गडचिरोली प्रशासनाचा ‘गडचिरोली लाईव्ह’ हा अतिशय नाविण्यपूर्ण प्रकल्प – पालकमंत्री, एकनाथ शिंदे

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1फेब्रुवारी):- गडचिरोली जिल्हयातील नागरीकांपर्यंत प्रशासनाच्या महत्वाच्या सूचना, हवामान व नैसर्गीक आपत्ती संदर्भातील आवश्यक सूचना लवकरात लवकर पोहचविण्यासाठी या एपचा उपयोग चांगला होईल असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मोबाईल अॅप आधारित “गडचिरोली लाईव्ह” रेडिओ ॲपची सुरुवात करण्यात आली. सूचना, संवाद व ज्ञानगंगा अशा विषयांचा समावेश गडचिरोली लाईव्ह या अॅपमध्ये असेल. नागरीकांसाठी आवश्यक अशा सूचना त्यांच्या पर्यंत पोचविणे, शासकिय योजनांची माहिती लोकांना पोहचविणे, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती तसेच नागरीकांशी संवाद साधणे व रेडिओच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे आणि या उद्देशाची पुर्तता व्हावी म्हणून गडचिरोली लाईव्ह या ॲपचा वापर जिल्हयातील नागरिकांनी करावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीवेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांसाठी विविध प्रशासनातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी आवारात दोन डीजीटल स्क्रीन बसविलेल्या आहेत त्याचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगरू डॉ.प्रशांत बोकारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

*एकल केंद्र, गडचिरोली : गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन*
गडचिरोली,(जिमाका)दि.01: पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 01 मार्च रोजी गडचिरोली येथे एकल केंद्र गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच काही सूचना त्यांनी यावेळी उपस्थित संबंधित अधिकारी वर्गांना दिल्या. प्रकल्पाची संकल्पना ही गौण वनोपज आधारित प्रकल्प ह्याचे उद्देश वनसंवर्धन आणि व्यवस्थापनातून शाश्वत दृष्टीकोन ठेवून दुर्बल लोकांसाठी उपजीविका निर्माण करण्यासाठी संभाव्य गौण वनोपजांचा संग्रह, साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग, व्यापार, प्रतवारी, गौण वनोपजांच्या वस्तूंचे वर्गीकरण यासाठी स्वयं-शाश्वत केंद्रे विकसित करणे हा आहे. ही केंद्रे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजसह सक्षम केली जातील. सदर केंद्रांना क्रेडिट लिंकेज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगरू डॉ.प्रशांत बोकारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
प्रकल्पाची उद्दिष्टे ही गौण वनोपजांच्या संदर्भात ग्रामसभांना प्रशिक्षित करणे आणि त्यांची क्षमता वाढविणे, गौण वनउत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक क्रियाकलाप सुलभ करणे, गौण वनउत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक क्रियाकलापांना समर्थन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे, ग्रामसभा, स्वयंसहाय्यता गट आणि इतर भागधारकांना गौण वनउत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सहभागी करुन घेणे अशी आहेत. एकल सेंटरचे 6 संभाव्य ठिकाणे गडचिरोली, धानोरा, कोरची, वडसा, एटापल्ली, भामरागड याप्रमाणे आहेत. यापैकी गडचिरोली येथील एकल सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या एकल सेंटरमध्ये प्रशासकीय सुविधा, प्रशिक्षणे, बँकिंग, गोडाऊन ही सुविधा देण्यात येणार आहेत. एक ‘एकल सेंटर’ उभारणीला अंदाजित खर्च रुपये 1 कोटी पर्यंतचा आहे.

 

*गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन*

गडचिरोली,(जिमाका)दि.01: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित गोंडी व माडीया भाषेतील क्रमिक पाठयपुस्तकांच्या भाषांतरीत पुस्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रकाशन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या पुस्तकांच्या प्रकाशनामागे आदिवासी विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेशी जोडून, संस्कृतीशी तसेच त्यांच्या जिवनाशी जोडून केली तर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षीत बदल होऊ शकतो असा उद्देश आहे. आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्राथमिक शिक्षणावर भर देणे आवश्यक असून विद्यार्थ्यांचे जीवन इथेच घडते, जीवनाला मार्ग मिळतो, मेंदूची वाढ याच काळात होते, जीवनाचा पाया इथेच रचला जातो व विद्यार्थ्यांचा नैसर्गिक शक्तीचा विकास करण्यासाठी योग्य वय म्हणजे प्राथमिक शिक्षण होय हा मागील हेतू आहे. म्हणून त्यांना समजेल अशा भाषेत शिकविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांनी यावेळी सांगितले.