भारतीय संविधान

अमाषुतेच्या विषमतामय मनुव्यवस्थेला समाप्त करून भारताला नवसंजीवन देण्याचे काम संविधान केले आहे. विभक्त असलेल्या साऱ्या देशाला एका धांग्यात गुंफूण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. आज जी काही भारताची प्रगती दिसते याचे सारे श्रेय फक्त आणि फक्त भारतीय संविधानाला दिले पाहिजे .पण आपण जे भारतीय संविधानाला अपेक्षित स्वप्न होते ते पूर्ण करू शकलो का…? याचे उत्तर मात्र नाही आहे .

आज भारतीय संविधानाला ७० वर्ष होऊनही आपण माणसाच्या मनातील जातिवाद, भाषावाद ,धर्मवाद, प्रांतवाद यामधून मुक्ती मिळवू शकलो नाही. तर आणखी प्रखरतेने जातिवाद,भाषावाद ,धर्मवाद ,प्रांतवाद उफाळून आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातून नवा सूर्य जरी उजाडला असला तरी भारतीय सर्व मानवाला सामाजिक व राजकीय समानता देणारा दिवस म्हणजेच भारतीय संविधान दिवस होय .

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम व भारतीय संविधान या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारतीय स्वातंत्र्य संग्राम , समाजउद्धाराचे कार्य व परिवर्तनवादी सामाजिक संघटनेचे कार्य यामधूनच भारतीय संविधानाची अनमोल रचना निर्माण झाली आहे. भारतीय समस्त बांधवांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय यांची
महाऊर्जा देणारा महाप्रकल्प म्हणजेच भारतीय संविधान होय. भारतीय संविधान विषयी जनजागृती व्हायला पाहिजे ती झाली नाही फक्त पाठ्यपुस्तकात काही भाग संविधानाचा दिला असला तरी संविधान विषयी आकर्षण बहुसंख्य जनतेला नाही. काही वर्ग तर संविधान विरोधी व संविधानाच्या कमकुवतपणाचा सातत्याने ढोल पिटत असतात. ज्या संविधानाने जो पक्ष राजकीय सत्तेवर आला तोच पक्ष स्वतःला संविधान विरोधी म्हणून प्रोजेक्ट करतात .आमचे अंधभक्त त्यांचे समर्थन करतात. थू…त्यांच्या जिंदगीवर…..

आज देश अत्यंत संक्रमण काळातून जात आहे. जयभिम या चित्रपटातून भयानक वास्तव मांडण्याचे काम सूर्याने केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा प्रकारे साजरी करावी याचा संदेश जयंती या मराठी चित्रपटात देण्यात आलेला आहे .त्याचप्रमाणे संदीप गायकवाड लिखित क्रांतीगर्भ लघुचित्रपटातून भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे क्रांतिकारी कार्य व भारतीय संविधानाची एक होण्याची प्रेरणा अत्यंत कलात्मकतेने मांडली आहे . फिल्म दुनियेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. मनातील पूर्वग्रहदूषित पणा बॉलिवूडच्या कलाकारांतून निघाला नाही .अपवाद काही चित्रपट समाजबदलावर व देशाभिमानवर जरी आले असले तरी भारतीय संविधानाच्या ताकतीवर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यावर त्यांना चित्रपट बनवता आले नाही. पण आज असे चित्रपट निर्माण होऊन भारतीय संविधानाची मशान घराघरात पोचवण्याचे काम करत आहे.

संविधान हे फक्त नाव नाही तर भारतीय मानवाचा प्राणतत्व आहे. विषारी मनुव्यवस्थेला नष्ट करून भारतीय लोकांना स्वाभिमान निर्माण करणारा ऊर्जस्वल विद्रोह आहे.देशातील शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे आपले आंदोलन चालवले ते यशस्वी करून दाखवले हे फक्त भारतीय संविधानाच्या ताकतीवर होय. नाहीतर वर्तमान सरकारने आंदोलन केव्हाच मोडून काढले असते.आज राजकीय फायद्यासाठी हे कायदे जरी मागे घेतले तरी सरकारचा हेतू खरा नाही . यासाठी आपण व शेतकरी बांधवांनी सजग राहिले पाहिजे.

भारतीय संविधान दिवस आज मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे .त्याला उत्सवाचा महोत्सव म्हणून सरकारी व सामाजिक स्तरावर साजरा केला जात आहे. पण खरंच आपण संविधानाचा आदर करतो का..? हेसुद्धा तपासणे गरजेचे आहे. संविधान दिवस हा उत्साहाचा तर आहेच पण त्याचबरोबर तो चिंतनाचा आहे. आपल्या देशातील सर्व माणसाचा आर्थिक, सामाजिक,राजकीय व शैक्षणिक विकास झाला का..? यांचे परिक्षण करण्याचा दिवस आहे. आज अनेक समूह अंधकारमय आयुष्य जगत आहेत .शिक्षणाच्या वाटा मिळूनही ते अज्ञानी आहेत .आर्थिक उन्नतीचे सारे मार्ग बंद झाले आहेत. श्रीमंत आणि गरीब यांची दरी फार वाढली आहे. असंख्य बेरोजगार दारोदारी भटकत आहेत. चंगळवादाची नवी जमात निर्माण झाली आहे. दमणकारी व्यवस्थेची क्रियात्मक या देशात निर्माण झाली आहे. धर्मावाद यांनी अनेक समूह विकलांग केले आहेत .आपल्या फायद्यासाठी दंगलग्रस्त मेंदू तयार केले जात आहे .स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत.पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे .अशा गंभीर वातावरणात भारतीय संविधान दिवस साजरा करत असताना भारतीय संविधानाने दिलेले आपल्या अधिकार आपल्याला मिळतात काय यांची शहानिशा करणे गरजेचे आहे. आपले कर्तव्य ,आपली संविधानिक नैतिकता आपण गमावत तर चाललो नाही ना..! हे तपासणे भारतीय संविधान दिवसाचा एक मुख्य भाग आहे. फक्त भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचून झाले कि भारतीय संविधान दिवस साजरा झाला असे म्हणता येणार नाही तर भारतीय संविधानातील महाऊर्जेचा सूर्यप्रकाश सर्व भारतीयांना मिळावा हीच खरी संविधान सदिच्छा……

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९७३७३५७४००

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED