माणूस मेल्यानंतर खरंच वैर संपत असते?

28

नुकतेच बळवंत पुरंदरे वारले आणि त्यांच्या मृत्यूनंतर बहुतांश लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला व पुरंदरेंबद्दल नकारात्मक पोस्ट चालविल्या. हे सर्व सुरु असतांना काहींनी मत व्यक्त केलं की माणूस संपल्यानंतर वैर संपत असत. त्यामुळे मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. त्याच्या भूतकाळातील गोष्टी विसरून त्याला श्रद्धांजली अर्पण करावी. याचबरोबर हे लोक आणखी एक गोष्ट बोलत आहेत की, ’पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचले’ ह्या मुद्द्यांची आपण सविस्तर चिकित्सा करून बघुयात.रावणाला मारल्यानंतर रामाने बिभीषणाला सांगितले की रावण आता मेला. त्याच्या मरणासोबतच माझे त्याच्याशी असलेले वैरही संपले आहे. आता तुझा भाऊ तो माझा भाऊ. रावणाची उत्तरक्रिया तू सन्मानाने कर. अफजलखानाला मारल्यानंतर छत्रपती शिवरायांनी त्याच्या प्रेताची अवहेलना केली नाही. त्याची प्रतापगडाच्या पायथ्याशीच कबर बांधली. फक्त कबर बांधून दिली नाही तर तिथे दिवाबत्तीची सुद्धा सोय करून दिली. अशी उदारमतवादी या देशाची आणि महाराष्ट्राची संस्कृती होती. हीच परंपरा अनेक शतके सुरु होती. या संस्कृतीला सुरुंग लागला तो 28 नोव्हेंबर, 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले वारल्यानंतर. ज्योतीबांच्या मृत्यूनंतर टीळकांनी केसरी या वृत्तपत्रात फक्त ‘फुले वारले’ इतकीच बातमी दिली. याठिकाणी एक प्रसंग नमूद करावा लागेल की ज्यावेळी माधवराव बर्वेंनी टिळकांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

त्यावेळी टिळकांचे अनेक चाहते-समर्थक-मित्र असतांना सुद्धा या खटल्यात टिळकांची जमानत घेण्यास कुणीही तयार नव्हते. अशावेळी ज्योतिरावांनी त्यांचे मित्र रामशेठ उरवणे ह्यांना टिळकांची जमानत घ्यायला लावली.याच खटल्यात जेव्हा टिळक-आगरकरांना 4 महिन्यांची शिक्षा झाली आणि 26 डिसेंम्बर 1882 रोजी मुंबई च्या डोंगरी कारागृहातून त्यांची सुटका झाली तेव्हा पुणे येथे ज्योतिबांनी टिळक-आगरकरांचा जाहीर सत्कार घेतला. अशा मोठ्या मनाचा महात्मा ज्योतिबा वारल्यामुळे समाजाचं नुकसान झालं, दुःख झालं, वाईट झालं हे सर्व सोडा परंतु टीळकांना मदत करणार्‍या व इतकं महान समाजकार्य असणार्‍या माहात्म्याबद्दल ‘दुःखद निधन’ हे दोन शब्द लिहिण्याचेसुद्धा सौजन्य केसरीकारांनी दाखविले नाही. पण ह्याविरोधात त्यावेळी व आताही कुणीच बोलत नाही.

या महान संस्कृतीला दुसर्‍यांदा छेद दिला गेला तो 6 मे 1922 ला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव जेव्हा कोल्हापूरला रवाना झाले त्यावेळी बहुजन समाज मोठ्या संख्येने आपल्या राजाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आला होता. अनेक लोक तर रडत होते. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. पण पुण्यातीलच स्वतः ला उच्चवर्णीय समजणार्‍या काही विक्षिप्त लोकांनी शाहू महाराजांच्या मृत्यूचा आनंदोत्सव साजरा केला. ज्या रस्त्यावरून पार्थिव नेण्यात आले त्याच रस्त्यावर सत्यनारायणाची पूजा केली. साखर-मिठाई वाटली. किती हा विकृतपणा? पण ह्या प्रचंड चीड आणणार्‍या घटनेवेळी तेव्हाही कुणी निषेध केला नाही आणि आजही कुणी निषेध करत नाही.

