गुलाबराव पाटील, अजित पवार यांच्यावरच मिडीया ट्रायल का ?

31

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात दोन दिवस चांगली चर्चा झाली. त्यांच्या तथाकथित वादग्रस्त वक्तव्याने मिडीयाला चघळण्यासाठी व विरोधकांना विरोधाच्या पिचका-या टाकायला एक मुद्दा मिळाला. ख-या अर्थाने सदर वक्तव्यात काहीही अश्लिल, अवमानास्पद नव्हते. उगीच पराचा कावळा करून गुलाबराव पाटलांना झोडपण्याचा कार्यक्रम राबवला गेला आहे. मिडीया ट्रायलमध्ये सापडलेल्या गुलाबराव पाटलांनी अखेर माफी मागून या विषयावर पडदा टाकला. वादग्रस्त वक्तव्याच्या वादाचा इतिहास पहाता त्यात दुजाभाव दिसतो. गुलाबराव पाटील, अजित पवार, महादेव जानकर अशा काही नेत्यांच्या वक्तव्यांनाच वादग्रस्त ठरवले जाते व चर्चा घडवून आणली जाते. बाकी मोदी व भाजपेयी वर्तुळातले अनेक जण चावट, लबाड, खोट,-नाटं काहीही बरळतात. त्यावर माध्यमं चर्चा करत नाहीत. केली तर ती फक्त राम कदम यांच्या सारख्या फुट सोल्जर असलेल्या नेत्यांचीच केली जाते. बड्या मंडळींच्या वक्तव्याची अजिबात नाही. गुलाबराव पाटील जळगाव येथे प्रचार सभेत बोलताना सांगत होते की, “माझ्या मतदारसंघातले रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत !” या वाक्यात हेमा मालिनी यांचा अवमान करणारे काय आहे ? या वाक्याने जीभ घसरली असे जे मिडीयावाले आणि विरोधक म्हणत आहेत त्यांच्या अकलेचे दिवाळ निघाले आहे काय ? यात नक्की वादग्रस्त काय आहे ?

गुलाबराव पाटलांना आपल्या मतदार संघातले रस्ते चांगले व गुळगुळीत आहेत, तिथे खड्डे नाहीत असे सांगायचे होते. ते सांगताना त्यांनी एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणून हेमा मालिनीच्या गालाचा उल्लेख केला. म्हणजे हेमा मालिनी यांचे गाल गुळगुळीत व सुंदर आहेत. रस्तेही तसेच म्हणजे हेमा मालिनी यांच्या गालासारखे चांगले आहेत असे गुलाबराव पाटलांना सांगायचे होते. यात वादग्रस्त काय आहे ? अनेक वेळा लोक खराब आणि खड्डे असलेल्या रस्त्याला ओम पुरींच्या गालासारखे रस्ते आहेत असेही म्हणतात. यात अश्लिल आणि वादग्रस्त नक्की काय आहे ? अलिकडे भाजपात आलेल्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर या वक्तव्यासाठी गुलाबराव पाटलांना रांझ्याचे पाटील म्हंटले आहे. त्यांनी गुलाबराव पाटलांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांचे हे वक्तव्य आणि थयथयाट भयंकर आहे. विरोधक असले की प्रत्येकवेळी थयथयाट करायलाच हवा असा काही नियम आहे का ? भाजप नेत्यांनी या पुर्वी कित्येक वेळा गुलाब पाटलांच्यापेक्षा भयंकर वक्तव्ये केली आहेत. स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका महिला खासदारावर टिका करताना संसदेत शुर्पणखेची उपमा दिली होती.

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींना आजवर भाजपवाले काय म्हणाले नाहीत ? हा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यापेक्षा मोदींचे संसदेतले वक्तव्य गंभीर होते. देशाचा प्रधानमंत्री संसदेत महिला खासदारांच्यावर टिका करताना किती घसरतो ? हे देशाने पाहिले आहे. तेव्हा याच माध्यमांनी, “मोदींची जिभ घसरली !” अशी बातमी चालवली नव्हती हे विशेष. मोदींच्यापासून ते राम कदमांच्यापर्यंत भाजप नेत्यांची अशी अनेक वक्तव्ये आहेत. त्या मुळे भाजपाला या गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.

