संवेदनशील बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपलं

33

मुक्तांगणचे संस्थापक, जेष्ठ समाजसेवक, चित्रकार , पत्रकार, प्रसिद्ध लेखक, बालसाहित्यकार डॉ अनिल अवचट ( बाबा ) यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. डॉ अनिल अवचट यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर या गावी झाला. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या अनिल अवचट यांनी पुणे येथील बी जे मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस चे शिक्षण घेतले. कॉलेज जीवनात असतानाच त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला. युवक क्रांती दलाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. डॉ अनिल अवचट हे पेशाने पत्रकार आणि लेखक. आपली लेखणी त्यांनी कायमच सामान्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यवसायिकतेला नेहमीच नकार दिला.

त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ अनिल अवचट यांनी गरीब, मजूर, दलित, वंचित, भटक्या विमुक्त जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लेखन केले. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लेखन केले. १९६९ साली त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाचं नाव पूर्णिया असं होतं त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची एकूण २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन प्रेरणादायी होते. तरुण लेखकांचे ते प्रेरणास्रोत होते. तरुण लेखकांना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच पुढे असत. डॉ अनिल अवचटांच्या लिखानाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. डॉ अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धत ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रात वापरली जाते.

मुक्तांगणच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना व्यसनमुक्त केले आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांचे कार्य अतुलनीय असे आहे. डॉ अनिल अवचट हे केवळ लेखक आणि सामाजिक कार्यकर्तेच नव्हते तर एक उत्तम कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यातून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख होते. सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. डॉ अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्ष महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट पुस्तके म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील ओआया प्रांतात झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला होता.

सातारा येथील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार ( २००७ ), साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल साहित्य पुरस्कार (२०१० ) , महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२०११ ) तसेच त्यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला पुल कृतज्ञता पुरस्कार ( २०१५ ) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने संवेदनशील मनाचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपलं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डॉ अनिल अवचट यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. डॉ अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५