गावठाण फिडरवरून शेती पंपाला होणारा विज पुरवठा व आकडे बहाद्दरांमुळे तलवाडयात ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले

30

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.9 तालुक्यातील तलवाडा गाव व परिसरात दिवसेंदिवस लोक संख्येत वाढ होत असल्याने सद्यस्थितीत गाव परिसरात असलेल्या ट्रान्सफार्मरवरील भार वाढल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत असूून आजघडीला गावठाण फिडरवरून शेती पंपाला होणारा विज पुरवठा व आकडे बहाद्दर यांच्यामुळे ट्रान्सफार्मर
जळण्याचे प्रमाण वाढले आहे. याविषयीची दक्षता विज वितरण कंपनीचे अधिकारी – कर्मचारी घेत नसून विजेअभावी मिटरधारक विज ग्राहक वैतागून गेले आहेत.

गावठाण फिडरवरून घरगुती व व्यावसायिक लोकांना विजेचा जो पुरवठा होतो त्या ठिकाणाहून शेती पंपाला आकडे टाकून विद्युत पुरवठा होत असून याकडे विज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचा-यांनी लक्ष देणे गरजेचे असताना ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्टपणे पहायला मिळत आहे. यामुळे गावातील ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असून याचा फटका व्यावसायिक व घरगुती मिटरधारक विज ग्राहकांना विनाकारण सहन करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर दुसरा आणण्यासाठी नियमित विज बील भरणा करणारे ग्राहक आणि आकडे बहाद्दर यांच्याकडून पैसे जमा केले जातात. हे नेहमीचेच झाले असून यामुळे विज बिल भरणा करणारे ग्राहक मात्र वैतागून गेले आहेत. याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

भलेही नियमित विज बिल भरणारे ग्राहकांची संख्या कमी असली तरी त्यांना विज पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था विज वितरण कंपनीने करावी अशी रास्त मागणी विजेअभावी त्रस्त झालेल्या मिटरधारक विज ग्राहकांनी केली आहे. विज वितरण कंपनीचा कारभार म्हणजे धन्याला धतुरा अन् चोराला मलिदा अशी झाली असून आता तरी विज वितरण कंपनीने यामध्ये सुधारणा करून नियमित विज बिल भरणा करत असलेल्या ग्राहकांना सुरळीतपणे विज पुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पैसे भरूनही विज मिळत नसलेल्या मिटरधारक विज ग्राहकांनी दिला आहे.