‘माईंड पार्लर’ च्या माध्यमातून मिळतेय बौद्धिक मेजवानी…

28

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.30डिसेंबर):- येथील मित्र परिवाराने आज अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या सचिव दर्शना सरला अरुण पवार यांच्या ‘माईंड पार्लर’ ला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी माईंड पार्लर कसे उभे राहीले आणि भविष्यात कोणकोणते उप्रकम राबविता येतील यावर चर्चा झाली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दर्शना पवार यांना भेटण्यासाठी धरणगाव च्या मंडळींनी संपर्क केला असता त्यांनी ‘माईंड पार्लर’ ला या असे सांगितले. व्यवस्थित पत्ता विचारल्यानंतर प्रत्यक्ष माईंड पार्लर ला भेट दिल्यावर सर्वांना सुखद अनुभव आला.

विविध प्रकारची पुस्तकं एकाच ठिकाणी एकाच छताखाली असलेलं ठिकाण म्हणजे माईंड पार्लर. लहान मुलांपासून ते वृध्द व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडतील अशी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. बालसाहित्य, महापुरुषांचे चरित्र ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, नाटक, विविध ज्ञान शाखांचा परिचय करून देणारी विविधांगी पुस्तकं माईंड पार्लर मध्ये उपलब्ध आहेत. अमळनेरकर या ठिकाणी येऊन स्वतः पुस्तकं चाळतात आणि त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांची खरेदी करतात. दर्शना ताईंना जेव्हा विचारले की, माईंड पार्लर ची संकल्पना कशी डोक्यात आली तेव्हा ताईंनी सांगितले की आपल्याला भेटण्याचे हक्काचे ठिकाण हवे आणि त्या ठिकाणी लोकांना वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत यातून हा विचार पुढे आला.

आता या ठिकाणी एक छोटेखानी कार्यालय आणि पुस्तकांचं दालन असा दुहेरी योग पहावयास मिळतो. धरणगाव च्या मंडळींनी सांगितले की, लवकरच माईंड पार्लर चा प्रयोग आम्ही धरणगावी सुद्धा करू, यावेळी दर्शना पवार यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दर्शना पवार यांनी सावित्रीमाईंचा जन्मोत्सव, लीलाताई पाटील अशी पुस्तकं लिहिली आहेत आणि लवकरच त्यांचे जिजाऊ माँसाहेब यांच्यावर आधारित पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. या अविस्मरणीय भेटीप्रसंगी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राजेंद्र वाघ, पी.डी. पाटील सर, गोरख देशमुख, आकाश बिवाल, प्रफुल पवार, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.