तरच, मराठी मायबोलीचे ऋण फेडले जातील..

30

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा,
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धिराने केली मृत्यूवरही मात |

मराठी भाषेला ज्यांचे अपूर्व योगदान लाभले त्या ज्ञानतपस्वी,ज्ञानपीठकार,कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जन्म दिनी दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माय मराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यामुळे, मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनःपुर्वक हार्दिक सदिच्छा.

माझा मराठीची बोलू कौतुके,
परि अमृतातेही पैजासी जिंके |

असे म्हणत संत शिरोमणी ज्ञानेश्वरांनी मराठी वाड़ःमयाचे समृध्द दालन उघडले. मग ही ऐतिहासिक परंपरा जगद्गुरु संत तुकारामांपासून ते कविवर्य मंगेश पाडगावकरांपर्यंत अनेक दिग्गज साहित्यिक प्रतिभावंतांनी हा समग्र वारसा पुढे चालविला. आपल्या अभिजात, अजरामर मराठी साहित्य कलाकृतीने मराठी समाजमनावर गारुड केले. मराठी भाषेवर नितांत व निरलस प्रेम केले. मराठी भाषेची अभिरुची खऱ्या अर्थाने वैश्विक केली. मराठी ज्ञानभाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली.मराठी भाषेची वैविध्यता सर्वांगाने फुलते. मराठी भाषा ही दर बारा मैलावर बदलते असे म्हणतात. विविध रंग,ढंग,वैशिष्ट्ये अशी मोहक रुपे घेऊन ती नदीसारखी प्रवाही राहते. मग ती धारवाडी मराठी असो, कोकणी धाटाची मालवणी असो,खानदेशी पठारी असो किंवा वऱ्हाडी मराठी असो या प्रांतीय बोली भाषेचे माधुर्य आणि एकात्मता आपल्या या मायबोलीने कायम टिकविले आहे. म्हणूनच मराठी भाषेच्या या नजाकतीची आणि तिच्या गौरवार्थ लिहिलेल्या सुरेश भटांच्या या काव्यपंक्तीची ओघानेचं आठवण होते.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी..

नव्या युगाची आव्हान पेलण्याचे सामर्थ तिच्यात आहे. पण,दुर्दैवाने आपल्या मायबोलीचे हे सामर्थ आम्हांस अनभिज्ञ असणे हे आमचं करंटेपणा यासारखे दैवदुर्विलास ते कोणते ?आपल्या दैनंदिन व्यवहारात, आचरणात तिचा किती वापर होतो याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. तिची आज घुसमट होत चाललेली आहे. भाषेचे जतन,तिचे संवर्धन करणे तर दूरच.. उलटपक्षी आपण आपल्या मातृभाषेला दुय्यम दर्जा देऊन इंग्रजीच्या विळख्यात अडकलो आहोत.
मराठीवरील लोकभाषा म्हणून सर्वात मोठ संकट आहे ते शिक्षणाच्या क्षेत्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे व कॉन्वेंट शाळांचे एवढे पेव फुटले की, मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे आपल्याला कमीपणाचे वाटू लागले आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत, शेवटचे आचके देत आहे. मराठी शाळांची शोकांतिका झालेली आहे. परकिय भाषेचे अवास्तव प्राबल्य वाढू लागले आहे. याला कारणीभूत आपली बुरसटलेली मानसिकता. पाश्चात संस्कृतीचे अंधानुकरण करुन आज आपल्या आईला मम्मी म्हणून हाक मारणे यात आपण धन्यता मानतो. हे सार पाहून मायबोली मराठीला किती यातना आणि तिची आगतिकता होत असेल याची आपल्याला पुसटची कल्पनाही नसेल.
आपल्या मातृभाषेबद्दल मुलांना दूर घेऊन जाणे म्हणजे त्यांची सामाजिक, सांस्कृतीक पाळेमुळे खणून काढणे होय. या परकिय गुलामी भाषेच्या घुसखोमुळी आपण स्वतःच्या प्रगतीची वाढ मात्र खुंटतोय हे लक्षात ठेवले पाहिजे. सार्वजनिक जीवनात तिची अशी दयनीय अवस्था त्याहून राजकिय दरबारात तिची फरफट तर त्याहून बिकट.. आज मराठी ही राजभाषा म्हणून जरी मान्य केली असली तरी, तिची अंमलबजावणी किती होते हा यक्ष प्रश्न आहे.

आज राजदरबारात ती फाटक्या राजवस्त्रात उभी आहे. सरकारी कामकाजात तिचे दुय्यम स्थान दिसून येते. राजकिय पुढारी तीचा वापर फक्त राजकारणापुरता करतात. प्रत्यक्षात ती आज निषण्ण होऊन पाहते आहे. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे तीला आपण विसरत चाललो आहोत.आम्हांला ठाऊक आहे की, इंग्रजी शिक्षणामुळे ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. इंग्रजी भाषेला अभिजात व प्रगल्भ साहित्याचे अधिष्ठान आहे. इंग्रजी ही जगाची बोलीभाषा आहे. त्यामुळे साहजीकच जग जवळ येत आहे. प्रगतीची नवी दालने खुली झाली आहेत हे आम्हांला मान्य आहे. परंतु, याचा अर्थ माय मरो अन् मावशी उरो या म्हणी प्रमाणे आपली जी मानसिकता होऊ पाहते त्यावर मंथन आणि चिंतन होणे आत्यंतिक गरजेचे आहे. सरकारी, सामाजिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला पाहिजे. तिच्यावर निस्सिम आणि निर्व्याज प्रेम केले पाहिजे. मराठीचा जागर करुन तीला परत एकदा वैभवशाली केले पाहिजे. आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे याचे भान राखून तिच्या विकासासाठी साकल्याने गांभिर्याने विचार करण्याची आणि त्या अनुषंगांने कृतिशील होण्याची गरज आहे.
भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व निर्माण झाले पाहिजे. केवळ मराठी पाट्या लावून उपयोग नाही तर, दुकान मालक मराठी झाला पाहिजे. भाषेचा स्वाभिमान कसा असावा तर आपण दाक्षिणात्य आणि बंगाली लोकांकडून शिकले पाहिजे.

इंग्रजी नव्हे तर इतरही भाषांमधील ज्ञान व माहिती मराठीत आणून या ज्ञानाचे अभिसरण वाढवून एक व्यापक ज्ञान व्यवस्था उभारावी लागेल. मराठी भाषेच्या प्रबोधनकारी मुल्यनिष्ठांचे मनापासून स्विकार करणे आवश्यक आहे.मराठी साध्या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक ज्ञान महर्षी आज हयात आहेत. त्यापैकी थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ञ डॉ.शां.ब.मुजुमदार, न्युयॉर्कचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ.नरेंद्र जाधव असे किती तरी मोठी माणसे आज आपल्या कर्तृत्वाने जगात ठसा उमटून आहेत. म्हणून, केवळ वांझोटी भावनिक श्रध्दा न ठेवता, प्रत्यक्षात तिला व्यवहारात उतरायला हवी. याकरिता आपल्या मायबोलीची जाज्वल्य गौरवशाली परंपरा जोपासायला हवी. मराठी भाषा मनामनात आणि आसमंतात रुजवायला पाहिजे. तरचं आपल्या या मराठी मायबोलीचे ऋण फेडले जातील.

घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
अन् मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला..!

✒️अरविंद पांडूरंग जाधव(मुंबई)मो:-9869394791