श्रीराम-कृष्ण शाकाहारी होते की मांसाहारी?

178

गेल्या १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी होती. दिल्लीतील जेएनयु महाविद्यालयातील खानावळीत ह्या रामनवमीला मांसाहार करू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या दोन गटात वादावादी झाली. हाणामारी झाली. प्रसार माध्यमांमध्येसुद्धा हे प्रकरण चांगलंच गाजलं. यानिमित्ताने दोन्ही गटांनी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे वाटते.

या वादात एका गटाने आरोप केलाय की, आमच्या होस्टेलच्या खाणावळीत मांसाहारी जेवण बनवू दिले नाही, आज रामनवमी असल्यामुळे कुणीच मांसाहार करायचा नाही अशी जबरदस्ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गटाने केली. ह्या गोष्टीला विरोध करणाऱ्या गटाला एबीव्हीपी च्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली असा आरोप इतर विद्यार्थ्यांनी केला आहे. तर एबीव्हीपी च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही जेएनयु महाविद्यालयात रामनवमी ची पूजा करत असतांना काही विद्यार्थ्यांनी त्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला म्हणून वाद झाला. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, शाळा-महाविद्यालयांमध्ये धार्मिक कार्यक्रम घ्यायला पाहिजेत की नाही? विद्यार्थी महाविद्यालयात जातात कशासाठी? आणि विद्यार्थी संघटनांचे कार्य काय असते? विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे. मग ते प्रश्न शिक्षणासंबंधित असतील, परीक्षेसंबंधात असतील, त्यांच्या वसतिगृहसंबंधात असतील. धार्मिक प्रश्न सोडविणे किंवा निर्माण करणे हे विद्यार्थी संघटनांचे कार्य नक्कीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा संघटनांपासून दूरच राहिले पाहिजे जे शिक्षणापासून आपले लक्ष भरकटवितात.

महाविद्यालयात रामनवमी पूजेला परवानगी भेटली असेल आणि त्या पूजेला कुणी विद्यार्थी अडचण आणत असतील तर ते चुकीचेच आहे, कारण राज्यघटनेने प्रत्येकाला उपासना स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार कुणीही व्यक्ती आपल्याला आवडेल त्या धर्माची-देवाची उपासना करू शकते. अगदी त्याचप्रमाणे जर कुणी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी मांसाहार करू नका अशी जबरदस्ती करणे देखील चुकीचेच आहे. आपलं मत दुसऱ्यावर जबरदस्ती थोपविणे चुकीचेच..बरं ह्या राम भक्तांना हे सुद्धा माहिती नसते की, ज्यांच्या जन्मदिनाला मांस खाऊ नका अशी आपण इतरांना जबरदस्ती करत आहोत ते भगवान राम आणि कृष्ण हेसुद्धा मांस खायचे याचे पुरावे आहेत. राम आणि कृष्ण हे दोन्ही देव मद्य आणि मांस सेवन करत असल्याचे रामायण-महाभारतात पुरावे आहेत. खुद्द स्वामी विवेकानंदांनी आपल्या ‘पूर्व आणि पश्चिम’ या पुस्तकात हे पुरावे दिलेले आहेत. श्रीरामांची पत्नी सीतादेवीने गंगेला मांस, भात आणि हजार कळशा दारू यांचा नवस केला होता. आता मला सांगा आपण आपल्या देवाला नवस कशाचा करतो? जे आपण खातो-पितो तोच नैवेद्य किंवा नवस आपण देवाला कबूल करतो.

सीताम् आदाय बाहुभ्याम् मधुमैरेयकं शुचि।
पाययामास काकुत्स्थः शचीम् इन्द्रो यताऽमृतम्।।
मांसानि च सुमिष्टानि फलानि विविधानि च।
रामस्याभ्यवहारार्थं किंकरास्तूर्णमाहरन्।।
(रामायण, उत्तरकांड)

सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च।
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवी पुरीं पुनरुपागता।।
(रामायण, अयोध्याकांड)

उभौ मध्वासवक्षिप्तौ उभौ चंदनचर्चितौ।
उभौ पर्यंकरथिनौ दृष्टौ मे केशवार्जुनौ।।
(महाभारत, आदिपर्व)

परंतु विवेकानंदांनी हिंदू धर्मग्रंथांमधील दिलेले हे सर्व पुरावे वाचायला, समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही. आपला पक्ष, संघटना, नेता सांगेल तो धर्म. बाकी धर्मात/धर्मशास्त्रात काय लिहून ठेवलं आहे याच्याशी कुणालाच काही घेणेदेणे नाही. नेत्यांच्या इच्छेनुसार आता धर्म-संस्कृती बदलत असते.

विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्मशास्त्र एकदा म्हणते की यज्ञप्रसंगी हत्त्या करा, तर दुसऱ्यांदा म्हणते की जीवघात करू नका. हिंदूंनी सिद्धान्त बांधला की यज्ञाखेरीज अन्यत्र हत्त्या करणे पाप, परंतु यज्ञ करून खुशाल मांसभोजन करा. इतकेच काय पण गृहस्थासाठी असे अनेक नियम आहेत की त्यानुसार त्या त्या प्रसंगी हत्त्या न केल्यास पाप लागेल. उदाहरणार्थ श्राद्ध वगैरे. या साऱ्या प्रसंगी जेवायला जाऊन मांस न खाल्ल्यास पशूचा जन्म येतो असं मनू म्हणतात. त्यातलं काय खरं मानावं? ह्या गोष्टींमुळे समाजात गोंधळ उडाला आहे. पाश्चात्त्य देशांत वादावादी चालली आहे – मांस खाल्ल्याने रोग होतात काय, शाकाहारी निरोगी असतात काय? यावर. एक बाजू म्हणते, मांसाहाऱ्यांना तर्हे-तर्हेचे रोग जडतात. दुसरी बाजू म्हणते या साऱ्या गप्पा आहेत. तसं असतं तर हिंदू निरोगी झाले असते आणि इंग्रज, अमेरिकन व्यक्ती, मुख्य-मुख्य मांसाहारी जाती विविध रोग होऊन आतापर्यंत संपून गेल्या असत्या. एक बाजू म्हणते की बकरा खाल्ल्यानं बकऱ्यासारखी बुद्धी होते, डुक्कर खाल्ल्याने डुकरासारखी बुद्धी होते तर दुसरी बाजू म्हणते मग बटाटे खाल्ल्याने बटाट्यासारखी बुद्धी होते आणि भात खाल्ल्याने भातासारखी जड बुद्धी होते. ह्या वादाला अंत नाही.

रामायणातील दुसरा एक प्रसंग आपण इथे आठवला पाहिजे की, ज्यावेळी राजा दशरथ रात्री शिकारीला गेले होते. त्यावेळी एका पाणवठ्यातून त्यांना बुडबुड असा पाण्याचा आवाज आला. ते आवाज करणारं हरीण असावं असं समजून राजा दशरथांनी त्या दिशेने बाण मारला. परंतु तो श्रावणबाळ होता. ह्या प्रसंगात दशरथ राजा शिकारीला का गेले होते? त्यांनी हरीण समजून बाण मारला म्हणजे त्यांना हरीण मारायचे होते. ते कशासाठी मारायचे होते? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली की आपल्याला कळेल की हे लोक सुद्धा मांसाहारी होते.
विवेकानंदांच्या मते धर्मातील रूढी ह्या नेहमीच बदलत आल्या आहेत. याच भारतात असा एक काळ होता, की गोमास खाल्ल्यावाचून ब्राह्मण हा ब्राह्मण राहू शकत नसे. वेदात तुम्हाला आढळेल, की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा मोठा पाहुणा आला की उत्तम बैल मारण्यात येत असे. नंतर पुढे समाजाच्या लक्षात आले, उत्तम बैलांची हत्या केल्यास आपल्या शेतीवर संकट येईल म्हणून ही रूढी बंद पडली. आज आपणाला भयंकर वाटणाऱ्या रूढी एकेकाळी विद्यमान होत्या. धर्मातील असे नियम ज्यावेळी निरुपयोगी वा हानिकारक ठरतील, त्यावेळी त्यांना मोडीत काढावे लागेल, बदलावं लागेल हा परिवर्तनाचा नियम विवेकानंदांनी जगाला सांगितला. तो मानवजाती गेल्या हजारो वर्षांपासून स्वीकारत आली आहे. धर्माचे आजचे विकृत स्वरूप हेच हिंदुस्तानाच्या अवनतीचे प्रमुख कारण आहे हे विवेकानंद ठामपणे सांगतात. “तुम्ही कोणताही आहार घ्या. केवळ आहारानेच तत्त्वसिद्धी होत असेल तर एखाद्या वानराला आयुष्यभर दूध-भाताचा आहार द्या. त्यामुळे तो थोर योगी होईल काय? पुष्कळदा स्नान केल्याने आणि तीर्थक्षेत्रात नदीत स्नान केल्याने जर स्वर्गप्राप्ती होत असेल तर सर्वप्रथम ती माझ्या पोटात जाणाऱ्या माशांना झाली पाहिजे. भाजी पाला खाल्ल्याने जर मोक्ष मिळत असेल तर गाई हरणे व ससे यांना ती आपल्या आधी व्हायला पाहिजे.” इतक्या स्पष्टपणे विवेकानंदांनी धर्मातील निरर्थक कर्मकांडांचा फोलपणा उघड केला आहे.

