हे तर ग.आ.खांडेकर..! कसं काय म्हणता वि.स.खांडेकर?

25

[ज्ञानपीठ विजेते- पद्मभूषण वि.स.खांडेकर जयंती विशेश.]

_वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. सन १९७४ साली ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवी देऊन सन्मानित केले. त्यांच्या जयंती निमित्त श्री कृष्णकुमार गोविंदा नकोडे गुरूजींचा विशेष लेख… संपादक._

वि.स.खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. त्यांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने तेजस्वी लेखनीतून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणे, हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. त्यांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर ओसंडून वाहत असल्याचे दिसून येते. त्यांच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपटही काढण्यात आला आहे.

खांडेकर विष्णू सखाराम हे शब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे साहित्यिक होते. ते महाराष्ट्रातील श्रेष्ठ कादंबरीकार व लेखक होते. खांडेकरांचा जन्म सांगली येथे दि.११ जानेवारी १८९८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर हे होय. त्यांचे वडील आत्माराम बळवंतराव खांडेकर यांचे १९११ साली निधन झाले. त्यावेळी गणेशरावांचे वय अवघे तेरा वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ सखाराम रामचंद्र खांडेकर यांनी त्यांना दत्तक घेतले. त्यानंतर गणेशराव हे विष्णू सखाराम खांडेकर या नव्या नावाने ओळखले जाऊ लागले. मॅट्रिकची परीक्षा ते आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. परीक्षेत चांगले यश लाभल्यामुळे त्यांच्या मामांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला. परंतु गरीब परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण इंटरच्या वर्गातच सोडून द्यावे लागले. या काळात त्यांचा परिचय बालकवी- ठोंबरे, गणपतराव बोडस, अच्युतराव कोल्हटकर, का.र.मित्र आदी साहित्यिकांशी झाला. त्यांच्या लेखनाची सुरुवातही याच काळात झाली. ‘रमणीरत्न’ हे त्यांचे पहिले नाटक त्यांनी लिहून पूर्ण केले. कॉलेज सोडल्यावर ते सावंतवाडीला आपल्या बहिणीकडे राहू लागले.

सन १९१९नंतर खांडेकरांचे लेखन जोरात सुरू झाले होते. कादंबरी, काव्य, लेख, विनोदी साहित्य, असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. पुढे शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुढे ते लवकरच मुख्याध्यापक झाले. शिरोड्याचा त्यांचा काळ हा लेखक म्हणून उमेदीचा काळ होता. सन १९३८नंतर ते कोल्हापूरला जाऊन स्थायिक झाले. हृदयाची हाक, कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, अश्रू, ययाती, अमृतवेल, क्रौंचवध इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या. याशिवाय वायूलहरी, चांदण्या, सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी असे तीस कथासंग्रह, वनभोजन, धुंधुर्मास, फुल आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे लेख. आगरकर व गडकरी यांचे चरित्र आणि वाङ्मयाचे संग्रह प्रकाशित झाले. ज्वाला, देवता, सुखाचा शोध, माझं बाळ, लग्नं पहावं करून, सरकारी पाहुणा या चित्रपटांच्या कथा, संवाद आणि गीते त्यांनी लिहिली होती. त्यांचे विनोदी वाङ्मय वैशिष्ट्यपूर्ण होते. तर ‘रुपक कथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी आहे. अशा या प्रतिभासंपन्न ज्येष्ठ साहित्यिकाचे दि.२ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व लेखन:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com