संतापजनक ! ऊस वाहतूक गाडी मालकाने 13 ऊसतोड मजुरांसह 9 लहान मुलांना ठेवलं डांबून

88

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.1मे):-राज्यात आज सर्वत्र कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र याच कामगार दिनादिवशी सामाजिक न्यायमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने,13 महिला-पुरुष मजुरांसह त्यांच्या 9 लहान मुलांना डांबून ठेवलं आहे. असा आरोप पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी केला आहे. यामुळं वृद्ध आजीसह इतर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली.

बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या वारोळा गावातील व गेवराईच्या भेंड खुर्द गावातील ऊसतोड मजूरांनी, ट्रॅक्टर मालक दत्ता दगडू गव्हाणे यांच्याकडून ऊसतोडणीसाठी पैशाची उचल घेतली होती. त्यांनतर त्यांनी कर्नाटक येथील ओम शुगर साखर कारखाना येथे जाऊन 6 महिने ऊस तोडणीचे कामही केले आहे. तर गेल्या आठ ते नऊ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. मात्र ऊसतोडीसाठी घेतलेल्या ऊचली पैकी काही पैसे मजुरांकडून फिरतात. यामुळे गाडी मालक दत्ता गव्हाणे यांनी त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप वृद्ध केसरबाई आडगळे, परमेश्वर गायकवाड यांच्यासह अनेकांनी केला आहे. यामध्ये मदन आडागळे, उषा मदन आडागळे, जानवी मदन आडागळे, विष्णू गायकवाड, मंगल विष्णू गायकवाड, कचरु गायकवाड, राजूबाई कचरू गायकवाड, दीपक वाव्हळ, आशा दीपक वाव्हळ, बाळू पंडित, रेश्मा बाळू पंडित, सिंधुबाई पंडीत, रतन जाधव, छाया रतन जाधव यांच्यासह लहान मुलामुलींचा समावेश असल्याचं नातेवाईकांनी सांगितल आहे.

तर गेल्या आठ दिवसांपासून कारखान्याचा पट्टा पडलाय. पण माझा मुलगा , सून, नात आली नाही. त्यांना पैशासाठी डांबून ठेवलंय. त्यांना सोडवा, त्यांना आणून द्या, त्यांना मारहाण केली जात आहे. असं म्हणत वृद्ध केशरबाई आडागळे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या.

तर या विषयी तक्रारदार ऊसतोड मजूर परमेश्वर गायकवाड म्हणाले, की मी माझी बायको, आई, वडील, भाऊ त्याची बायको, कारखान्याला ऊस तोडण्यासाठी गेलो होतो. मात्र पंधरा दिवसापूर्वी माझा मुलगा खूप आजारी पडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, मी गावी बीडला आलो होतो. मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. कारखान्याहुन आठ दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आणि इतर मजूर निघाले आहेत. मात्र ते अद्याप पर्यंत घरी आले नाहीत. उचलीमधील फिरलेल्या पैशामुळं त्यांना दत्ता चव्हाण डांबून ठेवलं असून त्यांना मारहाण देखील करत आहे. असा आरोप गायकवाड यांनी केला असून ते म्हणाले, की आम्ही त्याला म्हणालो आता आमच्याकडे पैसे नाहीत, सहा महिने कारखान्याला होतोत. तुम्हाला एक महिन्यानंतर उचल सुरू झाल्या की देऊ. तोपर्यंत आमच्या घराचे कागदपत्र तुमच्याकडं ठेवा. मात्र तो ऐकत नाही. त्यानी सर्वांना कुठंतरी डांबून ठेलवलंय. तर या मजुरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली आहेत. त्यामुळं त्यांच्यावर अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान आज राज्यात कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना, सामाजिक न्याय मंत्रीपद असणाऱ्या आणि डझनभर ऊसतोड मजुरांचे नेते असणाऱ्या बीड जिल्ह्यात, कामगारांनाचं डांबून ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं या कामगार दिनानिमित्त, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह डझनभर ऊसतोड मजूर नेते समोर येऊन या कामगारांची सुटका करणार का? आणि त्या रडणाऱ्या वृद्ध आज्जीच्या आणि इतर नातेवाकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.