गेल्या काही वर्षात एखादा नेता असं काही वेगळं बोलला की अमक्या अमक्याची जीभ घसरली, अमक्याचे वादग्रस्त विधान ! असे मथळे चालवत मिडीया ट्रायल सुरू होते. जे विरोधात असतात ते लगेच दांडक्यासमोर येतात. त्या वक्तव्याचा निषेध करतात, फार तावातावाने बोलतात. जणू नैतिकतेचे भाषा शुध्दीचे सर्व मापदंड त्यांनाच लागू होतात. अशा पध्दतीने ते बोलत असतात. माध्यमाचे दांडके समोर आले की अशा गणंगांना खुप अवसान येते. माध्यमांना खळबळ आणि टि आर पी हवा असतो. पण या सगळ्या वादात समृध्द असलेल्या मराठी भाषेला प्रमाणित करण्याचा जो डाव सुरू आहे तो चिड आणणारा आहे. आम्ही बोलतो तेच योग्य, तेच सुसंस्कृत आणि तीच प्रमाण भाषा आहे असे भासवले जात आहे. बाकीच्या राजकीय हिजडवादापेक्षा हे गंभीर आहे. “माझा मराठीचा बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके ।।” अशी मराठीची थोरवी संत द्नानोबारायांनी सांगितली आहे. तमाम मराठी संतांनी मराठी भाषेला श्रीमंत केले आहे. संतांचे साहित्य अभ्यासत असताना त्यांनी शब्दांचे जे कोरडेे ओढले आहेत ते पाहून थक्क होते. त्यांनी वापरलेले शब्द, त्या शब्दांचे चाबूक जबरदस्त आहेत. संत तुकारामांची गाथा या लोकांनी वाचायला हवी. त्यांनी ज्या पध्दतीने शब्दांचे फटके दिले आहेत ते पाहून यांच्या बुडाला जाळ लागेल. खरेतर त्या काळात संतांनाही भाषेच्या आणि संस्कृतीच्या ठेकेदारांनी त्रास दिला होता.

मराठी भाषा खुप समृध्द आहे. या भाषेत हजारो म्हणी, वाक्यप्रचार आदींचा अक्षरश: सडा आहे. भागवार आणि प्रांतवार या भाषेचे लालित्य, सौंदर्य बदलते. राज्याच्या विविध भागात अतिशय वैविध्यपुर्ण आणि खास शब्द आहेत. त्या त्या शब्दांचे स्वत:चे सौंदर्य, लालित्य आणि बाज वेगळा आहे. कोकणातली मराठी वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, खानदेशातली वेगळी आहे, माणदेशातली वेगळी आहे, घाटावरची म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली मराठी वेगळी आहे. या विविध भागातल्या बोली भाषेत विविध म्हणी, वाक्यप्रचार मोठ्या प्रमाणात बोलले जातात. त्यात निखळपणा असतो. काही म्हणी आणि वाक्यप्रचार ऐकताना अश्लिल वाटतात पण ते तसे नसतात. अलिकडे अशा शब्दांचा किस पाडत त्याला अश्लिल ठरवण्याचा, वादग्रस्त ठरवण्याचा करंटेपणा सध्या सर्रास केला जातोय. यात माध्यमं आघाडीवर आहेत. आम्ही जी भाषा बोलतो तीच सभ्य, तीच प्रमाण आणि सुसंस्कत असल्याचा दावा करणा-या लोकांनी भाषा समजून घ्यावी. भाषेतले उपरोध, मार्मिकता समजून घ्यावी. भाषेचे शास्त्र आणि सौंदर्य समजून घ्यावे. मराठी भाषेत काना, मात्रा, उकार, वेलांटी, स्वल्पविराम, पुर्णविरामाच्या जागा बदलल्या तरी अर्थ बदलतो. अर्थाचा अनर्थ होतो. वामन पंडीतांचे एक वाक्य इथे संदर्भ म्हणून देता येईल. सदरचे वाक्य इथे लिहीले तर ते वाचून सभ्य व सुसंस्कृत भाषा बोलणारांच्या सभ्यतेचा गर्भपात होईल की काय ? असा प्रश्न पडतो. वामन पंडीताच्या त्या वाक्याचा इथे फक्त अर्थ सांगतो. सदर वाक्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, “पत्नी घरात नसताना घसा खवखवत असेल तर खडीसाखर खावी !” हेच वाक्य वामन पंडीतांनी मराठीतच मांडले आहे. ते त्यांनी जरूर वाचावे. पण ते वाक्य वाचून ही मंडळी वामन पंडीताची जिभ घसरली म्हणतील की झडून पडली म्हणतील ? या बाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. असो. भाषेतली झुंडशाही आजची नाही. प्रमाणभाषेची प्रमाणपत्रं वाटणारांच्या खासगीतल्या चर्चा ऐकल्या की दांभिक सभ्यतेचा व संस्कृतीचा बुरखा टराटरा फाटल्याशिवाय राहणार नाही.