महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाची भरती सुरु करा

33

🔹राज्यातील 160 रिक्त पदे भरण्याची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाची मागणी- शरद पवारांना दिले निवेदन

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.8मार्च):- गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पद भरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाही ही समावेश आहे. ही बाब राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने पुणे येथे त्यांना निवेदन देऊन महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाची भरती तात्काळ सुरु करण्यासाठी साकडे घातले.ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो.

महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्वाची भूमिका बजावत असतो. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद गेल्या अनेक वर्षापासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. उच्च शिक्षण घेऊन अर्धे आयुष्य संपले तरी राज्यातील पात्रता धारक आज नोकरी कधी मिळेल या आशेवर जीवन जगत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदभरतीसाठी पाठपुरावा करीत आहे. तसेच पुणे येथे उपोषण ही केले आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत पुणे येथे दोन तास बैठक ही झालेली आहे. त्यावेळी संघटनेला फक्त आश्वासन मिळाले. मात्र अद्याप प्रत्यक्ष भारती सूरु झालेली नाही त्यामुळे राज्यातील पात्रता धारकांमध्ये कमालीची निराशा निर्माण झालेली आहे.

ग्रंथपाल पद हे महाविद्यालयातील प्राचार्या प्रमाणे अत्यंत महत्वाचे पद आहे. ग्रंथपाल पद एकाकी असूनही भरती बाबत सतत दुर्लक्षित राहिले आहे. राज्यातील महाविद्यालयात 160 ग्रंथपालांची पदे रिक्त आहेत. फक्त 160 पदे भरण्यासाठी शासनाला काय अडचण येत आहे अशी विचारणा आज पात्रता धारक करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे सदस्य संतोष केंगले, आनंद नाईक, कुलदीप पवार, शांतीलाल अहिरे, समीर मोरे सह आदींनी भेट घेऊन वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयातील ग्रंथपालांच्या पदभरती संदर्भात चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द दिला.