विवेकवाद जागवणारी कविता : अभंग समतेचे!

40

मुखेड जि. नांदेड येथील कवी चंद्रकांत गायकवाड यांचा अभंग समतेचे हा आगळावेगळा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संग्रहात पन्नास अभंग आहेत. देगलूरच्या गणगोत प्रकाशनाने गाडगेबाबा जयंती २०२२ रोजी संग्रह प्रकाशित केला आहे. संत तुकाम , संत कबीर यांचा समतावादी सुधारणावादी विचार परंपरेचा वारसा अर्थात ‘ विवेकवादाचा जागर करणारी कविता ‘ असे या कवितासंग्रहाचे वर्णन करता येईल. स्वातंत्र्य , समता, बंधुता , न्याय इत्यादी मानवी मूल्य जोपासण्याची शिकवण देताना , जे सांगायचे ते सुस्पष्ट आणि सरळ असे संततत्व आणि त्याचे आविष्कृतरुप म्हणजे ‘ अभंग ‘ याच अभंग रचनेचा आधार कवी चंद्रकांत गायकवाड घेतात.बुद्ध, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा,जोतिबा, शाहूबा, भीमबा इत्यादी आदर्श पितामह. महामाया , यशोधरा, जिजाई, सावित्रीमाई, रमाईंसारख्या लोकमाता , संत कवी – कवयित्री, सम्राट अशोक , संभाजीराजे आदींच्या विचार आचार कार्यकर्तृवाचा केलेला जागर संग्रहातील विविध अभंगांतून प्रत्ययास येतो. समतावाद मानवतावाद विवेकवाद अर्थात आंबेडकरवादी विचारधारा ही या अभंगाभिव्यक्तिची प्रेरणा असल्याचे विविध अभंग रचनेत ठायी ठायी जाणवते.कवी चंद्रकांत गायकवाड यांची अभंगरुपी कविता सद्याच्या विविधांगी सामाजिक विषमतेवर निर्भिडपणे नुसते प्रहार करुनच थांबत नाही तर , ती विवेकवादी वर्तनाच्या आधारे समता निर्मितीचा लोकशाहीकृत मार्गही दाखवते. अर्थातच समाजातील विषमतारुपी दंभांवर , व्यंगांवर शब्दरुपी बोट अचूक ठेवून समतावादी गुटीचे चाटण देण्यात कविता यशस्वी झाली आहे.

चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारलेल्या आशयाकर्षक मुखपृष्ठापासूनच कवितासंग्रह काव्यरसिक मनाला विवेकाची साद घालतो. अज्ञान , अंधश्रद्धा, भ्रष्टाचरणाचा काळोख विवेकरुपी कंदील प्रकाशाने नष्ट होणारच असा दृढ विश्वास देत जणू कबीर आश्वासित करतो आहे , या आशयाचे मुखपृष्ठ काव्यास्वादाची ओढ शतगुणित करते.लातुर येथील संयत, साक्षेपी,सम्यक समीक्षक डाँ. नरसिंग वाघमोडे सर यांची काव्यसंग्रहाचे अंतरंग हळूवारपणे उलगडणारी सुंदर प्रस्तावना संग्रहास लाभली आहे. दा. मा. बेंडे यांच्या सदिच्छा संदेशाचा सार कवी चंद्रकांत गायकवाड यांच्या सामाजिक प्रकृतीची आणि कवितासंग्रहाची लक्षवेधी ओळख करुन देणारा ठरला आहे. रचनेच्या दृष्टीने पहाता मोठ्या अभंगाचा आधार घेत रचना साकारल्या आहेत. बहुतांश अभंगात साहा ते सात कडवी असून कडव्यातील पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा तर चवथ्या चरणात चार अक्षरे आहेत. दुस-या आणि चवथ्या चरणात यमक साधला आहे. सामाजिक आशयाच्या अभिव्यक्तिसाठी गायकवाड यांनी स्वीकारलेली अभंग वृत्त रचना सामाजिक सुधारणा व सत्यधर्माची शिकवण देणा-या महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘ अखंड ‘ रचनेशी वैचारिक साधर्म्य साधणारी आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.

