मुक्त श्वासाच्या शोधात : सम्यक विचाराची ऊर्जादाही कविता

39

नूकताच रत्ना मनवरे यांच्या मुक्त श्वासाच्या शोधात हा कवितासंग्रह वाचण्यात आला. काळवंडलेल्या जगात स्व: श्वास गुदमरतोय आहे. गुदमरणार्‍या श्वासाला स्वातंत्र्याचा अधिकार पाहिजे. त्या स्वातंत्र्याच्या मुक्त आविष्कारातून हा कविता संग्रह साकार झालेला आहे.

वर्तमानातील सारे जीवन अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. स्वार्थी व ढोंगी व्यवस्था नंगानाच माजवत असून सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अनेक सावज टपून बसलेले आहेत. या टपून बसलेल्या सावजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय मुक्त श्वास घेता येणार नाही.स्त्री ही पूर्वीही गुलाम होती व आजही काही प्रमाणात गुलामच आहे. कारण स्त्रीचे सांस्कृतिक गुलामीपण हे नव क्रांती घडवून आणू शकली नाही. ती कोणत्याही धर्माची स्त्री असली तरी ती स्व: संस्कृतीच्या चाकोरीबद्ध जीवनातून पूर्णपणे मोकळी झाली नाही हे वास्तव आहे. पण कवियत्री रत्ना मनवरे ही अशा गुलाम व्यवस्थेच्या चक्रव्यूहात न फसता या व्यवस्थेला आव्हान देत आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, जिजाबाई ,फातिमा, रमाबाई, अहिल्याबाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श घेऊन समाजात नव विचारांची पेरणी करत आहेत. ही भारतीय समाजाला नवीन उंची देणारे घटनाच म्हणावी लागेल.

मुक्त श्वासाच्या शोधात हा कवितासंग्रह सृजनाच्या व भावनेच्या क्रियाशील प्रवाह आहे .या क्रियाशिल भावनेतून कवितांचा क्रांतीध्वज उंचावला आहे.डाॅ. हबीब भंडारे यांनी केलेले भाष्य माणुसकीच्या अस्तित्वाचा नैतिक तळ शोधणारी सकस आशयाची कविता व डॉ. युवराज सोनटक्के यांनी मुक्त श्वासाच्या शोधात असलेली तटस्थ कविता हे निरक्षणे अत्यंत सूचक व मूल्यपरिसमय आहेत. काटे वेचणाऱ्या स्त्री जीवनात फुलांचा ज्ञानमळा फुलवण्यात क्रांतिज्योती यांच्या विचारांनी ही कविता ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे या कवितेचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.

या कवितासंग्रहात एकूण ८० कवितांचा मूल्यजागर पाहायला मिळतो. वेदना, संघर्ष ,विद्रोह, प्रेम, भावनिकता, तळमळ ,कल्याण, देश, बाप ,आई ,संविधान अशा अनेक अंगाने या कवितांचा साकार झालेल्या आहेत. शब्दांची ठेवण जरी थोडी विसंगत वाटली तरीही वाचकाचे मन आकर्षून घेणारी आहे. या कवितासंग्रहातील बाबासाहेब शोधते मी ..ही कविता आशयाच्या अनुषंगाने उत्कृष्टपणे रेखाटली आहे .या कवितेत कवियत्री लिहिते की,

बाबासाहेबांच्या विचारांची नशा
करणारा तो अनुयायी शोधते मी
अन्यायाला प्रखर विरोध करणारा
तो क्रांतिकारी शोधते मी…

आज बाबासाहेबांच्या चळवळीतील अनेक अनुयायी बाबासाहेबांच्या विचारांना विसरले आहेत. त्यांच्यावर अन्याय होत असताना ते क्रांती करत नाही .यासाठी स्वतः क्रांती करण्याची जिद्द कवियत्रीची आहे.

जीवन संघर्षाचा अग्नी प्रवाह आहे. या अग्नी प्रवाहातून सम्यक जीवनाची यशस्विता व्हावी यासाठी आपण उंच भरारी घेतली पाहिजेत. नवा प्रकाश पसरवून अज्ञानावर व अत्याचारवर नवी क्षेपणास्त्रे आपण फेकले पाहिजेत .आपल्या कवितेतून त्या नव्या विचारांची ऊर्जा देत आहेत. उंच भरारी ही कविता उत्तुंग भावनेचा परिमार्जन विचार आहे.

झेप घेण्यास पंखाना
दोन हात करू दुःखाशी
पंख पसरू जिद्दीने
उंच भरारी आकाशी …

रत्ना मनवरे या कवयित्रीची ही कविता माणसाच्या मुक्तीचे गीत गाणारी आहे. बंदिस्त पिंजरे उघडून नव्या विश्वात विहार करणारी अप्रतिम कविता आहे. या कविता संग्रहातील अनेक कविता विचारवेधक व चिंतनात्मक पातळीवर खऱ्या उतरलेले आहेत. नव्या युगाची दोस्ती, बुद्धाची शिकवण, पाखरांची शाळा, सूर्य, श्वास, माणुसकी, क्रांती ,चवदार तळे एक संघर्ष .या कवितेतून मुक्त संवादांची नवी उर्मी जागृत झालेली आहे.मुक्त श्वासाच्या शोधात यामधील कविता वास्तवगर्भी व भावनाप्रधान प्रतिमाने रेखांकित झालेली आहे.स्त्रीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आवाज बुलंद करणारी आहे.

सावित्रीचा वारसा वसा
लेखणी आहे हातात
तोडून शृंखला गुलामीच्या
मुक्त श्वासाच्या शोधात….

मुक्त श्वासाच्या शोधात निघालेली ही कविता भारतीय स्त्री समाजाला नवे आव्हान करत आहे. विकृतीयुक्त विचारसरणीला झुगारुन सावित्रीमाईच्या विचारक्रांतीची मशाल प्रज्वलित करण्याची जिद्द स्त्रीमध्ये जागवत आहे.कवियत्रीचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. त्यामुळे आशय व बांधणीच्या घाटावर हा कवितासंग्रह पूर्णपणे उतरला नाही. पण माणुसकीच्या क्रांतीतत्त्वाची विचार पेरणी करण्यात यशस्वी झाला आहे . स्त्री आंदोलनाच्या नव्या कार्याला हा कवितासंग्रह ऊर्जा देणारा आहे. या कवितासंग्रहातील कविता सम्यक विचाराची ऊर्जादायी आहे. या करीता कवियत्री रत्ना मनवरेला पुढील काव्यप्रवासास मनःपूर्वक मंगलकामना चिंतितो…..

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००