शहीद भगतसिंग

28

१८ व्या शतकात युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीने जगभर अनेक बदल झाले. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासात प्रचंड भर पडल्याने धार्मिक, सामाजिक, राजकीय अन आर्थिक क्षेत्र ढवळून निघाले. या क्रांतीने उत्पादनाच्या साधनांवर मालकी असलेला नवा भांडवलदार वर्ग आणि उप्तादनाच्या साधनांवर मालकी नसल्याने श्रम विकल्यावाचून पर्याय नसलेला कामगार वर्ग उदयास आला. वस्तूंचे प्रचंड उत्पादन होवू लागले. प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेल्या वस्तूंचा खप करण्यासाठी आणि नव्या वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्यासाठी बाजारपेठा बळकावणे आणि नव्या प्रदेशांचा शोध घेवून त्यावर सत्ता लादणे यावरुन औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये स्पर्धा लागली. या स्पर्धेतून वसाहतवादाचा अन जागतिक महायुद्धांचा जन्म झाला.
भारतात आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तूगाल लोकांनी अनेक आक्रमणे केली. त्यात इंग्रज यशस्वी झाले. १८५७ पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची तर १८५७ पासून ते १९४७ पर्यंत इंग्लंडच्या राणीची भारतावर सत्ता राहिली.ज्याप्रमाणे भांडवलदारांचा अन वसाहतीकरणाचा जन्म औद्योगिकरणातून झाला त्याचप्रमाणे कामगार ही क्रांतीकारी शक्ती अन वसाहतीकरणाविरोधातील वसाहतीखालील देशांतील जनतेची क्रांतीकारी आंदोलने या शक्ती दुसऱ्या बाजूला उभ्या राहिल्या.मानव जातीच्या आधुनिक युगाच्या इतिहासाची पाने अशाप्रकारच्या दोन शक्तींमधील संघर्षाने भरलेली आहेत. या संघर्षात एकीकडे जुलूम, अत्याचार, अन्याय आहे तर दुसरीकडे स्वातंत्र्याची उदात्त भावना अन त्यासाठीचा त्याग व बलिदान आहे.

२० व्या शतकात इंग्रजी साम्राज्यवादी शक्तीसमोर भारतामध्ये शहीद भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी उभे केलेले आव्हान, या तरुणांचा संघर्ष, या संघर्षामागचे त्यांचे क्रांतीकारी तत्वज्ञान आणि आपल्या विचारांसाठी या तरुणांनी दिलेली प्राणांची आहूती हे सगळे रोमांचकारी तर आहेच पण आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.

*पार्श्वभूमी*

महामानवांचे कार्य अन त्यामागच्या प्रेरणा परिस्थितीने निर्माण केलेल्या जानीवा कारणीभूत असतात. म्हणून, महामानव समजून घेत असताना महापुरुषाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी समजून घेणे महत्वाचे असते.भगतसिंग वाढत होते तो काळ भारतीयांच्या इंग्रजी सत्तेविरुद्धच्या लढ्यांचा व धामधुमीचा काळ होता. महात्मा गांधींनी सत्य अन अहिंसा ही तत्वे घेवून इंग्रजी सत्तेविरुद्ध सत्याग्रह, असहकार अशा माध्यमातून संघर्ष छेडला होता. देशभर गांधीजींच्या नेतृत्वाला मान्यता मिळत होती अन अनेक लोक गांधींसोबत लढ्यात उतरत होते.गांधींच्या अहिंसावादी मार्गाने देशाला कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही, इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढाच उभारावा लागेल अशा मताचा क्रांतीकारी गटही उभा राहत होता.कार्ल मार्क्स या तत्ववेत्याने शोषणावर आधारीत भांडवलशाहीच्या अंतासाठी जगातील तमाम कामगारांना एकत्र येण्याची घोषणा करीत साम्यवादाचे शास्त्रशुद्ध तत्वज्ञान ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ आणि ‘भांडवल’ या लिखाणाद्वारे मांडले होते. मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादी तत्वज्ञानाने प्रभावित होवून १९१७ साली लेनिनने रशियामध्ये क्रांती घडवून आणली होती. जगभरातले तरुण मार्क्सच्या तत्वज्ञानाने अन लेनिनच्या क्रांतीने प्रभावित झालेला तो काळ होता.भगतसिंग हे संवेदनशील, कुशाग्र बुद्धिमत्तेचे अभ्यासू तरुण होते. जगात अन देशात घडत असलेल्या या महत्वाच्या घडामोडींचा प्रभाव त्यांच्यावर पडणे साहजिक होते. पण भगतसिंग या घटनांनी नुसतेच प्रभावित झालेले नव्हते तर या घटनांचे व्यवस्थित आकलन त्यांना झाले होते. मार्क्सचे शास्त्रीय समाजवादी तत्वज्ञान, लेनिनची रशियातील क्रांती आणि भारतीय स्वातंत्र्यलढा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भगतसिंगातला क्रांतीकारी तरुण तयार होत होता.

