शेती विषयक नवे तंत्रज्ञान लुटायला जैन हिल्स ला अवश्य भेट द्या!

395

▪️”हायटेक शेतीचा नवा हुंकार”-आम्ही भेट दिली,शक्य असेल तर आपण अवश्य भेट द्या…!

जैन इरिगेशन कंपनी च्या वतीने आयोजित जळगांव येथील जैन हिल्स वर कृषि मोहोत्सवात विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, नागपुर, वर्धा, बुलढाना, यवतमाळ या जिल्हातील निवडक ३० पत्रकारांनी नुकताच सहभाग दर्शविला. हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो म्हणुन आम्ही यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहो. करीता संकलीत केलेली माहितीचा हा लेख प्रपंच !

शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी जैन इरिगेशन कंपनीने मागील ६० वर्षात अनेक नवनवीन उपक्रम
राबविले. संशोधनाचे प्रयोग हाती घेतले. जे यशस्वी झाले त्यांना पुढे नेऊन विकसित रूप दिले. जे अयशस्वी झाले त्यांच्या विकासासाठी अव्याहत सुधारणा व प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहिले. या अव्याहत प्रयत्नांमागे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष राहिलेल्या भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांची प्रेरणा, कल्पकता, आस, दूरदृष्टी, श्रम, मेहनत, अभ्यास आणि सर्वांना बरोबर घेऊन अव्याहत धडपडण्याची वृत्ती होती. त्यातून एक सुंदर विश्व आज जळगावच्या जैन हिल्सवर व जगभरात अनेक ठिकाणी उभे राहिले आहे.

शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधनाचे हे विश्व पाहण्याची संधी उपलब्ध आहे. १० डिसेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ या काळात जैन हिल्सवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कृषी महोत्सवाला व शेतात उभ्या असलेल्या सुंदर पिकांना पाहण्यासाठी आपल्या देशासह जगातील शेतकरी, कृषी अभ्यासक आवर्जून सहभागी होत आहेत.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या कृषी महोत्सवात आपल्याला नवीन काय बघायला मिळणार आहे? कशासाठी मी जळगावच्या जैनहिल्सवर जायचे. याचे उत्तर आम्ही आता आपल्याला देणार आहोत. प्रत्यक्ष बघितले की विश्वास बसतो (Seeing is Believing) असे म्हणतात. शेतकरी तर सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाही. का ठेवावा हा ही प्रश्न आहेच. प्रत्यक्ष पाहणे हेच त्याचे उत्तर आहे. त्यामुळे आपण आता जैन हिल्सवर नव्याने काय बघायला मिळणार आहे त्याचा धावता व संक्षिप्त आढावा येथे घेऊ या! शेती क्षेत्रात जगात जे नव्याने तंत्रज्ञान विकसीत झाले आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावे या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिके उभी केली आहेत.

गादीवाफ्यावर ठिबक संच बसवून एक डोळा पद्धतीने उसाची लागण केली आहे. उसाला क्रॉपकव्हर लावण्यात आले असून क्रॉपकुलिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. मार्च-एप्रिल-मे या काळात तापमान खूप वाढते. त्याचा विपरीत परिणाम पिक वाढीवर होतो. तो होवू नये म्हणून तापमान कमी राखणे गरजेचे असते. यासाठी पिकावर वरून मिस्टर (स्प्रिंकलर) लावले असून पिकात तयार होणारा कार्बनडाय ऑक्साईड वायू (CO₂) शेताच्या बाहेर न जाता पिकालाच मिळावा म्हणून ऊस पिकाच्या चारही बाजूने पॉली (प्लॅस्टिकचे कंपाऊंड) लावली आहे. पाच महिन्यांचा हा ऊस आज अत्यंत दिमाखाने उभा आहे.

साध्या सपाट रानात ठिबक संचावर लावलेली कपाशी, गादीवाफ्यावर ठिबक संचावर घेतलेली कपाशी, गादीवाफा, ठिबक आणि मल्चिंगवरची कपाशी, आणि पारंपारिक पध्दतीने प्रवाही पाण्यावर घेतलेली कपाशी अशा कापूस लागणीच्या वेगवेगळ्या पध्दती येथे पाहायला मिळतील. ठिबक मल्चिंग आणि गादीवाफा असा त्रिवेणी संगमावरचा कापूस दृष्ट लागून नजरेत भरावा असाच आहे.

आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, मोसंबी, संत्रा या फळझाडांची अतिसघन पद्धतीने गादीवाफ्यावर ठिबक संचावरती केलेली लागवड येथे दृष्टीस पडेल. झाडाच्या दोनी बाजूने ठिबकच्या नळ्या टाकल्या तर त्याचे रिझल्ट किती उत्कृष्ट मिळतात हे येथे लगेच दिसून येईल.

तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामान बदल या दोन संकटांचा सध्या शेतकऱ्यांना वारंवार सामना करावा लागतो आहे. त्याचा मोठा फटका फळबागांना बसतो. तो बसू नये याकरिता शेडनेट, पॉलिहाऊस ग्रीनहाऊस यांसारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणात बागा उभ्या करणे गरजेचे आहे. जैन हिल्सवर आपल्याला शेडनेट व इनसेक्टनेटमध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा यांची केलेली लागवड पाहायला मिळेल. अवकाळी पाऊस, गारपीट यापासून बचाव व्हावा म्हणून वीस फूट (६ मिटर) उंचीच्या शेडनेटमध्ये केळीची लागवड केली असून त्यात ग्रैन्डनैन व्हरायटी लावली आहे. १४-१५- १६ एप्रिल २०२३ रोजी म्हणजे उन्हाळ्यात क्रॉप गार्ड कव्हर (ताग) लावून केलेली बिगर हंगामी अशी ही लागवड आहे. गादीवाफा, दोन ठिबकच्या नळया आणि मल्चिंग असलेल्या या केळीला ४ महिने व २५ व्या दिवशी पहिला घड पडला. पावणे सहा महिन्यात सर्व झाडांना घड पडले. केळी पिकासाठी जैन कंपनीने फर्टिगेशनची जी शिफारस केलेली आहे. ती तंतोतंत पाळून बागेचे फ्रूट केअर मॅनेजमेन्ट करण्यात आले आहे. प्रत्येक झाडाला सरासरी ३० ते ३२ किलोचा घड पडला असून १५ जानेवारी पर्यंत सर्व केळी काढायला येतील. उघड्या रानात ग्रॅन्डनैन बरोबरच नेंद्रन पूवन, बंथल व रेडबनाना या जातीही लावल्या आहेत.

लाल व पांढ-या रंगाच्या कांद्याच्या १५ जाती ठिबक, गादीवाफा व मल्चिंगवर लावण्यात आल्या आहेत. लसुणच्याही १० जाती लावण्यात आल्या असून ठिबक व तुषार सिंचनाबरोबरच प्रवाही पद्धतीने पाणी देण्याचे मॉडेलही उभे करण्यात आले आहे. पपईच्या पाच जाती येथे लावण्यात आल्या असून त्यातल्या तीन जातींची रोपे जैन कंपनीने टिश्यूकल्चर पद्धतीने तयार केलेली आहेत. पपईत हळद व आले ही आंतरपिके घेण्यात आली असून हळदीच्या १९ जाती येथे लावण्यात आल्या आहेत. पॉलिमल्च करून गादीवाफ्यावर आधार देऊन व आधार न देता अशा दोन्ही पद्धतीने टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी कागोमी नावाची जात वापरली आहे. हिरव्या मिरचीची देखील अशाच पध्दतीने लागवड केली आहे.

जैन स्वीट ऑरेंजच्या पाचही व्हरायटी गादीवाफा आणि ठिबकच्या दोन नळांवरती पहायला मिळतील. याशिवाय टाकरखेडा येथे फ्यूचर फार्मिंग, रोपवाटिका, दर्जेदार व रोगमुक्त रोपे कशी बनतात ते पाहता येईल. परिश्रम समोर ठिबक सिंचनाचे प्रात्यक्षिक व अद्यावत साधन सामुग्री बघता येईल. याशिवाय अन्यही अनेक गोष्टी पाहून मनात जर काही प्रश्न व शंका उपस्थित झाल्या तर त्याही लगेच तिथल्या तिथे जैनच्या कृषी पीक तज्ज्ञांना विचारता येतील. नवीन ज्ञान व तंत्रज्ञानाचे गाठोडे हे प्रदर्शन पाहण्याने आपल्या हाती लागणार आहे. अधिक माहितीकरीता या संदर्भात टोल फ्रि नं. १८०० ५९९ ५००० किंवा २५७ – २२६०११ वर संपर्क करू शकता.

✒️संकलन:-सुरेश दौलतराव डांगे(संपादक साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-८६०५५९२८३०