कमळवेल्ली येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात

30

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.16नोव्हेंबर):-क्रातिसूर्य बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलिहातू या गावी आजच्या रोजी झाला. सर्वांमध्ये मिसळून राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे अनेक सहकारी जुळत गेले. याच सहकार्यातून त्यांनी एक संघटन केले. त्यांचे वडील सुगन मुंडांना जबरदस्तीने धर्मांतर केल्यामुळे ख्रिस्ती मिशन व इंग्रज यांचा त्यांना मनस्वी राग येत होता. त्यातच अशिक्षित आदिवासींवर होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिका-यांना धडा शिकवण्याचा विचार करून गोडगेडा येथील आपले गुरु स्वामी आनंद पांडे यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात छोटा नागपूर क्षेत्रात लढा उभारला होता.

बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ पारंपारिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या संदेशाने प्रभावित होऊन आदिवासी लोकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आदिवासींचे जननायक असलेल्या या महान व्यक्तीच्या कार्याने प्रेरीत होऊन आपल्या भगवान स्थानी असलेल्या बिरसा मुंडा यांच्या आजच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून कमळवेल्ली येथे आज त्यांची जयंती मेठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या जयंती प्रसंगी कमळवेल्लीचे सरपंच श्रीमती पुष्पाबाई रा.चुक्कलवार यांनी त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपसरपंच वामन हलवेले, मोहन चुक्कलवार, गणेश सिडाम, पुरुषोत्तम मरापे, धनराज सिडाम, विजय पंधरे, अरुण सिडाम, अखिल मरापे व इतर समस्त आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा स्मरणीय कार्यक्रम पार पाडण्यात आला.