*जडणघडण*

भगतसिंगांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी सरदार किशनसिंग आणि विद्यावती या दांपत्याच्या पोटी तत्कालीन पंजाब प्रांताच्या लायलपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला. भगतसिंगांचे वडील, चुलते अन अनेक नातलग भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होते. या सक्रियतेमूळे त्यांचे वडील व चुलत्यांना जेल भोगावा लागला होता.
किशोर वयात भगतसिंग महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होवून १९२० साली गांधींनी छेडलेल्या असहकार आंदोलनात सामील झाले होते. पण १९२२ च्या चौरीचौरा येथे झालेल्या हिंसाचारामूळे गांधींनी हे आंदोलन मागे घेतल्याने भगतसिंगांची घोर निराशा झाली.
भगतसिंग हे अभ्यासू तरुण होते. त्यांनी कार्ल मार्क्स, जोसेफ मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, लेनिन, मॅक्झिम गॉर्की, बाकुनिन, रुसो, व्हॉल्टेअर, सचिंद्रमाथ सन्याल, ऑस्कर वाईल्ड अशा अनेक लेखकांची पुस्तके वाचली. भगतसिंगांना क्रांतीकारी, समाजवादी विचार महत्वाचे वाटू लागले. भारताला नुसते इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवायचे नाहीये तर इंग्रजी सत्ता ही ज्या भांडवलशाहीचा विस्तार असलेली साम्राज्यवादी शक्ती आहे त्या शोषणावर उभ्या असलेल्या सत्तेचा पाडाव करुन कष्टकऱ्यांची सत्ता असलेली समाजवादी सत्ता निर्माण करायची आहे याबाबत ते आग्रही झाले. कार्ल मार्क्सचे साम्यवादी तत्वज्ञान, या तत्वज्ञानाला वास्तवात उतरवण्यासाठी रशियात लेनिनने केलेला प्रयोग या त्यांच्या जडणघडनीतल्या महत्वाच्या जागतिक घटना ठरल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील भगतसिंगांचा एकंदर प्रवास अन त्यांच्या त्याग, बलिदानामागे या दोन घटनांचा महत्वाचा वाटा आहे.

