श्रावणबाळ सुताराच्या घरी गेला, कावड कातुन देगा मला आई बापाला नेतो काशीला.!

35

🔹नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.6फेब्रुवारी):- श्रावणबाळ सुताराच्या घरी गेला, कावड कातुन देगा मला, आई बापाला नेतो काशीला.! ‘ अशा धार्मिक, पौराणिक कथांचा संदर्भ घेत त्यावर सुंदर गीतरचना करून किंदरीच्या सुरात सूर मिसळवणारे नाथजोगी अलिकडे दुर्मिळ झाले आहेत. आधुनिकतेच्या लाटेत भगवान शंकर, चिलियाबाळ, श्रावणबाळ पंढरीचा पांडुरंग यांचा सात्त्विक आणि सत्य विचार, गीतावचन आपल्या किंदरीच्या स्वरातून घरोघरी पोहोचवणाऱ्या नाथजोगींच्या किंदरीचे स्वर त्यामुळे मंदावल्याचे दिसत आहे. विकासाच्या महामार्गापासून कोसो दूर असलेला नाथजोगी समाज आजही वस्ती पाड्यावर राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या समाजातील मुले आता थोडेफार शिक्षण घेऊ लागली, पण पिढ्यानपिढ्या उपेक्षित राहिलेला समाज सरकारी दप्तरी आजही नोकरीला नाही. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

वाट्याला आलेल्या थोड्याशा जमिनीच्या तुकड्यावर संसाराचा गाडा चालवणे, एखादा छोटा-मोठा व्यवसाय करणे आदी काम या समाजाचे लोक करतात. काहीच करण्याची ऐपत नसेल तर हातात किंदरी घेऊन चार दारात जाऊन संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करणे अशी नाथजोगी समाजाची परिस्थिती आहे. विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यात मूळ निवासी असलेला नाथजोगी समाजाचे नागरिक वर्षातील चार महिने हातात किंदरी घेऊन पोट भरण्यासाठी धडपडत असतात. मिळेल त्या ठिकाणी आपले बिहाड मांडून महाराष्ट्रभर भ्रमंती करीत असतात.