पीक कर्जाच्या प्रत्येक अर्जाचे सनियंत्रण आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून : दीपक सिंगला

8

🔹शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(28 जून): व्यावसायिक बँकांकडून अकारण शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकरणे, शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करून परत लावणे यावर उपाय म्हणून आता जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन पोर्टल तयार कले आहे. यामधून शेतकऱ्यांच्या प्रत्येक पीक कर्ज मागणी अर्जावरती सनियंत्रण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. www.kccgad.com या नावाने सुरू केलेल्या पीक कर्ज मागणी पोर्टलचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांचे हस्ते व सर्व बँक अधिकारी यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी याच पोर्टलवर अर्ज करा असे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. या पोर्टलवर साध्या व सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहायक यापैकी एकाकडून अर्ज भरायचा आहे. या प्रक्रियेमुळे बँकांना अकारण पिक कर्ज आता नाकारता येणार नाही. प्रत्येक पीक कर्ज अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष असणार आहे असे त्यांनी पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.

जिल्हयातील व्यावसायिक बँका नेहमी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. तसेच त्यांना दिलेल्या पीक कर्जाचे उद्दीष्टही पुर्ण होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यावर गरजू शेतकऱ्यांना वेळेत आणि तातडीने पीक कर्ज मंजूर व्हावे यासाठी हे पोर्टल उपयोगी पडणार असल्याचे दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले राज्यात हा नाविण्यपुर्ण प्रकल्प असून, यातून शेती व्यवसायाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाणे, खते व मजूरीसाठी पैसे हातात मिळतील. लागवडीचे क्षेत्र वाढण्यासही मदत मिळेल.

*जिल्हयातील सर्वच बँकांचे पीक कर्ज उद्दीष्टही वाढविले* : जिल्हयात दरवर्षी अंदाजित 159 कोटी रूपये पीक कर्ज उद्दीष्ट सर्व बँकांना असते. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यावर्षी पासून 390 कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यासाठी उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. दि.15 जुलै पर्यंत 50 टक्के कर्ज वाटपाचे उद्दीष्ट सर्व बँकांना देण्यात आले आहे. सद्या जिल्हयात 36 टक्के पिक कर्ज वाटप पुर्ण झाले आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी 15 टक्के तर 66 टक्के सहकारी बँकांनी उद्दीष्ट पुर्तता केलेली आहे.

*बँकांनी स्वत: पुढकार घेण्याची गरज*: शेतकऱ्यांना शेती व्यवसायात वृद्धीसाठी, उत्पन्नाचे साधन वाढविण्यासाठी बँकांनी स्वत:हून पुढकार घेणे गरजेचे आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून जिल्हयात अर्थिक चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय डीएलसीसी बैठकीत सर्व बँकांना सूचना दिल्या होत्या. याबाबत आता सर्व बँकांचा कर्ज वाटपाबाबत दर शुक्रवारी आढावा घेतला जाणार आहे. तसेच दिलेले उद्दीष्ट पूर्ण केले नाही तर संबंधित बँकेवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात येणार आहेत.

*पोर्टलवर सोमवार दि.२९ जून पासून अर्ज करता येणार* : जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी www.kccgad.com या पोर्टलद्वारे सोमवार दि.२९ जून पासून अर्ज करणे सुरू करावे. शेतकऱ्यांनी यामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहायक यापैकी एकाकडून मदत घ्यावी. ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी फार आवघड असली तरी इतरांची मदत घेवून ती पुर्ण करावी. कारण आता कोणाचेही अकारण कर्ज नाकारले जाणार नाही. तसेच प्रशासनाकडे सर्व गरजू शेतकऱ्यांची माहितीही एकत्रित होणार आहे. याचा उपयोग पुढिल वर्षीही पीक कर्ज वाटप करताना होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
या पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक व्यवस्थापक, सर्व बँक अधिकारी उपस्थित होते.