*सर्वगुणसंपन्न भगतसिंग*

‘मानव जातीने संचित केलेल्या कला, ज्ञान, तत्वज्ञान, विज्ञान, इतिहास आदींचा अभ्यासक हाच खरा क्रांतिकारक होवू शकतो’ असे लेनिन सांगतात. भगतसिंग हे असेच सच्चे क्रांतिकारक होते. भगतसिंग यांचा वाचनाचा व्यासंग दांडगा होता. ते अभिनय कलेत प्रवीण असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होत. पत्रकार म्हणूनही भगतसिंगांनी अनेक नियतकालिकांतून काम केले. तत्कालीन सामाजिक, राजकीय अन आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारे महत्वपूर्ण लिखाण भगतसिंगांनी वेगवेगळ्या नावाने केलेले आहे.भगतसिंग हे मुत्सद्दी होते, उत्तम संघटक होते. इंग्रजांविरुद्धचे लढे, इंग्रज अधिकाऱ्यांना मारण्याचे कट, न्यायालयात दिलेली साक्ष यातून भगतसिंगांतील विविध गुणांचे दर्शन होते.भगतसिंग हे आक्रमक, लढवय्ये अन देशासाठी त्याग करणारे होते, एवढीच मर्यादित प्रतिमा रंगवण्यात आली. पण ते उत्तम अभ्यासक, वक्ते, संघटक, मुत्सद्दी नेते, पत्रकार, कलाकार होते हे जाणीवपूर्वक लपवले जाते.

*नास्तिक विचारांची मांडणी*

प्राचीन काळापासून भारतात विविध विचारधारा अस्तित्वात आहेत. पण भारत हा अध्यात्मिक विचारांचा देश आहे अशी एकतर्फी प्रतिमा रंगवली गेली. चार्वाकांचा लोकायत तसेच सांख्य, बौद्ध, जैन अशा अनेक निरीश्वरवादी विचारधारांचा इतिहास भारताला आहे.
आधुनिक काळात नास्तिकवादाची मांडणी करण्याचे महत्वपूर्ण कार्य भगतसिंगांनी ‘मी नास्तिक का आहे?’ या दीर्घ निबंधाच्या माध्यमातून केले. आपण घमेंडखोरी स्वभावामुळे ‘नास्तिक’ नसून नास्तिकतेमागे आपली वैचारिक भूमिका आहे, हे भगतसिंगांनी स्पष्ट केले. जगातील मानवनिर्मित दु:खांना देवाच्या नावाने खपवण्याची शोषक वर्गाची चलाखी भगतसिंगांनी अनेक दाखले देवून, तर्कशुद्ध पद्धतीने उघडी पाडली. देवा-धर्माच्या आडून शोषणाचे समर्थन होवू शकत नाही हे सांगितले. भगतसिंगांच्या या लिखाणातून ते दृष्टे विचारवंत असल्याचे दिसून येते.

*नौजवान भारत सभा*

विद्यार्थी दशेत भगतसिंगांनी साधारणत: १९२६ च्या सुमारास ‘नौजवान भारत सभा’ या विद्यार्थ्यांच्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी राजकारणात पडू नये हा तत्कालीन प्रतिवाद आपल्या लिखाणाद्वारे मोडीत काढत विद्यार्थी हीच देशाची प्रमुख ताकत अन भावी नेतृत्व असल्याने विद्यार्थ्यांनी राजकारणात लक्ष घालण्याची आवश्यकता स्पष्ट केली. ‘शिक्षा और संघर्ष साथ साथ’ हा नारा भगतसिंगांनी त्याकाळी दिला.

*हिंदूस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन*

सन १९२४ साली रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आजाद, सचिंद्रनाथ सन्याल, योगेशचंद्र चटर्जी या क्रांतिकारकांनी ‘हिंदूस्तान रिपब्लिक असोसिएशन (HRA)’ या संघटनेची स्थापना केली. इंग्रजी सत्ता उलथवण्यासाठी सशस्त्र लढा उभा करणे हा या संघटनेचा उद्देश होता.१९२८ च्या सुमारास भगतसिंगांनी या संघटनेच्या नावात ‘सोशालिस्ट’ हा शब्द अंतर्भूत करुन ‘हिंदूस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन (HSRA)’ असे नामकरण केले. यातला ‘सोशालिस्ट’ म्हणजेच ‘समाजवादी’ हा शब्द उत्पादनाच्या साधनांवर समाजाची मालकी असलेली व्यवस्था सूचीत करतो. याचाच अर्थ भगतसिंगांना फक्त इंग्रजांना या देशातून घालवायचे नव्हते तर इंग्रज या देशातून गेल्यानंतर इथे मुठभर भांडवलदारांची सत्ता असलेली ‘भांडवलशाही’ नको होती तर तमाम कष्टकऱ्यांची सत्ता असलेली ‘समाजवादी’ व्यवस्था आणायची होती हे अधोरेखित होते. आज भांडवलशाहीने अन भांडवलशाहीच्या खाजगीकरण, उदारीकरण अन जागतिकीकरण या नवसाम्राज्यवादी अवताराने धुमाकूळ घालत सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे, त्याकाळात जाणीवपूर्वक भगतसिंगांचे समाजवादी विचार तरुणांपासून लपवले जातात.’हिंदूस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन’ने संघटन व क्रांतिकारी विचारांचा प्रचार-प्रसार करावा तर ‘हिंदूस्तान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी’ ने प्रत्यक्ष क्रांतीकारी कार्य अन सशस्त्र कारवाया हातात घ्याव्यात अशीही रचना करण्यात आली.

