पशुसंवर्धन विभागातील वैयक्तिक योजनेचा लाभ घ्यावा : पशुधन विकास अधिकारी जांभुळे

32

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10डिसेंबर):-पशुसंवर्धन विभागातील योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार, महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सन २०२१-२२ या वर्षात नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजने अंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुटपालन संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी आर्थिक मदत, १०० कुक्कुट पिल्लांचे वाटप व २५+३ तलांगा वाटप आदी पशुसंवर्धन विभागातील योजना शासन राबवीत असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी जांभुळे यांनी दिली.

या योजनेत पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन योजनेचा सहभाग केला आहे. पशुसंवर्धन विभागातील योजना अधिक पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी शासनाने तीन वर्षांपासून आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करणे सुरु केले आहे. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज अत्यंत सुलभ करण्यात आले आहे. बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागातील योजनेच्या माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. आँनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शासनाने https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागातील योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, महिलांनी ४ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत आँनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे असे आवाहन पंचायत समिती चिमुरचे पशुधन विकास अधिकारी जांभुळे यांनी केले आहे.