ह्या वरच्या दोन्ही घटनांबद्दल आज बोललो की हेच स्वयंघोषित संस्कृतीरक्षक म्हणतात महात्मा फुले आणि शाहूराजांच्या मृत्यूवेळी आम्ही नव्हतो. मग आज जे स्वयंघोषित संस्कृतीरक्षक बळवंत पुरंदरेंच्या मृत्यूबद्दल ज्ञान पाजळत आहेत त्यांना माझा सवाल आहे की आज तुम्ही जिवंत आहात ना? मग आजही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन रोजच बदनामी केली जाते त्याबद्दल तुमच्या तोंडातून चकार शब्द का निघत नाही? तेव्हा तुम्ही लोक का म्हणत नाही की आता ते महापुरुष वारलेत तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका? त्यावेळी तर तुम्हीसुद्धा मोठ्या उत्साहाने त्या ’बदनामी उत्सवात’ सहभागी होता. आणि आज सर्वसामान्यांना माणुसकी, नैतिकता, संस्कृती, संस्कार कोण्या तोंडाने शिकवीत आहात? ही तुम्हीच विकृत केलेली संस्कृती आहे.

ज्या विनायक सावरकरांची सुटका व्हावी म्हणून गांधींनी पूर्ण काँग्रेस राबविली. त्याच सावरकरांचा अनुयायी नत्थूराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर संपूर्ण देश हळहळत होता परंतु पुणे आणि काही परिसरातील तत्कालीन विकृत स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी आनंदोत्सव साजरा केला. मिठाई वाटली. तेव्हापासून आजतागायत रोजच कोणत्या न कोणत्या माध्यमातून गांधींची बदनामी केली जाते. इतक्यावरच ह्या लोकांचं समाधान होत नाही तर 30 जानेवारी 2019ला, गांधींच्या हत्येच्या बरोब्बर 70 वर्षांनी अलिगढ मध्ये पूजा पांडे आणि हिंदू महासभेच्या सदस्यांमार्फत गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गांधीहत्येचा तो प्रसंग पुन्हा रंगवण्याचा विकृत प्रयत्न केला जातो. त्या गांधींच्या फोटोतून खोट्या रक्ताच्या चिळकांड्या उडाव्यात अशीही तयारी केली जाते. ह्यावेळी तुम्ही सगळे कुठल्या बिळात लपलेले असता विकृतीच्या समर्थकांनो?

देशाचे पहिले प्रधानमंत्री ज्यांनी आपल्या आयुष्याची 11 वर्षे तुरुंगात काढली आणि आपली करोडो रुपयांची संपत्ती या देशाला अर्पण केली त्या जवाहरलाल नेहरूंना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनाम करत, शिव्या देतच आजचे देशातील सरकार सत्तेत आलेले आहे. आजही तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटरवर जर शोधलं तर रोजच तुम्हाला नेहरूंविषयी अत्यंत वाईट पोस्ट हमखास सापडतात. पण त्यावेळी कुणीच त्या विकृतांना मेलेल्या माणसाबद्दल असं वाईट बोलू नये, मरणासोबत वैर संपत असा उपदेश देत नाही.आता ’पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचले’ ह्या वाक्यातला फोलपणा बघुयात. पुरंदरे आधी जन्माला आले की छत्रपती शिवराय? मग पुरंदरेंच्या जन्माच्या आधी महाराष्ट्रात असा कोण माणूस होता की ज्याला छत्रपती शिवराय माहिती नव्हते? असं महाराष्ट्रात कोणतं घर होतं की जिथपर्यंत शिवराय पोचले नव्हते? छत्रपती शिवरायांमुळे पुरंदरे घराघरात पोचले असे म्हणा. पुरंदरेंच्या आधी वा.सी. बेंद्रेंसारख्या अनेकांनी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास पुस्तकरूपात मांडला. शिवरायांवर पहिला प्रदीर्घ पोवाळा लिहिणारे आणि शिवरायांची समाधी शोधणारे महात्मा फुले होते.

पुरंदरे चांगले साहित्यिक असतीलही. परंतु इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते महाराष्ट्रातील जनमानसाच्या मनातून उतरले. इतिहासात पहिल्यांदा कुण्या व्यक्तीला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याला इतका विरोध झाला आणि इतिहासात पहिल्यांदाच इतक्या प्रचंड सुरक्षा कवचात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांना इतकीच शिवरायांप्रती श्रद्धा असती तर त्यांनी जनमताचा आदर करत पुरस्काराला नकार दिला असता परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवरायांच्या जन्मतारखेबद्दल दुटप्पी भूमिका घेतली. शासनाला 19 फेब्रुवारी तारीख सांगतानाच कालनिर्णय च्या साळगांवकरांना तिथीनुसार शिवजयंती म्हणून पत्र लिहिले. आणि मरेपर्यंत कधीच हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला नाही.

अनेक लोक आज असा युक्तिवाद करतांना आढळतात की, ’पुरंदरेंना शिवरायांच्या कर्तृत्वापेक्षा जर ब्राह्मण्य अधिक प्रिय असते तर त्यांनी पेशवाईचे गोडवे गायिले असते.’ त्यांना माझा सवाल आहे की, जर त्यांनी पेशवाईवर पुस्तके लिहिली असती, नाट्य काढले असते तर ते कुणी विकत घेतले असते? कुणी तिकीट काढून बघितले असते? पेशवाईचा उदोउदो करून पुरंदरे कशेकाय घराघरात पोचले असते? त्यांना कोणी विचारले असते? आज बहुतांश महाराष्ट्राचा विरोध असतांना त्यांना जो महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आलाय तो पुरस्कार देण्यासाठी कोणते कारण दिले गेले? छत्रपती शिवरायांचेच ना? आयुष्यभर पुरंदरेंना जो सन्मान आणि प्रसिद्धी मिळली, पैसा मिळाला तो छत्रपती शिवरायांमुळेच. ज्या शिवरायांमुळे हे सर्व मिळालं त्या शिवरायांच्याच इतिहासाचे विकृतीकरण पुरंदरेंनी केले. माँसाहेब जिजाऊंची बदनामी करण्याची आजपर्यंत कुणीच हिम्मत केली नव्हती ती ह्या पुरंदरेंमुळे जेम्स लेन च्या पुस्तकात केली गेली. ह्या बदनामीचा संपूर्ण देशातून निषेध व्यक्त होत असताना स्वतः ला शिवशाहीर म्हणवून घेणार्‍या ह्या पुरंदरेंनी त्या विकृत बदनामीचा एका शब्दानेसुद्धा निषेध केला नाही. ह्याला आपण छत्रपती शिवरायांबद्दल निष्ठा म्हणायची? जर निष्ठा असती तर असं विकृत लिखाण झालंच नसत आणि जर झालं असत तर त्याविरुद्ध पुरंदरे पेटून उठले असते, परंतु असं काहीच झालं नाही. यावरून सुज्ञांना जास्त सांगणे न लागे. बहुजनांच्या मनातील त्या संचित संतापाला कधीतरी वाट फुटणारच होती.

आपल्या देशात माणूस मेल्यानंतर वैर आधीच्या काळात संपत होतं मित्रांनो परंतु महात्मा फुले, राजर्षी शाहू, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या मृत्यूपासून काही विकृतांनी ती प्रथा मोडून काढली. ही प्रथा मोडून काढत असतांना ‘इतिहासात जसं आपण पेरतो तसेच भविष्यात उगवते‘ हे साधं सुत्र मात्र ती विकृतांची जमात विसरली बहुतेक.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६