*सॉंडर्सची हत्या*

भारतातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सन १९२८ च्या सुरुवातीला इंग्रजांनी ‘सायमन कमिशन’ची नेमणूक केली. परंतू, या कमिशनमध्ये भारतीयांना सामावून न घेतल्यामुळे सायमन कमिशमविरुद्ध भारतीयांमध्ये आक्रोश निर्माण झाला. पंजाब येथील भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते लाला लजपतराय यांनी सायमन कमिशविरुद्ध ऑक्टोबर १९२८ मध्ये मोर्चा काढला. या मोर्चावर इंग्रज अधिकारी स्कॉट याच्या आदेशानुसार बेछूट लाठिमार करण्यात आला. लाला लजपतराय गंभीर जखमी होवून दि. १७ नोव्हेंबर १९२८ रोजी दगावले. लाला लजपतरायांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांनी इंग्रज अधिकारी स्कॉट यांच्या हत्येचा कट रचला. लाला रजपतरायांच्या मृत्यूनंतर बरोबर एक महिन्यानंतर दि. १७ डिसेंबर, १९२८ रोजी ही हत्या घडवून आणण्याचे ठरले. पण प्रत्यक्ष घटनेच्याप्रसंगी स्कॉट ऐवजी जॉन सॉंडर्स या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या गेल्या.सॉंडर्स हे तत्कालीन व्हॉइसरॉयच्या खाजगी सचिवाचे जावई होते. सॉंडर्सच्या हत्येमुळे इंग्रज सरकार हादरले. पुढे याच हत्येसाठी जबाबदार धरुन भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना इंग्रज सरकारने फासावर चढवले.

*बहिऱ्या इंग्रजांचे कान उघडण्यासाठी सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब हल्ला*

दि. ८ एप्रिल, १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतीकारकांनी ‘पब्लिक सेफ्टी बिल’ अन ‘ट्रेड डिस्प्यूट बिल’ या दोन बिलांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि बहिरेपणाचे सोंग घेतलेल्या इंग्रजांचे कान उघडण्यासाठी दिल्लीच्या ‘सेंट्रल असेंब्लीत’ दोन बॉंब टाकले. ‘पब्लिक सेफ्टी बिलाद्वारे’ निव्वळ संशयाच्या आधारे, कुठलीही न्यायालयीन प्रक्रिया न राबवत क्रांतिकारकांना अटक केले जाणार होते तर ‘ट्रेड डिस्प्युट बिल’द्वारे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या मागण्यांसाठी संघटीत होवून मालकांविरुद्ध लढता येणार नव्हते.ॲसेंब्लीत बॉंब फेकल्यानंतर भगतसिंग व बटुकेश्वर दत्त हे पळून न जाता ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत, पत्रकांचा वर्षाव करीत ॲसेंब्लीच्या गॅलरीतच उभे राहिले आणि जाणीवपूर्वक अटक करवून घेतली.हे बॉंब हिसांचारासाठी फेकले नव्हते. या बॉंबमुळे कुठलीही मनुष्यहानी होवू नये याची काळजी घेत संसदेतल्या निर्मनुष्य जागेत हे बॉंब फेकले गेले होते. शिवाय, बॉंबहल्यानंतर ॲसेंब्लित फेकलेल्या पत्रकांद्वारे भगतसिंग व साथीदारांच्या क्रांतीकारी कारवायांमागचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते.

