जागतिक मराठी राजभाषा दिन

30

” माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन, दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान.” असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. तेंव्हा समस्त मराठी जनांना जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!!

कुसुमाग्रजांनी म्हटलेले आहे की,लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. ज्ञानेश्वरांनी देखील माय मराठी विषयी बोलताना, माझी मऱ्हाठीच बोलु कवतिके। अमृतातेही पैजा जिंके असे किती सार्थपणे म्हटले आहे.मराठी भाषेची गोडी खरंच अवीट आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यानुसार मराठी बोलण्याच्या पद्धतीत फरक पडताना दिसला तरी मराठीची गोडी मात्र त्याने कमी होत नाही. मग ती गावरान मराठी असो, वऱ्हाडी असो किंवा नागपूरी मराठी असो.जागतिकीकरणामुळे जवळ आलेल्या आजच्या स्पर्धात्मक जगात आपली मुले टिकून रहावीत यासाठी आपण बहुसंख्य पालक आपली मुले आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतो. अगदी आपल्यांपैकी बहुसंख्य पालक स्वत: मराठी माध्यमातच शिकूनही चांगले उच्चशिक्षित असलो तरीही नको बाबा, काळाप्रमाणे वागायला हवे. उगाच उद्या मुलांनी आपल्याला दोष द्यायला नको, असा सावध आणि व्यावहारिक पवित्रा घेऊन आपणच आपले समर्थन करत असतो. कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकणे आणि हुशारी यांचा ठोस असा काही संबंध खरंतर सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम आणि हुशारी हा वादाचाच मुद्दा होऊ शकतो. कारण, हुशारी आणि यश हे केवळ कोणत्या माध्यमात शिक्षण घेतले यावरच काही अवलंबून नसते. मराठी माध्यमात शिकूनही यशस्वी झालेले दिग्गज आपल्या भोवताली आजही आढळतातच ना…! अर्थात काळानुसार वागणे पण तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमात टाकूच नका असे म्हणणे हा मात्र दुराग्रह ठरेल असे मला वाटते.

परदेशात राहणाऱ्या आपल्या मराठी भाषिक बांधवांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याखेरीज पर्याय नसतोच. या आधुनिकीकरणाच्या जगात त्यामुळेच अमृतासमान गोडी असणारी आपली मायमराठी पुढच्या पिढ्यांमध्ये हळूहळू लोप पावत जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे. आम्ही माॅडर्न या नावाखाली घरातही मुलांशी मायबोली मराठीत न बोलणारे आणि बाहेरही मराठी बोलण्याची लाज बाळगणारे लोक याला जबाबदार आहेत. कारण मातृभाषेचे पहिले बाळकडू मुलांना घरातूनच तर मिळते ना! आपल्या भाषेचे पहिले बोल मुले आईवडिलांच्या, आजीआजोबांच्या तोंडूनच तर ऐकतात. बाहेरच्या जगात अन्यभाषिक लोकांशी त्यांच्या भाषा समजून घेऊन बोलावे लागतेच. पण मातृभाषेचे पहिले धडे घरातच मिळतात हे समजून आजकालच्या पालकांनी घरात तरी कटाक्षाने मराठीत बोलायला हवे. इंग्रजीसारख्या परभाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण किती धडपड करतो. तितकीच धडपड आजच्या काळातही आपली मराठी भाषा आपल्याला आणि आपल्या मुलांना चांगली बोलायला आणि लिहायला येईल यासाठी करायला हवी.

शाळेचे शिकवण्याचे माध्यम काही असो, आपल्या मुलांना आपली मराठी भाषा नीट लिहिता आणि बोलता तरी आलीच पाहिजे असा आग्रह आपण धरला पाहिजे आणि तसे प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या मराठी भाषेची आवड आपल्या मुलांच्या मनात जपणे आणि त्यासाठी एक मराठी भाषिक म्हणून आपण पुढाकार घेणे अतिशय गरजेचे आहे. सर्व पालकांनी विशेषत:, परदेशस्थ पालकांनी हा पुढाकार घेतला पाहिजे.परदेशात आजकल काही ठिकाणी मराठी शिकवण्याचे क्लासेस घेतले जातात. हा स्तुत्य उपक्रम आहे. मुलांना त्यांच्या फावल्या वेळात अधूनमधून काही मराठी कविता किंवा गाणी ऐकवणे, हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपट किंवा नाटक किंवा एखादी चांगली मराठी मालिका दाखवणे, मराठीत लिहीलेली गोष्टीची पुस्तके वाचायला प्रोत्साहन देणे अशा मार्गांनी त्यांच्यात मराठी भाषेची गोडी आपण निर्माण करू शकतो.

आजच्या जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या सोईने यातल्या एखाद्या तरी उपक्रमाचा आपल्या घरापासूनच शुभारंभ करून आपल्या मायबोली मराठीचे जतन करावे असे मला वाटते. चला तर मग….आपल्या मराठी मातृभाषेचे जतन करु या…!!!

✒️राजेंद्र लाड(शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो:-९४२३१७०८८५)