चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना स्वॅब चाचणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यावे :ना.वडेट्टीवार

  45

  🔸कोरोना उपायोजना ; जलसंधारण आणि कृषी विभागाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  🔹चंद्रपूर (दि :-२३ जून) : पूर्व विदर्भात नागपूर नंतर केवळ चंद्रपूर येथे अडीच कोटी रुपयांची कोरोना चाचणी प्रयोगशाळा पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकाच्या स्वॅब तपासण्या झाल्या पाहिजे. त्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची स्वॅब तपासणी करण्याबाबतचे काटेकोर नियोजन करण्यात यावे ,अशी सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी कोवीड १९ संदर्भात जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्याबाबत आग्रही भूमिका घेतली.
  या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.
  आजच्या बैठकीत कोरोना आजारासोबतच जिल्ह्यातील जलसंधारणासाठी आवश्यक असणाऱ्या बंधाऱ्यांची सद्यस्थिती व कृषी विभागामार्फत पूर्व हंगामात तयार करण्यात आलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला.
  सुरुवातीला कोरोना संदर्भात आढावा घेताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत या तिघांच्याही सादरीकरणानंतर जिल्ह्यामध्ये स्वॅब तपासणीच्या चाचण्या प्रथम वाढविण्याबाबतचे निर्देश दिले.
  नागपूर विभागात चंद्रपूर येथे आता प्रयोगशाळा सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात नमुने तपासणी करिता आले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्वॅब तपासणी होईल याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी आवाहन केले. सामान्य माणसाला आपल्या दैनंदीन आयुष्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही. मात्र त्याच्या आरोग्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा पद्धतीने येणाऱ्या काळात कोरोना विषयी जनजागृती करण्यात यावी. आरोग्य यंत्रणा प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ,असे प्रत्येक नागरिकाला वाटेल असे वातावरण व त्या पद्धतीच्या चाचण्या जिल्ह्यामध्ये करण्यात याव्यात, अशी सूचना केली.
  आरोग्य सेतू अॅपबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी सुचविले.आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकणाऱ्या अधिकाधिक बेड, आरोग्य व्यवस्थेच्या बाबतही त्यांनी यावेळी जाणून घेतले.
  जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या सर्व बंधाऱ्यामधून पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवणीसाठी कमीत कमी खर्चात उपाययोजना करण्याचे यावेळी त्यांनी सुचविले. नव्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून आतापर्यंत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व बंधारे पावसाळ्याच्या सुरुवातीला नंतर खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीचे नियोजन विभागाने करावे असेही स्पष्ट केले . सर्व बंधाऱ्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घ्यावी, याकडे लक्ष वेधले.नवीन बंधारे बांधताना पाणी वापर संस्था जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत नवीन बंधारा उभारू नये, अशा पद्धतीची अट घातली गेली पाहिजे. यावेळी जिल्ह्यातील काही अप्रतिम बंधाऱ्याचे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्या सुषमा साखरवाडे यांनी सादरीकरण केले.
  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील तालुकानिहाय पीक पेरणी संदर्भातील अहवाल सादर केला. जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक खाद्यान्न पेरणी सोबतच नगदी पिकांबाबतही योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या पाणीपुरवठा व पीक पद्धतीमध्ये योग्य तो बदल करून शेतकऱ्यांची संपन्नता कायम राहील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
  पालकमंत्र्यांचा उद्या देखील चंद्रपूर दौरा असून उद्या आणखी काही विभागांचे आढावा घेणार आहे.