*कोर्टातील ऐतिहासिक साक्ष*

भगतसिंगांनी दिल्लीच्या ॲसेंब्ली हॉलमध्ये बॉंब टाकल्यानंतर अटक करवून घेतली. सॉंडर्सच्या हत्येच्या आरोपासह ॲसेंब्ली बॉंब हल्ल्याची घटना पुढे करुन भगतसिंगांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला चालू झाला. या खटल्यादरम्यान भगसिंगांनी कोर्टात दिलेली साक्ष ऐतिहासिक आहे. या साक्षीद्वारे भगतसिंगांनी न्यायलयातील साक्षी कठड्याचा (विटनेस बॉक्सचा) उपयोग एका विचारमंचासारखा केला. साक्ष देत असताना आपण इतर हिंसक गुन्हेगारांसारखे गुन्हेगार नसून आमच्या कृत्यामागे शोषणमुक्त समाजनिर्मितीचे तत्वज्ञान असल्याचे प्रतिपादन भगतसिंग यांनी केले. भांडवलशाही अन तिच्या विकासातून फोफावलेली साम्राज्यवादी व्यवस्था कशी अन्यायी, जुलमी अन शोषक आहे याचे वर्णन करत भतसिंगांनी ते पर्यायी समाजवादी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी लढत असल्याचे स्पष्ट केले. भगतसिंगांनी या साक्षीदरम्यान दिलेले भाषण देशभर पसरले. भगतसिंग हे एक माथेफिरु, हिंसक तरुण नसून एक दृष्टे विचारवंत असल्याचे देशालाच नव्हे तर जगाला कळाले. भगतसिंगांनी अशाप्रकारे न्यायालयीन कारवाईचा उपयोग आपल्या क्रांतिकारी विचारांच्या प्रसारासाठी केला. भगतसिंगांनी दिलेल्या या साक्षीला ऐतिहासिक मूल्य आहे.

*म. गांधींचे फाशी टाळण्यासाठीचे प्रयत्न अन इंग्रजी कावा*

महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग यांच्यात वैचारिक मतभेद होते. इंग्रजांविरुद्ध लढण्याचा दोघांचा मार्ग वेगवेगळा होता. पण ते परस्परांचे वैरी नव्हते. भगतसिंगांना न्यायालयाने फाशीची सजा सुनावल्याने गांधींना दु:ख झाले होते. ही फाशी टळावी यासाठी गांधींनी प्रयत्नही केले होते. दि. १९ मार्च, १९३१ साली गांधी आणि तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट झाली. या भेटीतही गांधींनी भगतसिंग व साथीदारांची फाशी टाळण्यासाठी विनंती केली. भारतात क्रांतिकारी तरुणांकडून इंग्रजी अधिकाऱ्यांच्या हत्येचे प्रकरण गंभीर झाल्याने इंग्रजांवरही ‘अधिकारी लॉबी’चा दबाव होता. गांधींच्या प्रयत्नांमुळे भगतसिंग व साथीदारांची फाशी टळू नये यासाठी तत्कालीन पंजाब गव्हर्नर ने २४ मार्च ही फाशीची तारीख ठरलेली असतानाही आदल्यादिवशीच म्हणजेच २३ मार्च १९३१ रोजीच भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फासावर चढवले.गांधींनी हेतूपूर्वक भगतसिंग व साथीदारांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत अशा वावड्या उठवल्या जातात, त्यात काहीही तथ्य नाही.

