हणाले की, प्रत्येक महाविद्यालयात चुनाव पाठशाला, निवडणुक साक्षरता मंडळाची स्थापना करून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच ७४-चिमूर विधानसभा मतदार संघातील ३१२ केंद्रातील ग्रामपंचायतीमध्ये दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यात नजरचुकीने नाव सुटलेले असल्यास तसेच ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे नाव मतदार यादीत समविष्ट करण्यात येणार आहे. तसेच येत्या १६ नोव्हेंबरला चिमूर विधानसभा क्षेत्रांतील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेत मतदार प्रारूप यादीचे चावळी वाचन होणार आहे.

आढावा बैठकीला चिमुरचे तहसीलदार तुळशीदास कोवे, निवडणुक विभागाचे उल्हास लोखंडे, नामदेव वाडगुरे आदीसह तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.