बरं जे लोक मांसाहार करतात त्यांमध्ये पण आपण बघतो की बहुतांश लोक म्हणतात शनिवार, सोमवार, गुरुवार यादिवशी मांसाहार करू नये. रविवार, बुधवार, शुक्रवारी केला तर चालतो. आता आपण विचार केला तर लक्षात येईल की, कोंबडी शनिवारी कापली काय आणि रविवारी कापली काय, तिला प्रत्येकच दिवशी त्रास तितकाच होणार आहे. कोंबडीला म्हणजेच मुक्या जनावराला त्रास होतो म्हणून जर तुम्ही मांस खात नसाल तर मग कधीच खाऊ नका. कारण तुम्ही कोणत्याही दिवशी ते खाल्लं तर त्या मुक्या जनावराला तितकाच त्रास होणार आहे. आणि जर तुम्ही खाणार असाल तर तुम्ही कोणत्याही दिवशी खा कारण तुमच्या दिवसाच्या निवडीनुसार तिचा त्रास कमी-जास्त होणार नाहीच.ह्या देशात कुणी काय खावे? काय खाऊ नये? याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. या अधिकारावर कुणीही जबरदस्ती करून गदा आणू शकत नाहीत. प्रत्येकच धर्मियांना आपापले सण-उत्सव आपापल्या पद्धतीने साजरे करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा सण साजरा करतांना जी बंधने पाळतो ती त्याचवेळी इतरांनी सुद्धा पाळली पाहिजे अशी जबरदस्ती करणे चूकच.

कोणत्याही धर्माच्या विद्यार्थ्यांनी शाळा- महाविद्यालयात, विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी जावं. धार्मिक पूजा-कर्मकांड करण्याकरिता आपल्या देशात हजारो धार्मिक स्थळे बांधलेली आहेत. महाविद्यालयांबाहेर आल्यानंतर आपण मोकळे आहोत. तेव्हा ज्ञानार्जनाच्या ठिकानी देव-धर्म आणून तुमच्यात आपसात उगाच वाद उत्पन्न होतील, आपसातील द्वेष वाढेल याशिवाय दुसरं काहीच तुमच्या हाती लागणार नाही. राजकारण्यांना तुमचं काही एक घेणं-देणं नाही. राजकारण्यांनी हिंदू-मुस्लिम पासून सुरू केलेला हा वाद आता शाकाहारी आणि मांसाहारी पर्यंत नेऊन ठेवला आहे. त्यात आणखी नवनवीन वाद ते रोजच घालत राहतील, आपण त्यापासून अलिप्त राहायला हवं. खुद्द श्रीरामांनी- श्रीकृष्णांनी सुद्धा शाकाहारी-मांसाहारी असा वाद केला नाही की मांसाहारी लोकांना दोष दिला नाही मग आपण का श्रीरामांच्या भक्तांमध्ये वाद निर्माण करतोय? ह्या राजकारण्यांनी हिंदू-मुस्लिमांपासून हिंदू-हिंदूंमध्येच वाद सुरू केलेले आहेत.

हे श्रीरामांना तरी कबूल झालं असत का?ज्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी रामनवमी च्या दिवशी मांस खाऊ नका अशी इतर विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली. त्या परिषदेच्या विद्यार्थ्यांनी वरील श्रीराम, सीतामाता, दशरथ राजा, श्रीकृष्ण यांचे रामायण-महाभारतातले संदर्भ तपासले पाहिजेत. फक्त आपला पक्ष-नेता म्हणेल तो धर्म ही वृत्ती फार घातक आहे. जर स्वयं भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णच मांसाहार करत असतील तर त्यांच्या भक्तांनी का करू नये? असा प्रश्न देखील त्यांना उद्या विचारला जाऊ शकतो. रामनवमी इतर धर्मियांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत साजरी करायला पाहिजे की इतरांच्या मनात रामाबद्दल, आपल्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करून? आणि आपण आपल्या मनात असलेल्या भक्तीपोटी सण उत्सव साजरे करणार आहोत की एखाद्या समुदायाच्या द्वेषापोटी? हेसुद्धा आपले आपणच ठरवायचे आहे.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666