*फाशी अन त्यानंतरचा प्रभाव*

२३ मार्च, १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू यांना फाशी झाली. हे तिघेही क्रांतिकारक एका महान ध्येयासाठी शहीद झाले. आपण करीत असलेल्या कार्याचे परिणाम ठाऊक असतानाही या तरुणांनी आपल्या ध्येयाशी अन विचारांशी तडजोड केली नाही, मृत्यूलाही धाडसाने सामोरे जात आपल्या ध्येयाशी मरेपर्यंत निष्ठा दाखवली. फासावर जाण्याच्या काही तास आधी भगतसिंग लेनिनच्या चरित्राचे वाचन करीत होते. फासावर जाण्यापूर्वी काही क्षण आधी भगतसिंग, सुखदेव अन राजगुरु यांनी एकमेकांना आलिंगन दिले. ‘इंकलाब जिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणा दिल्या अन हसत, हसत फासावर चढले. २०-२५ वयोगटातील या तरुणांमध्ये हे धाडस, ही प्रगल्भता, ही निष्ठा, हा ध्येयवेडेपणा विचारांच्या पेरणीतून आलेला होता.भगतसिंग, सुखदेव अन राजगुरु या तिघांच्या फाशीनंतर जगभर याचे पडसाद पडले. भारतात इंग्रजांविरुद्धचा असंतोष अधिकच तीव्र झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची तीव्रता फाशीच्या या घटनेनंतर अधिकच टोकाची झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवे वळण देण्यासाठी भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू यांचे बलिदान कामी आले. भारतातील तरुण या घटनेनंतर क्रांतिकारी विचारांनी भारावून गेला. इंग्रजांच्या जुलूमाविरुद्ध अन स्वातंत्र्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध लढण्यासाठी भगतसिंग, सुखदेव अन राजगुरुंचे विचार अन बलिदान प्रेरणादायी अन दिशादर्शक ठरले, पुढेही ठरतील.

*समारोप*

‘ज्या देशातील सरकार त्या देशातील जनतेला तिच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवते त्या सरकारला संपवणे हा त्या देशातील जनतेचा अधिकारच नाही तर आवश्यक कर्तव्य असते’ असे भगतसिंग सांगतात. ‘क्रांतीची तलवार विचारांच्या सहानेवर परजली जाते’ असे ते सांगतात. यावरुन भगतसिंग हे नुसते आक्रमक तरुण नव्हते तर शोषणावर आधारित व्यवस्थेविरुद्ध लढणारे विचारी क्रांतिकारक होते हे सिद्ध होते. भगतसिंगांचा लढा हा फक्त इंग्रजांना या देशातून घालवण्याएवढा मर्यादित नव्हता तर उत्पादनाची सर्व साधने सामाजिक मालकीची असलेली, शोषणविरहीत समाजनिर्मिती करणे हे त्यांचे ध्येय होते.आज स्वातंत्र्याला ७० हून अधिक वर्ष लोटली तरी इथली जनता शिक्षण, आरोग्य, रोजगार अन सत्त्तेतील समान सहभाग या अधिकारांपासून वंचित आहे. त्यामुळे भगतसिंगांचे विचार अन प्रेरणा आजही संदर्भहीन झालेल्या नसून त्यांचीच आज नितांत आवश्यकता आहे. भगतसिंग, सुखदेव अन राजगुरुंना ‘त्यागमूर्ती, जीवाचे बलिदान देणारे तरुण’ एवढ्याच मर्यादीत प्रतिमेत रंगवून त्यांचे मूळ विचार दुर्लक्षित ठेवण्याचे कटकारस्थान शोषक व्यवस्थेच्या रखवलादारांकडून होत असतानाच्या काळात त्यांचे विचार अभ्यासून त्यातून आजची अन्यायी व्यवस्था बदलवून न्याय्य व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी लढा उभरण्याचा संकल्प करुया.

✒️प्रा. प्रफुल एम. राजूरवाडे(इतिहास विभाग प्रमुख – राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर जि. चंद्रपूर मो:-9689952873)