राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात संपन्न

31

✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चोपडा(दि.12एप्रिल):-भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा यांचे सात दिवसीय लोकसहभागीय ग्रामीण शिबीर अनुदानित आश्रमशाळा,सत्रासेन ता. चोपडा येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी समाजकार्य महाविद्यालय,चोपडा आणि अनुदानित आश्रम शाळा, सत्रासेन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.ज्ञानेश्वर भादले हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आश्रमशाळेचे पुरुष अधीक्षक श्री. मनोज महाजन, आणि महिला अधिक्षका सौ.शीतल पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस छञपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा थोडक्यात इतिहास सांगितला.प्रा.डॉ.राहुल निकम यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक,शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानावर प्रकाशझोत टाकला. महात्मा जोतीराव फुले हेच शिक्षणमहर्षी असून या महाराष्ट्रातले एकमेव महात्मा असल्याचे स्पष्ट केले. महात्मा फुले यांच्या साहित्याची माहिती उपस्थितांना दिली.प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची गीत गायनातून मांडली आणि त्यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा परिचय करून दिला आणि आजच्या काळातील स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले.

या वेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या 15 शिबिरार्थीनी राष्ट्रपुरुषांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आश्रमशाळेतील 06 विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर भादले यांनी आपले प्रासंगिक मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळेतील कर्मचारिवृंद यांचे सहकार्य लाभले. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौदानकर, उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी यांनी समाधान व्यक्त केले.