शहबाज शरीफ यांचा ‘काश्मीर राग’.

26

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६)

पाकिस्तानअजून राजकीय  गर्तेतून बाहेर पडला नाही न कधी पडणार ,मात्र पाकिस्तानचे नेते काश्मीर प्रश्नावर बेताल वक्तव्य करून आंतरराष्ट्रीय रंग भरण्याचा प्रयत्न करतात.पाकि नेत्यांना सत्तेवर राहण्यासाठी भारत विरोधात बोलावंच लागतं ते देखील काश्मीर प्रश्नावर.काश्मीर प्रश्नांवर बेछूट वक्तव्य केल्याशिवाय पाकिस्तानी नेते जिवंत राहू शकत नाही.पाकिस्तानी नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सत्ता हाथी घेताच काश्मीरचा राग आवळला.

शाहबाज शरीफ यांनी पहिल्याच भाषणात अकलेचे तारे तो़डल्याचं पहायला मिळालं आहे. संसदेत बोलताना शाहबाज यांनी काश्मीरचा दरवेळीचा राग पुन्हा आवळला आहे.”काश्मीरवर तोडगा निघाल्याशिवाय भारताबरोबर शांतता शक्य नाही”, असं वक्तव्य शरीफ यांनी केलं.

शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारताने काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात लोकांचे रक्त वाहत असल्याचा आरोप शरीफ यांनी केला. तसेच पाकिस्तान या लोकांच्या पाठिशी उभा राहील. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करणार, असं शरीफ म्हणाले.

”आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. पण, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होणं शक्य नाही. शेजार हा निवडीचा विषय नाही. शेजाऱ्यांसोबत आपल्याला नेहमी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे. पण, दुर्दैवाने पाकिस्तानचे भारतासोबत सुरुवातीपासून संबंध चांगले नाहीत. गेल्या २०१९ मध्ये भारताने कलम ३७० हटवले. पण, तत्कालीन इम्रान खान सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. काश्मीरमधील लोकांचं रक्त खोऱ्यात वाहत आहे. काश्मीर खोरे रक्ताने माखलेले आहे. पण, या लोकांना न्याय देण्यासाठी पाकिस्तानने काय केले?” असा सवाल देखील इम्रान खान सरकारला विचारत त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. ”काश्मीरच्या लोकांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दे उपस्थित करू. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढे यावं. त्यामुळे दोन्ही देशातील सीमेवर असलेली गरीबी आणि इतर मुद्दे मार्गी लागतील. संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव आणि काश्मीरमधील लोकांची इच्छा यानुसार काश्मीरचा प्रश्न सोडवू. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या अत्याचाराचा सामना करावा लागू नये”, असं शाहबाज शरीफ म्हणाले.

भारताने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले. पाकिस्तानने भारतासोबतचे राजकीय संबंध कमी केले आणि इस्लामाबादहून भारतीय उच्चायुक्तांना परत बोलावले होते.