कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात उच्च शिक्षणाची भुमिका महत्वाची: डॉ. अजित जावकर

85

✒️अमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.21फेब्रुवारी):-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ अर्थात ‘आर्टीफिशिअल इंटीलिजन्स’ विभागाचे विभागप्रमुख डॉ. अजित जावकर यांचे व्याख्यान न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर च्या राजर्षी शाहु महाराज सभागृहात नुकतेच आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना डॉ. जावकर यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगामध्ये उच्च शिक्षणाची भुमिका विषद करताना जागतीक पातळीवर होत असलेल्या संशोधनाचा आढावा घेऊन त्या पद्धतीने महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याची आवश्यकता विषद केली.पृथ्वीवर मनुष्य प्राण्याव्यतीरिक्त दुसरी तितकीच बुद्धीमान प्रजात अस्तित्वात आल्यास त्याच्या होणा-या परिणामावर आताच विचार करणं किंवा त्याबाबत अंदाज वर्तविणे देखील अवघड आहे.

या पुर्णपणे विषम अशा जगात माणुस खुप मागे पडलेला असेल. कारण त्याचे पृथ्वीवरील एकछत्री प्रभुत्व संपुष्टात आलेलं असेल, या कारणांमुळे जगातील प्रमुख देश कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधनाबाबत सर्वंकष धोरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सगळया बदलांना येणारी युवा पिढी सामोरी जाणार आहे. अशा स्थितीत या बदलांना सामोरे जाताना नविन तंत्रज्ञानाची निकडीत क्षेत्रामध्ये शिक्षणांच्या संधी निर्माण करणे, उच्च शिक्षणाची रचना बदलून काल सुसंगत अभ्यासक्रम तयार करणे यासाठी शिक्षण संस्थानी प्रयत्न केले पाहिजेत. कृत्रिम बुद्धीमत्ता वापरामुळे रोजगारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. परंतू यामुळे उच्च कौशल्य असणा-यांना रोजगाराची संधी वाढणार आहे. डेटा सायन्स, मशिन लर्निंग, सॉप्ट कंम्प्युटींग या क्षेत्रातील तज्ञांची मागणी भविष्यात वाढणार आहे. तसेच अगदी तळाच्या रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत. परंतु यांत्रिकीकरणांमुळे मधल्या पातळीवरील रोजगारांवर आघात होण्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरामुळे काही प्रक्रीया या स्वयंचलीत झाल्या आहेत.

तर काही पुर्णपणे कालबाह्य झाल्या आहेत. अनेक सेवांमध्ये पुर्वी कर्मचारी ज्या कौशल्याच्या आधारे काम करीत होते, आज त्यांची आवश्यकता राहिलेली नाही. परंतु या बदलाकडे सकारात्मक द्ष्टीने पाहताना भविष्याचा वेध घेणारी नविन शिक्षण पद्धती विकसीत करुन तिचा वेगाने प्रचार आणि प्रसार करण्याचे काम शिक्षण संस्थांनी केले तर येणार भविष्यकाळ उज्वल असेल असेही डॉ. जावकर म्हणाले.
दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या व्याख्यानात डॉ. जावकर लंडन वरुन ऑनलाईन सहभागी झाले होते. व्याख्यानाच्या उत्तरार्धात झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था चालकांनी प्रश्न विचारले, सर्वांच्या प्रश्नाला डॉ. जावकरांनी समर्पक उत्तरे दिली. या व्याख्यानासाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे पारनेर, शेवगांव, देवळाली प्रवरा, निघोज येथील महाविद्यालये, इंजिनीअरींग कॉलेज, लॉ कॉलेज मधील विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाईन सहभागी झाले होते.

व्याख्यानाच्या सुरवातीला प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. अरुण गांगर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी बोलताना संस्थेचे सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील यांनी जागतीक पातळीवर सुरु असलेल्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संशोधनाचा उहापोह केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी नवीन संशोधनाचा वेग लक्षात घेवून काल सुसंगत अभ्यासक्रम संस्था राबविणार असल्याचे सांगीतले. तसेच जून 2022 पासून संस्थेच्या न्यू आर्टस्, नगर च्या महाविद्यालयामध्ये सा.फु.पुणे विद्यापीठाशी संलग्नीत चार वर्ष कालावधीचा डेटा सायन्स हा नविन अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे घोषीत केले. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष श्री. नंदकुमार झावरे यांनी डॉ. अजित जावकर यांना संस्था भेटीसाठी निमंत्रण देवूण संस्था संचलीत महाविद्यालयांशी सामंज्यस्य करार करण्याची विनंती केली

. डॉ. जावकर यांनी श्री. नंदकुमार झावरे यांची विनंती स्विकारुन लवकरच अहमदनगर च्या न्यू आर्टस कॉलेजमध्ये भेट देण्याचे मान्य केले.कार्यक्रमासाठी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, कार्यकारी मंडळ सदस्य वसंतराव कापरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिपाली जगदाळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अरुण गांगर्डे यांनी केले.