गंगाखेड मतदार संघातील प्रश्नाबाबत आमदार गुट्टे यांनी विधानसभेत आवाज उठविला

52

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21मार्च):-खरीप 2018 हंगामातील दुष्काळ अनुदान, खरीप 2020 हंगामाचा मंजूर पिकविमा,पालम ते जांभूळ बेट,फळा रस्त्यावरील पूल, मौजे धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची मागणी करत धान्य अधिकोष सेवा सह. संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासन निर्णयानुसार जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १५१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळी सवलती लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली. यानुसार गंगाखेड मतदार संघातील गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी व राणीसावरगाव तसेच पूर्णा तालुक्यातील लिमला या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला. परंतु आजतागायत खरीप २०१८ हंगामातील दुष्काळ बाधित शेतकऱ्यांना ४१ कोटी २५ लक्ष रुपये अनुदान वितरित झाले नाही.

त्याचप्रमाणे खरीप हंगाम २०२० चा पिंपळदरी ता. गंगाखेड व शेळगाव ता. सोनपेठ या महसूल मंडळाचा सोयाबीन पिकाचा मंजूर असलेला पिक विमा आणि गंगाखेड व पालम तालुक्यांना तूर या पिकांचा ५० कोटी २६ लाख २३ हजार ८०४ रुपये मंजूर पिक विमा आज पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. रिलायन्स पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. याबाबतीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार व कृषिमंत्री मा.ना. दादा भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. आमदार गुट्टे यांनी आज अर्थ संकल्प अधिवेशनामध्ये याबाबत मुद्दा उपस्थित करून २०१८ चे दुष्काळी अनुदान व २०२० चा मंजूर पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची मागणी केली.

त्याचबरोबर मौजे धारासुर ता. गंगाखेड येथील अकराव्या शतकातील श्री गुप्तेश्वर मंदिर वास्तू कलेचा प्राचीन व ऐतिहासिक नमुना आहे. गुप्तेश्वर मंदिर आज रोजी अत्यंत जीर्ण झाले असून ही ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मंदिराचा जीर्णोद्धारचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून निधी देण्यासंदर्भात विधानसभेत मागणी केली. या वर्षी अतिवृष्टीने गंगाखेड मतदारसंघातील रस्ते व पुलांचे अतोनात नुकसान झाले असून याबाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव (रस्ते), मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांच्याकडे रस्ते विकासाकरिता निधीची मागणी सुद्धा केली होती. परंतु माझ्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामाकरिता केवळ दहा कोटी रुपये सुद्धा निधी दिला नाही. शेजारील नांदेड जिल्ह्यात यासाठी अठराशे कोटी रुपये मिळतात आणि आम्हाला केवळ तुटपुंजा निधी दिला जातो हा कोणता न्याय म्हणायचा ? असा प्रश्न आमदार गुट्टे यांनी उपस्थित करुन गंगाखेड मतदार संघातील रस्ते विकास कामाकरता निधीची मागणी केली.

पालम ते जांभुळबेट व फळा या गावाकडे जाणारा रस्ता व पुल अत्यंत खराब झाला आहे. मौजे फळा येथे एकादशी निमित्त श्री संत ह.भ.प. मोतीराम महाराज यांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या वारकरी मंडळींसह या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या रस्त्याच्या विकास कामाकरिता तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा व तसेच परभणी जिल्ह्यातील काही राजकीय पुढाऱ्यांनी धान्य अधिकोष सह. संस्थेच्या बोगस व बनावट दस्तऐवज करून सहकार विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून व संगणमत करून धान्य अधिकोष संस्थेच्या नोंदणी केलेल्या आहेत. ज्या कामासाठी धान्य अधिकोष संस्थेचे नोंदणी झाली आहे ते काम होत नाही. या संस्थेचा वापर केवळ राजकारणासाठी उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती बँक व बाजार समित्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धान्य अधिकोष सह. संस्थेचा वापर केला जातो. त्यामुळे अशा बोगस संस्थावर कारवाई करून त्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विधिमंडळात लावून धरली.