गंगापुरी गावात महामातांच्या कार्याचा जागर…

28

🔹 छत्रपती शिवरायांच्या खऱ्या गुरु माँसाहेब जिजाऊ – पी.डी.पाटील सर

🔸 स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले – लक्ष्मणराव पाटील.

✒️पी.डी. पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगांव(दि.8जानेवारी):– ७ जानेवारी, २०२२ शुक्रवार रोजी धरणगाव तालुक्यातील गंगापुरी गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला.या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक हेमंत माळी यांनी केले. प्रास्ताविकात माँसाहेब जिजाऊ ते ज्ञानज्योती सावित्रीमाई या मातांचा जन्मोत्सवानिमित्त नऊ दिवसाचा प्रबोधनाचा जागर धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात येत आहे. यामध्ये विवरे, भवरखेडे, पष्टाने, सोनवद, बांभोरी, गंगापुरी, धानोरे, गारखेडे या गावांचा समावेश आहे.या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी गंगापुरी गावाच्या सरपंच हर्षालीताई पाटील होते. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून पष्टाणे गावाचे ग्रामपंचायत सदस्या राधिका पाटील, भारती पाटील, संगीता पाटील उपस्थित होते.

सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून महिला सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे शाल – श्रीफळ – गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महेश पाटील यांनी प्रमुख वक्ते पी.डी.पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा परिचय करून दिला.प्रमुख वक्ते पी.डी.पाटील यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. या महामातांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजची महिला सक्षम झालेली आहे.

या सर्व महामातांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रथम गुरु राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व अध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज होय. असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दांपत्यांनी केलेले आहे. आजच्या सर्व माता – भगिनींनी माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीमाई पर्यंतच्या महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे. अंधश्रद्धा , कर्मकांडापासून दूर रहा आणि शिक्षणाचा ध्यास घ्या. शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले होय. असे प्रतिपादन केले.

सर्व उपस्थित माता – भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. याप्रसंगी महेश पाटील, एस.पी.पाटील, निंबा पाटील, गोकुळ पाटील, गावाचे पोलीस पाटील सुरेश पाटील, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख उपस्थित होते.या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन व आभार इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे शिक्षक सचिन पाटील सर यांनी मानले. प्रबोधनपर व्याख्यान यशस्वीतेसाठी गंगापुरी गावाचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.