लोकसेवेचा वसा सार्थपणे सांभाळत आईचे निधन होऊनही आ. सुरेश धस यांनी गाजवले विधिमंडळ अधिवेशन

50

🔸गोरगरीबांच्या विविध प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांना विचाराला जाब

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29मार्च):-विधिमंडळ अधिवेशन सुरु असतानाच आ. सुरेश धस यांच्या मातोश्री सुमन अक्का रामचंद्र धस यांचे अकाली दुःखद निधन झाले. आईच्या निधनावेळी आ. सुरेश धस हे मुंबई येथे अधिवेशनातच होते. लोकसेवेचा वसा सार्थपणे सांभाळत असलेल्या धस कुटुंबाने दुःखाचा डोंगर खांद्यावर घेत लोकांच्या प्रश्नांना सोडवण्याची प्राथमिकता सिद्ध केली. आईंचा अंत्यसंस्कार व इतर सर्व विधी अवघ्या तीन दिवसात करून त्यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवत लोकांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. बीडसह उस्मानाबाद, लातूर व सर्व राज्यातील विविध घटकांच्या प्रश्नांवर राज्य सरकारला उत्तरे देण्यास त्यांनी भाग पाडले. यामध्ये जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सुरू झालेले अवैद्य धंदे, बनावट मद्य विक्री, सुवर्णकार व व्यापारी वर्गांच्या अनेक तक्रारी, मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षण, धनगर समाजाच्या सुविधा व उपलब्धता, सायबर क्राईम व कारवाई, राज्य परिवहन मंडळाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा अशा अनेक मुद्यांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

मुंबई बँक कर्ज प्रकरणात राजकीय षडयंत्रातून गोवल्याचे सांगत त्यांनी अधिवेशन काळातच झालेल्या सर्व आरोपांना खोडून काढले. अर्थसंकल्प प्रस्तावावर चर्चा करताना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पुर्वनियोजीत मंजूर कामे सुरु करावीत, तसेच घरकुल आवास योजनेबाबत शाससाने गांभीर्याने घेऊन गरीबांची घरे कशी तात्काळ होतील आणि त्यासाठी होणारी पिळवणूक कशी थांबवता येईल यावर लक्ष द्यावे, तर नगरपंचायत हद्दीतील जि. प. च्या जागा या नगरपंचायतकडे हस्तांतरण करण्याचा झालेल्या निर्णयावर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगत सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील नगरविकास व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस तोडणी पूर्ण होईपर्यंत साखर कारखाने सुरुच ठेवावीत, शेतकऱ्यांना साखर कारखान्यांच्या काही लोकांकडून व वाहतूकदार यांच्याकडून काहीही रक्कमेची मागणी केली जातेय, साखर कारखाने बंद होणार नाहीत यासाठी सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे, महावितरणच्या विद्युत पुरवठा बाबतीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे आष्टी तालुक्यातील लोणी, दौलावडगाव गटावर वीजेचा लपंडाव आणि यामुळे नाहक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, अधिकारी शेतकऱ्यांना जुमानत नाहीत, शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादन व योग्य हमीभाव देणे गरजेचे आहे, यासह सहकार खात्याने काहीतरी नाविन्यपूर्ण कामगिरी करावी, नवीन सेवा संस्थाची नोंदणी करून घ्याव्यात व सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढवावी इत्यादी प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले.
———————————————-
आ. सुरेश धस यांनी अधिवेशनात विविध उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले, मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षण प्रश्न, घरकुल आवास योजनेबाबत शासनाने गांभीर्याने घ्यावे, अतिरिक्त उसाबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा उच्च दाबाने करावा, सहकार क्षेत्राला जिवंत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात आदी.