महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महिला शिक्षण दिन व बालिका दिन उत्साहात साजरा

38

🔸शाळेतील विद्यार्थीनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.4जानेवारी):- ३ जानेवारी, २०२२ सोमवार रोजी स्थानीय सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत महिला शिक्षण दिन व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.आर.सोनवणे मॅम होत्या. याप्रसंगी सावित्रीच्या वेशभूषेतील मुलींनी व विचार मंचावर उपस्थित महिला शिक्षक भगिनींनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

इ.७ वी तील मुलींनी नंदिनी भोई, कोमल भोई, साक्षी माळी, चेतना जावरे यांनी पहिली माझी ओवी ग… हे सावित्रीमाईंचे गीत सादर केले. यानंतर सोनाली पाटील, रविता बारेला, चेतना जावरे, नीलिमा महाजन, हर्षाली सरदार, कोमल भोई, अर्चना भोई, रूपाली कुवर यांनी सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांवर प्रकाश टाकला.

या बालिका दिनाचे औचित्य साधून क्रीडा महोत्सव अंतर्गत रंगभरण व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिऱ्हाडे साहेब यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीमाईंचे ग्रंथ भेट देण्यात आले. शाळेतील सर्व सावित्रीच्या लेकींना एस.व्ही.आढावे यांच्याकडून मास्क वाटप करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी आकाश बिवाल यांच्याकडून विजयी विद्यार्थ्यांना पेन ( लेखणी ) भेट देण्यात आली. ज्येष्ठ लिपिक जे.एस.महाजन भाऊसाहेब यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.पी.आर.सोनवणे मॅम यांनी सावित्रीमाईंच्या जीवनावर सुंदर गीत सादर करून खऱ्या अर्थाने महिलांना शिक्षण देऊन गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम माईंनी केले. ३ जानेवारी ते १२ जानेवारी शासनाच्या परिपत्रकानुसार विविध स्पर्धांचे आयोजन शाळेत करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.व्ही.आढावे तर आभार पी.डी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू – भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.