पारंपरिक आणि बदलत्या सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक , आर्थिक , धार्मिक , पारिवारिक स्थिती – गतीवर गायकवाड आपल्या प्रखर शैलीत प्रहार करतात. दुःख , दारिद्रय , दैन्य, अनिष्ट प्रथा- परंपरा , वंचितांचे प्रश्न , राजकारणी, प्रस्थापितांची सोंग – ढोंग आणि त्यावर समतेच्या पूजकांनी दिलेला विचार- आचाररुपी रामबाण उपाय अशा विविध विषयांना आग्रस्थानी ठेवून कवींनी रचना केल्या आहेत. आवश्यक तेथे प्रतीकांचा चपखल वापर झाल्याने कविता संमृद्ध झाली आहे. सामाजिक समता प्रस्थापिण्यासाठी गायकवाड यांची कविता विवेकवादी आचरणाचा आग्रह धरते. ज्ञान- शिक्षणाचे महत्व अधोरेखित करताना ‘ विवेक’ या अभंगात कवी म्हणतात –

शिक्षणाचे मळे
आनंदाचे खळे
भेदू तम जाळे
विवेकाने.

अज्ञानरुपी अंधकार ज्ञानरुपी प्रकाशाने विवेकी वर्तनाने नष्ट होईल यावर कविचा विश्वास आहे. अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत विचारांची कास धरायाला हवी हे पटवून देताना ‘ वेदना ‘ या रचनेत कवी म्हणतात –

संतांचे वचन
सत्याचे जतन
खलांचे पतन
करु चला.

सत्य असत्य शोधून खरे काय हे ठरवणे म्हणजे विवेकशक्ती ही विवेकवादी शक्ती प्राप्त करायची असेल तर कर्मकांड, तीर्थक्षेत्र, देवदर्शनादी कृत्यांमध्ये वेळ न दवडता अभ्यासात गुंतायला हवे असे कवी सूचवतात. पुस्तक वाचनाचे महत्व सांगताना ‘ पुस्तक ‘ या अभंगात कवी म्हणतात –

उद्धार नाही ते
देव दर्शनात
पहा पुस्तकात
विश्वसारे.मानवी मूल्यांचे रक्षण कर्ते संविधान हे सर्व विषमतारुपी दुखण्यांवर उतारा आहे. असेच जणू कवी ‘ संविधा ‘ नामक अभंगात म्हणतात.

उतारा औषधं
संविधान जाण
हेची जना दान
भीमराया.

बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन वंचितांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि राष्ट्रउभारणीसाठी खर्ची घातले. संविधानाचे दान दिले. संविधानरुपी औषध विविध समस्या सोडवण्यासाठी विवेकाने वापरायला हवे. असे कविला म्हणायचे आहे.’भीमराव ‘ या अभंगात कवी बाबासाहेबांच्या समाजासाठीच्य आत्मसन्मानपर कार्याचे वर्णन करतात. वंचितांच्या आत्मसन्मानासाठी बुद्ध धम्माचा स्वीकार करत , नवा विचार आचार आदर्श विज्ञानवादी उपासनेचा बुद्धरुपी मार्ग अनुयायांना देतात. त्या बद्दल कवी म्हणतात –

दाखवीली वाट
सन्मानाची भेट
मानव्याची थेट
भेट केली.

बाबासाहेबांना साथ देणा-या माता रमाई वंचितांची त्यागमूर्ती माय होती. बाबासाहेबांचे समाजासाठीचे कष्ट पाहून त्या पंढरीच्या विठ्ठलाला साकडं घालतात. आणि बाबासाहेबांना पंढरपूरला जाण्यासाठी विनवतात. मात्र माणूस असूनही सनातन धर्माने नाकारलेला उपासनेचा हक्क मिळवाताना नवीन पंढरपूर अर्थात नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा देऊन आपला पर्यायी विठ्ठल निर्माण करत बाबासाहेब रमाई आणि वंचित समाजाची इच्छा पूर्ण करतात. या ऐतिहासिक अशा मानवतेकडे जाणाऱ्या घटनेचे वर्णन करताना ‘ रमा ‘ कवितेत कवी म्हणतात –

उभारु ती नवी
आनंद पंढरी
वेदना उतारी
नागपूर.

‘ युगंधर’ या कवितेत विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार विज्ञानवादी विवेकवादी साहित्यिक डाँ. यशवंत मनोहर यांनी नाकारला. त्यावर महाराष्ट्रात वादंग उठले. त्या घटनेस मध्यवर्ती ठेवून डाँ. यशवंत मनोहर यांचे कार्य आणि तत्वे, भूमिका यांचा आढावा घेताना कवी म्हणतात –

विवेकाच्या झाडा
ज्ञानाचे गा फळ
विद्यादेवी बळ
थिटे असे

‘ शीलवंत’ ही कविता राजे शिवछत्रपतींचा विचार वारसा सांगते. रयतेसाठी रयतेचे न्यायी स्वराज्य स्थापना , तुकोबारायांच्या शिकवणुकीचे विवेकवादी आचरण शिवराय कसे करत हे सांगताना कवी म्हणतात-

