लक्षणं नाहीत तरीही 19 वृद्ध पॉझिटिव्ह, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

32

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.10डिसेंबर):-डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा बाहेर जाणार्‍या 22 वृद्धांची कोरोना अँटीजेन चाचणी केल्यानंतर त्यात तब्बल 19 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यामुळे जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून आज जिल्हा रुग्णालयामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णासह नातेवाईकांची अँटीजेन चाचणी बंधनकारक करून तपासण्या करण्यात आल्या. वडवणीत जे 19 रुग्ण बाधीत आढळून आले होते.

त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांना कोरोनाचे कुठलेही लक्षण नाहीत. असे असताना ते पॉझिटिव्ह आल्यामुळे आज त्यांच्या सिटीस्कॅनसह अन्य चाचण्या करण्यात येणार आहेत. या दोन महिन्यांच्या कालखंडात एकाच वेळी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ.

डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी अहमदनगरला निघालेल्या 22 वृद्धांची काल कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये 19 जण बाधीत आढळले. त्या सर्वांना बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. संतोष धूत हे त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

उपस्थित 19 रुग्णांना कुठलेही लक्षणे नाहीत. शासनाच्या गाईड लाईननुसार ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आल्याचे डॉ. धूत यांनी सांगितले.