राज्यस्तरीय ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक महामेळावा संपन्न

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.16नोव्हेंबर):-ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्रद्वारा राज्यस्तरीय ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक महामेळावा श्री क्षेत्र गणपती देवस्थान, आदासा ता.कळमेश्वर जि.नागपूर येथे काल पार पडला. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक बांधवांना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चळवळीला बळकट व सुदृढ करण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक बांधवांनी विचार मंथन करणे ही काळाची किती गरज आहे? आपले हक्क व न्यायासाठी अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कशी मागणी करायची आहे? यासारख्या अनेक प्रश्नांना विचाराधीन ठेवून संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या महामेळाव्याचे अध्यक्षस्थानी मा.ना.श्री. सुनिलबाबू केदार पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय, क्रिडा व युवक कल्याण मंत्री (महा.राज्य) उद्घाटक मा.सौ. रश्मीताई बर्वे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, प्रमुख अतिथी मा. श्री. कृपालजी तुमाने खासदार रामटेक लोकसभा (भारत सरकार) प्रमुख मार्गदर्शक मा. श्री मनोजजी कदम संस्थापक अध्यक्ष महा.राज्य एन.जी.ओ.असो.महा व इतर मान्यवर लाभले होते. तर या महामेळाव्याला महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोप-यातील तालुकास्तरीय संघटनांनी हजारोंच्या संख्येत आपली उपस्थिती दर्शविली.

त्यात अनेक ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या अडचणी व व्यथा मांडल्या होत्या. आमच्या झरीजामणी तालुका सघटनेचे सचिव श्री.रामभाऊ पेंदोर तसेच प्रमुख पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते व सरपंच यांनी सुद्धा ग्राम रोजगार सेवकांच्या हालअपेस्टासह कोणकोणत्या समस्यांना तोंड देत आपल्या जीवनाची नाव हाकलावी लागते हे अतिशय समर्पकरित्या मांडले होते. या विचार मंथनातून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मंत्री महोदय यांना या समस्त ग्राम रोजगार सेवकांच्या अडचणी व व्यथा दृ्ष्टीक्षेपास ठेवून त्यांच्या मागण्या मंजुरात कराव्या अशी आर्त साद घालण्यात आली. या पवित्रस्थानी पार पडलेल्या या महामेळाव्यातील मागण्यांचा मुहुर्तमेढ मा.मंत्री महोदय नक्कीच करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली. तर या मंत्री महोदयांना श्री. गणपती बाप्पा सद्बुधी देवून त्यांच्या करवी या मागण्या मंजूर करतील का? याकडे सर्व ग्राम रोजगार सेवक मोठ्या आशेने पाहत आहे. अशाप्रकारे हा महामेळावा अतिशय शांततेत व व्यवस्थित पार पडला.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED