परिक्षा काळातील विजेचे भारनियमन रद्द करा

28

🔹विजयसिंह पंडित यांची मागणी

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.१४मार्च):-कोरोनाच्या संक्रमण काळानंतर पहिल्यांदा ऑफलाईन परिक्षा सुरु होत आहेत. सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षेसह पदवीच्याही परिक्षा सुरु आहेत. ग्रामीण भागात विजेचे भारनियमन आणि विज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे विजेअभावी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे परिक्षा काळातील विजेचे भारनियमन विज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी विजयसिंह पंडित यांनी केली आहे. या बाबत त्यांनी ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना लेखी निवेदन दिले आहे.

कोरोना संक्रमणाच्या कठिण परिस्थितीनंतर तब्बल दोन वर्षाने शाळा आणि महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु झालेली आहेत. सध्या दहावी, बारावी या बोर्ड परिक्षेसह पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्याही परिक्षा सुरु आहेत. ग्रामीण भागात एैन परिक्षेच्या काळात रात्रीच्यावेळी सुरु असलेले भारनियमन आणि विजबिल भरणा न झाल्यामुळे विज कनेक्शन तोडण्याची मोहिम महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. विजेअभावी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी सातत्याने या विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे परिक्षेच्या काळातील भारनियमन रद्द करून विज कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेला स्थगिती देण्याची मागणी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली आहे.

विजयसिंह पंडित यांनी या प्रकरणी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना लेखी निवेदन देवून महावितरणच्या भारनियमन आणि विज कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या बाबत पाठपुरावा सुरु केला आहे.