नर नारी कधी
भेद नाही केला
मावळ्यांना सल्ला
विवेकाचा.
तर शंभूराजे यांच्यावरील ‘ शाक्य ‘ या अभंगात शंभूराजे यांचे पांडित्य, पराक्रम , आणि त्यांच्याशी झालेली कपटनीती यांचे वर्णन करताना कवी म्हणतात –
स्मृतीचे हो बळी
पितापुत्र झाले
तिलाच जाळले
कायद्याने.
शिवराज्याभिषेकावेळी मनुस्मृतीनुसार शिवरायांचा केलेला अपमान, शंभूराजांना कपटाने पकडून दिल्यावर केलेला शारीरिक छळ याचा बदला बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृती जाळून घेतला.
त्या संदर्भात कवीने हे भाष्य केले आहे.
धर्मसत्ता आणि राजसत्ता स्वार्थापायी समाजात भेदभाव करतात. समाजात तेढ निर्माण करतात.अशावेळी समाजाने सत्य जाणून विवेकाने वागावे असे सांगताना ‘प्रकाश’ या अभंगात कवी म्हणतात –
नसे भेदभाव
विवेकाच्या जाती
सर्वांठायी नीती
सर्व एक.
जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्ध विचारांचा प्रचार प्रसार व्हावा. भारतात संविधान हाच राष्ट्र ग्रंथ आहे. त्यात प्रजाहिताचा विचार आहे. ‘विश्वशांती’ या अभंगात –
मांगल्याची पूजा
लावू ज्ञान दीप
बुद्ध स्वयंदीप
तुकाराम.
असा आशावाद कवी व्यक्त करतात.
सद्या राष्ट्रद्रोही आणि राष्ट्रप्रेमी असा भेद करण्यात राजकारणी यशस्वी ठरत आहेत.
या विषयावर व्यक्त होताना ‘राष्ट्रद्रोह’ या अभंगात कवी म्हणतात-
सत्याच्या चालीत
कोण राष्ट्रद्रोही
वागणूक होई
संशयीत.
लोकांनी सत्य तपासून राष्ट्रद्रोही व राष्ट्रप्रेमी यातील भेद विवेकाने जाणावा. असे कवी सूचितकरु पाहातात. जग कोरोनाग्रस्त आसतानाचे वर्णन ‘फासे’ या अभंगात आले आहे.
हतबल झाले
देव सारे कसे
कोरोनाचे फासे
टाकलेले.
समाजातील अशा अनेकविध घटना घडामोडींचा वेध कवीने आपल्या अभंग कवितेत घेतला आहे.लेक,माहेर,स्वयंदीप,यां सारख्या रचनांतून स्त्री प्रश्नांच्या स्थिती- गतीचे विवेकवादी चित्रण आणि प्रश्नांच्या उकलींचे मार्ग कवीने सांगितले आहेत.
‘शेज’ सारख्या रचनेत वंचितांमधील प्रस्थापितांनी स्वार्थापायी केलेल्या तडजोडींवर कवी टिकात्मक प्रहार करतात. अभंग वाचताना अनेकविध घटना घडामोडींचे संदर्भ येताना दिसतात. वाचकास संदर्भ लागला नाही तर अभंग दुर्बोध वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभंगाभिव्यक्ती अनुभवजन्य असल्याने विद्रोह,आक्रमकता येणे स्वाभाविक वाटते.सर्वच अभंग विषय आशय रचनेच्या दृष्टीने आस्वादनीय झाले आहेत.
कागद ,छापाई ,बांधनी अतिशय उत्तम आहे.कवीचा कृतज्ञता भाव समर्पण पत्रिकेतून प्रत्ययास येतो. आयुष्याच्या अंधार वाटेवर भेटलेल्या दीपस्तंभांना अर्थात समस्त ज्ञात अज्ञात गुरुंना तसेच कवी ज्या शिक्षण संस्थेत अध्यापन कार्य करत आहेत, त्या संस्थेच्या माजी सचिव कालवश आ.गोविंद राठोड साहेब यांना संग्रह समर्पित केला आहे.कवी चंद्रकांत गायकवाड यांच्या कवितेची धार अशीच तळपत राहो,कवींना रसिक वाचकांचा भरभरुन आशीर्वाद मिळो, ही सदिच्छा

अभंग समतेचे
✒️कवी चंद्रकांत सोपानराव गायकवाड(9404975958),गणगोत प्रकाशन, देगलूर जि. नांदेड.
किंमत – रु. १५०/-

सुधीर ह. शेरे, ठाणे.
९१६७००५०७६.