बलिदान दिनी तुम्हां कोटी कोटी सॅल्युट!

45

[राष्ट्रीय शहीद दिवस: क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव पुण्यस्मरण विशेष]

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात येऊन शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आली. दि.२३ मार्च १९३१च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय शहीद दिन’ म्हणून पाळण्यात येतो. अमर शहीदांचे अचाट अजरामर शौर्य श्री एन. कृष्णकुमार यांच्या शब्दशैलीतून वाचा… नोव्हेंबर १९२८मध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकाऱ्याला मारले.

भगतसिंग: हे एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भगतसिंगांचा जन्म दि.२८ सप्टेंबर १९०७ रोजी तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशनसिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे वडील व काका हे करतारसिंग साराभाई व हर दयाल यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते. दि.९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर ‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले.

हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली. खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला, तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय.

शिवराम हरी राजगुरू: शिवराम राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले.

नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही त्यांचा सहभाग होता. राजगुरूंचा जन्म पुण्याजवळ खेड येथे दि.२४ ऑगस्ट १९०८ रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. लहानपणी १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. शिक्षणासाठी ते आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयत, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने- वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. त्याकाळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झांशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती. काशी येथील पं.मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते. राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती साँडर्सच्या वधाच्या वेळी!

सुखदेव: सुखदेव हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांचे मूळ नाव सुखदेव रामलाल थापर होते. त्यांचा जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे दि.१५ मे १९०७ रोजी झाला. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्लीदेवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली. सुखदेवांनी ल्यालपूर- पंजाब येथे सन १९२६पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे सन १९२८मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिव वर्मा, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग व भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम असे ठरविण्यात आले- १) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे. २) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे. ३) जातियतेविरुद्घ लढणे. ४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे. या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. सन १९२९ साली लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात येऊन शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आली. दि.२३ मार्च १९३१च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय शहीद दिन’ म्हणून पाळण्यात येतो.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे राष्ट्रीय शहीद दिनी सर्व नामानाम हुतात्म्यांना मानाचा लवून मुजरा !!

✒️संकलनकर्ता:-श्री. एन. कृष्णकुमार,से.नि.अध्यापक[भारतीय स्वातंत्र्यवीरांचा स्फूर्तिदायक इतिहास अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली, व्हॉ. नं. ७४१४९८३३३९