धूम स्टाईलने गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

30

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.29मार्च):- पोलिसांनी धूम स्टाइलने गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १६०० किमी पाठलाग करत आंतरराज्य गुन्हेगारांची ४ आरोपींची टोळी पकडली असून त्यांच्याकडून २७ गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे. बीड शहरातील स्वराज्यनगर भागात रस्त्याने पायी जाणार शिक्षिकेच्या गळ्यातील 26 ग्रॅमचे गंठण धूमस्टाइल चोरट्यांनी हिसका मारुन पळवून नेल्याची घटना २३ मार्च रोजी भरदुपारी १२ वाजता घडली होती. या प्रकरणात बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हाही दाखल झाला होता. नंतर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेत तब्बल १६०० किमीचा पाठलाग करत मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या चोरट्यांची टोळी पुणे शहरातून अटक केली आहे. या टोळीने २७ गुन्ह्यांची कबूली दिली आहे. महाराष्ट्र राज्यासह गोव्यातही या टोळीने गुन्हे केले असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धती या आधारे तपास केला. यात त्यांना यश आले अन 27 मार्च रोजी सोनसाखळी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना, पुणे शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. या दरम्यान आरोपींची गुन्हे शाखेने कसून चौकशी करण्यात आली. मात्र, सुरुवातीला आडेवेडे घेणाऱ्या या टोळीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी बीड जिल्ह्यासह पुणे , ठाणे, गोवा, सोलापूर, मुंबई शहर, परभणी, उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. यातील दोन आरोपी मनमाड तर एक पुणे आणि एक उल्हासनगर येथील असून अनेक दिवसांपासून हे अशाच पद्धतीने गुन्हे करत होते.

या टोळीने बीडच्या शिवाजीनगर ठाणे हद्दीत ४ तर अंबाजोगाई हद्दीत १ असे ५ गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून या गुन्ह्यातील चोरीला गेलेले दागिने परत मिळवले जातील. असे प्रभारी अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले आहे.